श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ सुनू मामी… – भाग-1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

(मागील भागात आपण पाहिले – या घरात आपला नवरा आणि आपण अश्रित आहोत, याची जाणीव तिला घरी आल्या आल्या दोन दिवसातच झाली होती. आता इथून पुढे)

एक दिवस गावाकडून निरोप आला,  सुनुमामीचे वडील अत्यावस्थआहेत. ती गावी जायला निघाली. आण्णा सदाला म्हणाले,  ‘तूही जा.’

‘मी जाऊन काय करणार?’

‘जे तिथे जाऊन करावं लागेल,  ते करायचं.’

सुनुमामीने पिशवी भरली. रोजच्या नेसायच्या दोन साड्या,  सदामामानं  अरेबियन नाईट्सचं पुस्तक पिशवीत टाकलं. सुनुमामीचे वडील तिच्या वाटेकडे डोळे लावून बसले होते. तिला बघण्यासाठी,  भेटण्यासाठीच जणू त्यांनी आपल्या कुडीत प्राण राखून ठेवले होते. सुनु आली. त्यांनी तिच्या डोक्यावरून, अंगावरून हात फिरवला. सुनु त्यांना थोपटत राहिली. हळूहळू त्यांचा श्वास कमी होत होत एका क्षणी थांबला. सुनुच्या डोळ्यातून जसा पाऊस सांडला. पण थोड्या वेळाने तिने स्वत:ला सावरले. शेजारी-पाजारी आधीपासूनच जमले होते. त्यांनी पुढची व्यवस्था केली.    

सुनुने स्वत:च वडलांना अग्नी दिला. मामा मात्र  त्याचा कशाशीच संबंध नसल्यासारखा बसून होता. दुसर्या: दिवशी घरी निघून गेला. सुनुमामी सगळे दिवस वगैरे यथासांग करून घरी परत आली. त्या पूर्वी तलाठ्याकडे जाऊन घर, जमिनीला आपलं नाव लावून आली. एका शेतकर्या.ला आपली जमीन अर्धुलीनं करायला देऊन आली.

दिवस सरत होते. एक दिवस माझी मुलगी मंजू म्हणाली, ‘आई, सुनुमामीच्या साड्या किती  विरल्यात  बघ.’ माझ्याही लक्षात आलंच होतं आणि दोन घरात  नेसायच्या बर्या  साड्या काढून ठेवाव्या असं म्हणत होते. एव्हाना कापणीचा हंगाम आला होता. सुनुमामी म्हणाली,  ‘चार दिवस गावाकडे जाऊन येते.’ तिच्या शेतात ज्वारीची मळणी चालू होती. आपल्या देखरेखीखाली तिने निम्मी ज्वारी घरात टाकायला लावली. एक पोतंभर ज्वारी भरून बाजूला ठेवली. गावात गुर्हाहळं लागली होती. गूळ करणं चालू होतं. एकाला ज्वारी देऊन बदल्यात गुळाची ढेप आणली. एकाला ज्वारी देऊन बदल्यात शेंगांचं पोतं घेतलं. बाकीची ज्वारी जयराम वाण्याला विकली. त्यातून स्वत:साठी दोन फिक्या रंगाच्या नाजुक फुलांचे  डिझाईन असलेल्या वायल घेतल्या. दोन पोलकी शिवून घेतली. दोन परकर आणले. मामासाठी दोन पायजमे,  कुडते, एक टेरिलीनची पॅंट बुशशर्ट घेतला. गाडी केली आणि सगळं घेऊन घरी आली. शेंगा, गूळ पाहून पोरं खूश. मामाने कपडे पुन्हा पुन्हा पारखून बघितले. ‘हं! बरय कापड!’ तो उद्गारला.

असेच आणखी काही दिवस गेले आणि तिच्या लक्षात आलं,  आपल्याला काही तरी होतय. एक नवा जीव तिच्या पोटात अंकुरत होता. ती खुशालली. घरात बाया-बापड्यांची मात्र बडबड सुरु झाली. ‘ आता हीचं बाळंतपण,  सेवा-सुश्रुषा,  खाणारी तोंडं दोनाच्या ऐवजी तीन होणार…’

एक दिवस तिने सांगून टाकलं,  मी माझ्या गावी जाऊन माझा संसार मांडते.’ घरातल्यांना हुश्श्य  झालं. सुंठीवाचून खोकला जातोय. जाऊ दे. तिने आपलं सामान गोळा केलं. गाठोडं बांधलं. पिशवी भरली आणि निघाली. घरचे मामाला म्हणाले, ‘तू पण नीघ.’

‘पण मी तिथे जाऊन  काय करू?  ना पाणी ना वीज.’ मामा कटकटला.

‘असं आहे. दिवस गेलेली बाई. पहिलटकरीण. एकटी  गेली, तर लोकात तरी बरं दिसेल का?’  मामाला  मग  निघावंच  लागलं. घराला चिकटलेलं बांडगूळ असं अचानक दूर करता आलं.

नंतर अधून मधून गावाकडच्या काही बातम्या येऊ लागल्या. तिने छप्पर नीट बांधून त्यावर कोहळ्या,  भोपळ्याचे वेल चढवलेत. दोडके,  शेंगा,  दुधे लावलेत. रेताड जमिनीत तूर आणि हरभरा लावलाय. निगुतीनं खाणं-पिणं होत असल्याने मामाची कांती आणखीनच उजळलीय.

क्रमश: …

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments