श्रीमती उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ सुनू मामी… – भाग-1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
सुनुमामी म्हणजे आमच्या सदामामाची बायको. सुनीता. तिला सुनीता या नावाने कुणीच, कधीच हाका मारल्या नाहीत. सदा मामा लग्न करून तिला घरी घेऊन आला, तेव्हा घरातल्या सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. आमच्या गोर्या,पान राजस रुपाच्या सदामामाची ही असली बायको. हे म्हणजे रेशमी शेल्याची गाठ चिंध्यांच्या वाकळीशी मारल्यासारखं होतं. काळा रंग. किंचित पुढे आलेले दात. जाड ओठ, रुंद जबडा. फताडं नाक. खरोखर अगदी ध्यानच होतं ते! नाही म्हणायला तिच्या डोळ्यात विलक्षण तेज होतं. बघणार्या च्या डोळ्यात तिने थेट पाहिलं, की बघणार्यायने वरमून खाली बघितलंच पाहिजे.
‘सदामामा एक फुकट्या… आता हिलाही त्याच्याबोबर पोसलं पाहिजे. ‘ घरातल्या बायका बडबडत. कधी एकमेकींशी हळू आवाजात, कधी मोठ्याने हिला ऐकू जाईल असं. सुनुमामी काहीच बोलत नसे. मान खाली घालून ती फक्त घरातली कामे करी.
त्याच्या लग्नाबद्दल घरातल्या बायका-पोरांना कल्पना नव्हती, पण पुरुष माणसांना माहीत असावं. लग्न झाल्यावर तरी त्याला जबाबदारीची जाणीव होईल. काही तरी कामधंद्याला लागेल, असं वाटलं होतं त्यांना. पण प्रत्यक्षात तसं काहीच घडलं नव्हतं.
सदामामाचा उद्योग म्हणजे गावातल्या रिकामटेकड्या लोकांबरोबर भटकणे. त्यांच्याबरोबर पत्ते कुटणे, घरात आल्यावर बाहेरच्या दिवाणावर पडून अरेबियन नाईटस, हतीमताई, विक्रम वेताळ यासारखी पुस्तकं वाचणे. घरातल्या पुरुषांनी त्याला कामालालावायचा अनेकदा प्रयत्न केला होता. घरातल्या पेढीवर ठेवला. पण दोनच दिवसात आपल्याला ते बैठं काम जमणार नाही म्हणाला आणि पेढीवर जाणं सोडून दिलं. एका ओळखीच्यांच्या किराणामालाच्या दुकानात समान देण्यासाठी ठेवला, तर तो मालात भेसळ करतो, मला असला माल देणं जमणार नाही म्हणाला. एका गॅरेजमध्ये ठेवला, तर असलं काम केल्याने तुमच्या प्रतिष्ठेला बाधा येईल, म्हणाला. थोडक्यात काय, तर या ‘जोरूका भाई’ला कामाला लावायचे सगळे प्रयत्न फसले. शेवटी पुरुषांनी ठरवलं, घरात दहा माणसं जेवतात, हा अकरावा जेवेल. लग्नं झालं, पण सदामामाच्या दिनक्रमात काही बदल झाला नाही.
सुनुमामीचं गाव शिवारी, आमच्या गावापासून पंध्रा-वीस किलो मीटरवर. ती आणि तिचा म्हातारा बाप दोघेच होते एकमेकांना. तीन खोल्यांचं बैठं घर. थोडा जमीन तुकडा. दोघे राबत होते. पोटापुरतं मिळवत होते. म्हातार्या.ला एकच चिंता. मुलीच्या लग्नाची. मुलगी गुणाची, पण लग्नाच्या बाजारात गुणाला कुठली किंमत असायला? रूप हवं. ते तर आजिबात नाही.
गावातले लोक काहिशा कुचेष्टेनेच सदामामाला विचारायचे, ‘काय सदाभाऊ, लाडू, कधी देणार?’
‘देऊ की…त्यातकाय?’
‘पण कधी? लग्न करायचा विचार आहे नं? की जन्मभर ब्रह्मचारीच रहाणार?’
‘अं… करायचं की लग्न!’
‘कधी?’
‘मुलगा मिळाली की.’
आता नाकर्ता सदा आणि कुरूप सुनीता, लोकांनी जोडी लावून टाकली. ते सदाकडच्या पुरुषांना विचारायला आले. पुरुषांच्यात मसलत झाली. न जाणो, लग्न झाल्यावर सदामामाला जबाबदारीची जाणीव होईल,’ त्यांना वाटल़ं मग त्यांनी मध्यस्तांवरच जबाबदारी टाकली. मंदिरात लग्न लागलं. ना सनई. ना बँड. सुनीताला कुंकवाचा धनी मिळाला. गोरा-गोमटा जावई बघून म्हातारा खूश झाला. ‘आता मी मरायला मोकळा झालो.’ म्हणाला.
सदा बायकोला घेऊन घरी आला. ही माझी बायको. त्याने घरात सांगितले. माप ओलांडणं नाही. गृहप्रवेशाचा सोहळा नाही. थट्टा-मस्करी नाही. दहीभात ओवाळणं नाही. नाव घ्यायलासुद्धा कुणी तिला सांगितलं नाही. ती सरळ तशीच घरात आली.
क्रमश: …
© श्रीमती उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈