सुश्री मंजुषा सुनीत मुळे
☆ जीवनरंग ☆ अनुवादित लघुकथा – आनंदाचे गुपीत ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
बायकोच्या किटी-पार्टीवर नेहेमीच नाराज असणारी आई, आज इतक्या आनंदात असलेली पाहून, ‘आज काही जादू वगैरे झाली आहे की काय?‘ असा चेहेऱ्यावर दिसणारा प्रश्न सौरभने शेवटी आपल्या बायकोला विचारलाच
…” प्रेरणा, आज हे असं नेहमीपेक्षा उलटच कसं झालंय? तुझी किटी पार्टी, आणि आईच्या चेहेऱ्यावरची नाराजी, या दोन गोष्टी एकमेकांना पर्याय असल्या-सारख्या आहेत खरं तर. पण आज तर आई फारच खुशीत दिसते आहे. बोलण्यातही एक वेगळाच नवा उत्साह जाणवतो आहे. याआधी अनेक वेळा आणि अनेक प्रकारे मी तिला समजावून पाहिलं. पण अशा पार्टी वगैरेच्या विरोधातच तिने पूर्वीपासून जोपासलेल्या मानसिकतेतून ती कधीच बाहेर पडू शकली नाही. त्यामुळे आज हा खरोखरच एक चमत्कार वाटतो आहे मला. आज तू अशी कोणती जादू केली आहेस तिच्यावर? ”
यावर प्रेरणाने हसतच उत्तर दिलं…” सौरभ, ही माझ्या मैत्रिणींची कमाल आहे. आज त्यांनी आईंना अगदी आर्जव केल्यासारख सांगितलं की….. “काकू तुम्ही एकट्या आतल्या खोलीत बसून रहाता, ते आम्हाला चांगलं वाटत नाही. तुम्हीही आमच्याबरोबर बाहेर येऊन बसा ना”…..आणि त्यांना हाताला धरून त्या बाहेर घेऊन आल्या. सगळ्यांनी त्यांना वाकून नमस्कार केला. इतकंच नाही, तर ती लव्हली आहे ना, ती आधी पाया तर पडलीच, पण नंतर त्यांना मिठी मारत सगळ्यांना उद्देशून म्हणाली की,
“मी जेव्हा जेव्हा इथे येते ना, तेव्हा काकू माझ्याशी खूप प्रेमाने वागतात. मला काय काय छान गोष्टी सांगतात. म्हणूनच आजपासून काकू म्हणजे माझी सगळ्यात ‘बेस्टफ्रेंड‘ असणार आहे”…..आणि जेव्हापासून ती हे बोलली आहे, तेव्हापासून…….”.
मूळ हिंदी कथा : सुश्री मीरा जैन
अनुवाद : सुश्री मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२.
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈