जीवनरंग
☆ ते दहा तास… – भाग -1 ☆ श्री दीपक तांबोळी ☆
रेल्वेने नागपूरला इंटरव्ह्यूसाठी चाललो होतोे.रेल्वेतून निवृत्त झालेल्या वडिलांच्या पासवर मी रिझर्वेशन केलं होतं.पावसाळा असल्याने गाडीला अजिबात गर्दी नव्हती.ए.सी.डब्यातले माझ्यासमोरचे बर्थ तर रिकामेच होते.
नाशिक आलं तसा एक देखणा तरुण ब्यागा घेऊन आत चढला.माझ्यासमोरच्या बर्थखाली त्यानं बँग ठेवली.तेवढ्यात त्याच्यामागेच एक बाई आत आली.तिला पाहिलं आणि माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. माय गाँड ! काय सुंदर होती ती !
“कुठं जाताय?”तो तरुण मला विचारत होता.
“नागपूरला “मी शुध्दीवर येत म्हंटलं.
” थोडं लक्ष ठेवाल का?मिसेस गोंदीयाला जातेय.एकटीच आहे आणि मुलाची तब्येत जरा नरमगरम आहे”
तिच्या कडेवरच्या बाळाकडे बोट दाखवून तो म्हणाला.
” हो ठेवेन की.त्यात काय विशेष!”
मी त्याच्याशी बोलताबोलता तिच्याकडे नजर टाकली.गाडी निघाली तसा तो उतरुन गेला.तिनं खिडकीतून त्याला बायबाय केलं.समोरच्या बर्थवर तिनं मुलाला ठेवलं आणि ती त्याला थोपटू लागली.माझी नजर तिच्या चेहऱ्यावरच खिळली होती.खरोखर इतकी सुंदर स्त्री मी आयुष्यात आजपर्यंत पाहीली नव्हती.मी माझ्या काँलेजच्या मुली आठवून पाहील्या.त्यातली एकही तिच्या जवळपासही येणारी नव्हती.तिचे डोळे,नाक,ओठ, त्वचा,केस फारच सुरेख होते.विशेष म्हणजे तिनं मेकअपही नव्हता केला तरीही ती अप्रतिम सुंदर दिसत होती.माझ्या लक्षात आलं की आपल्या फिल्म इंडस्ट्रीतली कोणतीही हिरोईन तिच्याइतकी सुंदर नव्हती.बाळंतपणानंतर बायका बेढब होतात म्हणे.पण तीची फिगर अतिशय सुरेख होती.मनात विचार आला,स्वर्गातील अप्सरा अशाच सुंदर असतील का?की हिच्यापेक्षा जास्त?नाही. यापेक्षा सुंदर असूच शकत नाही.
मी भान हरपून तिच्याकडे बघत होतो.ती मात्र तिच्या विश्वात मग्न होती.मुलाला बाटलीने दुध पाजतांना,त्याला काहीतरी खाऊ घालतांना ती त्याच्याशी गप्पा मारत होती.अधूनमधून तो किरकिर करायचा तेव्हा ती त्याला प्रेमाने थोपटत होती.
एकदोनदा तिनं माझ्याकडे पाहीलं.तेव्हा मी घाईगडबडीने दुसरीकडे नजर फिरवली.नंतर मी मोबाईलशी चाळा करु लागलो पण माझी नजर तिच्याकडेच वारंवार वळत होती.जांभळ्या साडीत ती अप्रतिम सुंदर दिसत होती.पण त्या सौंदर्यात कुठेही उथळपणा,भडकपणा नव्हता.घरंदाजपणा आणि शालीनता त्यात ओतप्रोत भरलेली होती.काँलेजमध्ये असतांना या बाईने अनेकांना वेड लावलं असणार हे स्पष्टच होतं.ती जर विवाहित नसती तर मीसुद्धा तिच्या प्रेमातच पडलो असतो यात शंका नव्हती.
मी तिच्याकडे वारंवार बघतोय हे तिलाही कळत असावं पण ती ते चेहऱ्यावर दाखवत नव्हती.
आठ वाजले तसा मी थोडा भानावर आलो.भुक लागल्याची जाणीव मला झाली. मी बँगेतून डबा काढून जेवण केलं.साडेआठ वाजता तिचा मुलगा झोपला असावा.तिनं बँगेतून एक सुबकसा मोठा डबा काढला आणि ती जेवायला बसली.
“या जेवायला”
अनपेक्षीतपणे तिच्याकडून आलेलं निमंत्रण ऐकून मी एकदम गडबडून गेलो.
” मी आताच जेवलो बघा”
ती सौम्य हसली. मग म्हणाली
” हो पाहिलं मी.हे स्वीट तरी घ्या” एका डिशमध्ये बंगाली मिठाई ठेवून तिनं मला दिली.मी ओशाळलो कारण मी जेवत असतांना तिला विचारलंसुध्दा नव्हतं.
” नागपूरला रहाता?”
तिनं जेवता जेवता विचारलं.
“नाही.इंटरव्ह्यूला चाललोय”
” कोणत्या कंपनीत?”
मी कंपनीचं नाव सांगितलं.
“इंजीनियर आहात?”
“हो मी बी.ई. केलंय केमिकल मध्ये” मी जरा अभिमानानेच सागितलं.
“मी सुध्दा इंजीनियर आहे”ती म्हणाली.”एम.ई.केलंय इलेक्ट्रॉनिक्स मध्ये”
मी वरमलो.माझ्यापेक्षा ती जास्तच शिकली होती.
” मग जाँब करताय कुठे?”मी विचारलं
” नाही.करायची खुप इच्छा होती. पण एम.ई. झाल्यावर लगेच लग्न झालं आणि सगळंच राहून गेलं.”
” मिस्टर काय करतात तुमचे?”मी थोडं इर्ष्येने विचारलं.
” ते सुध्दा इंजीनियर आहेत.एम.एस.केलंय अमेरिकेतून आणि आता फँक्टरीज सांभाळतात.”
” फँक्टरीज?”
” हो.नाशिकमध्ये आमच्या तीन फँक्टरीज आहेत आणि पुणे,मुंबई, चेन्नई, हैदराबाद, इंग्लंड, आफ्रिका, अमेरिका आणि गल्फ कंट्रिजच्या मिळून सोळा फँक्टरीज आहेत.अर्थात माझे सासरे, हे आणि माझे दोन लहान दिर मिळून सगळं सांभाळतात “
बापरे!मी गार झालो.एका प्रचंड धनाढ्य आणि कर्तृत्ववान माणसाच्या बायकोसमोर मी बसलो होतो.तिच्या तुलनेत सर्वच बाबतीत मी दरीद्री होतो.माझ्यासारखे अनेक इंजीनियर तिच्या फँक्टरीत पगारी नोकर असतील.तरी ती माझ्याशी सहजतेने बोलत होती.कोणताही गर्व किंवा अहंकार तिच्या बोलण्यातून जाणवत नव्हता.
” तुम्ही एकट्याच जाताय?नाही म्हणजे कुणी सोबत नाही आलं?”
एवढ्या सुंदर बाईसोबत रात्रीच्या प्रवासात कुणी नसावं याचं मला आश्चर्य वाटत होतं
“का? कशासाठी?नाशिकला ह्यांनी गाडीत बसवून दिलं.गोंदियाला कुणीतरी घ्यायला येईलच.एका रात्रीचा तर प्रश्न होता.तसे हे येणार होते पण उद्या फँक्टरीत मुख्यमंत्री येणार आहेत.त्यामुळे त्यांना येता आलं नाही. आणि माझ्या मामांची तब्येत सिरीयस आहे त्यामुळे मला तातडीने निघावं लागलं “
” तरीपण कुणीतरी..….”
“अहो मागच्या महिन्यात मी याला घेऊन एकटीच अमेरिकेत जाऊन आले,आमच्या नातेवाईकाच्या लग्नाला.हा तर आपला महाराष्ट्र आहे.इथं सोबतीची काय गरज? “
मी चुपच झालो.बाई मोठी धीट दिसत होती.
क्रमशः…
© श्री दीपक तांबोळी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈