श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर
जीवनरंग
☆ प्रामाणिकपणाचे कौतुक… ☆ श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर ☆
बंडूतात्या सकाळी सकाळीच तयारी करून शहराच्या गावी जायला निघाले. महत्त्वाचे काम असल्याने त्यांच्या सोबत त्यांचे मित्र अप्पाजीही होते. एस.टी.त बसल्यावर आपल्याला काय काय घ्यायचं आहे याचा ते विचार करत होते. बर्याच दिवसांनी शहराच्या ठिकाणी जात होते. त्यामुळे त्यांच्या छकुलीनेही “आपल्यासाठी काहीतरी आणा” असे बजावले होते.
गाडी वेळेवर पोहोचली. कार्यालयातील त्यांची कामेही लवकरच आटोपली. आपली सर्व कामे आटोपल्यावर त्यांना घरी जाण्यासाठी बराच वेळ शिल्लक होता. आता खरेदी करू या असं ठरवून दोघेही बाजारामध्ये गेले. घरी लागणा-या काही वस्तू बाजारातून त्यांनी खरेदी केल्या. आपली छकुली काय तरी नवीन घेऊन येण्याची वाट पाहत असणार. म्हणून आपल्या मुलीसाठी त्यांनी एक सुंदर फ्रॉक खरेदी केला . मुलीला आवडत असलेला रंग आणि त्यावर असलेला सुंदर गोंडा त्यामुळे तो फ्रॉक बंडूतात्यांना खूपच आवडला होता. केव्हा एकदा घरी गेल्यावर आपल्या मुलीला ती भेट देतो असं त्यांना झालं होतं. अजूनही गाडीला खूप वेळ होता. त्या दोघांची खरेदी संपलेली होती. आता बस स्टॉपवर बसून राहण्यापेक्षा आपण सिनेमा पाहायला जाऊ असा त्यांनी विचार केला. त्या दोघांनी एक रिक्षा बोलावली आणि त्या रिक्षात बसून ते सिनेमागृहात निघाले. सिनेमाचा वेळ झालेला होता. सिनेमागृहापाशी पोहोचल्यावर बंडूतात्यांनी रिक्षावाल्याला पैसे दिले आणि लगेच तिकीट काढायला म्हणून घाईघाईने निघून गेले. त्यांनी सिनेमाची तिकिटं काढली आणि सिनेमागृहात प्रवेश केला. त्यांच्या आवडीच्या विषयावर सिनेमा असल्यामुळे बंडू तात्या सिनेमा पाहण्यात दंग झाले होते.
दरम्यान मध्यंतर झालं आणि सिनेमागृहाच्या लाइट्स सुरू झाल्या. मात्र त्यांच्या चेहऱ्यावर दु:खी भाव दिसू लागले. अप्पाजींनी त्याला विचारलं, “काय रे, काय झालं? तू दु:खी का?”
बंडू तात्या म्हणाले, “आपण बाजारातून माझ्या मुलीसाठी फ्रॉक घेतला होता. त्या फ्रॉकची पिशवी आता मला दिसत नाही. आता रिकाम्या हाताने घरी गेलो तर छकुली नाराज होईल.”
आप्पाजी म्हणाले, “अरे आता काय करणार ? आता तर आपली जायची वेळ झाली. आपल्याला वेळेवर निघायला हवं. नंतर बस नाही.”
बंडू तात्या आपल्या मित्राला म्हणाले, “चल आपण बाहेर जाऊ आणि थोडा शोध घेवू.”
आप्पाजी त्याला म्हणाले, “ठीक आहे. पण नीट आठव. नाहीतर आपल्याला उगाच इकडे-तिकडे भटकत राहावे लागेल.”
बंडूतात्यांना मात्र काहीच सुचत नव्हतं. ते लगबगीने बाहेर आले. सिनेमागृहाच्या बाहेर आल्यानंतर इकडेतिकडे शोधक नजरेने पाहू लागले. त्याच वेळी एक गृहस्थ त्यांच्या दिशेने आला आणि त्यांना विचारलं, “काय हो, काय शोधत आहात? मला जरा सांगता का?”
त्या गृहस्थाकडे ते पाहू लागले. ते म्हणाले, “सांगून काय उपयोग आहे? पण सांगतो. माझी एक किंमती वस्तू हरवलेली आहे आणि ती वस्तू मी जर घरी नेली नाही तर माझ्या मुलीला खूप वाईट वाटेल.”
तो गृहस्थ म्हणाला, “मी एक रिक्षा व्यावसायिक आहे. दुपारी माझ्या रिक्षामध्ये दोन व्यक्ती बसलेल्या होत्या . त्यापैकी एकाची पिशवी माझ्या रिक्षामध्ये राहिली. परंतु त्यांचा चेहरा नीट पाहिला नसल्यामुळे मला ते व्यवस्थित आठवत नाहीत. मी शोधू शकत नाही.”
हे ऐकून बंडूतात्यांना बरं वाटलं. ते म्हणाले, “अहो तो मीच आहे. माझीच पिशवी हरवली आहे.”
रिक्षावाला म्हणाला, “माझ्या रिक्षामध्ये ही पिशवी विसरली होती. घरी गेल्यावर माझ्या पत्नीला सापडली.”
“हो पण एवढ्या पिशवीसाठी तुम्ही परत आलात?”
रिक्षावाला म्हणाला, “खरं तर तुम्हाला सोडून मी माझ्या घरी गेलो. घरी गेल्यावर पत्नी पाहते तर ती पिशवी होती. ती पिशवी बघून माझी बायको म्हणाली, “अहो केवढ्या प्रेमाने सद्गृहस्थाने आपल्या मुलीसाठी सुंदर ड्रेस घेतलेला आहे. आणि ती पिशवी तो आपल्या रिक्षामध्ये विसरला आहे. त्याला खूप वाईट वाटेल. पहिले तुम्ही पुन्हा मागे जा आणि त्याला शोधून काढा. आपल्या मुलीसारखी त्यांची मुलगी त्या वस्तूसाठी वाट बघत असेल.” म्हणून मी पुन्हा तुम्हाला शोधण्यासाठी आलो.”
हे ऐकून बंडूतात्यांना त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल अप्रुप वाटलं. त्याला बक्षीस म्हणून पैसे देऊ केले. मात्र त्याने पैसे घेण्यास नकार दिला.
तो म्हणाला, “अहो आम्ही कष्टाची भाकरी खातो. आणि त्यामुळेच मी तुम्हाला ही पिशवी परत देण्यासाठी आलो आहे. मला अजिबात नको पैसे.”
बंडू तात्यांना राहवत नव्हतं. त्यांनी त्या रिक्षावाल्याचा पत्ता घेतला आणि त्या रिक्षावाल्याच्या युनियनचा सुद्धा पत्ता घेतला. घरी आल्यावर त्यांनी रिक्षा युनियनच्या अध्यक्षांना पत्र लिहिले. त्या पत्रामध्ये त्या गृहस्थाच्या प्रामाणिकपणाबद्दल कौतुक केलं आणि रिक्षावाल्यांच्या युनियनचे सुद्धा आभार मानले
असेच काही दिवस गेले. एक दिवस त्यांना एक पत्र आले. त्यात लिहिलं होतं, “नमस्कार! आमच्या रिक्षा युनियन मधील एका रिक्षावाल्याच्या प्रामाणिकपणाबद्दल तुम्ही कौतुक केलं. आमच्या सहका-यांनाही चांगलं वाटलं. त्याबद्दल त्या रिक्षावाल्याचा एक छोटासा सत्कार आमच्या युनियनच्यामार्फत ठेवलेला आहे. आणि हा सत्कार आपल्या शुभ हस्ते व्हावा अशी आमची इच्छा आहे. यासाठी तुम्ही आमच्या कार्यक्रमाला उपस्थित रहावे. येण्या- जाण्याचा जो खर्च आहे तो आमच्या रिक्षा युनियनच्या मार्फत तुम्हाला देण्यात येणार आहे.”
बंडूतात्यांना खूप आनंद झाला. आपण लिहिलेल्या पत्रामुळे एका चांगल्या माणसाचा गौरव होतोय याचा त्यांना आनंद झाला. या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले. कार्यक्रम संपल्यावर पदाधिकाऱ्यांनी प्रवास खर्च देऊ केला परंतु त्यांनी तो नाकारला.
” एवढं चांगलं काम तुम्ही केलं. एका प्रामाणिक व्यक्तीचा तुम्ही गौरव केलात. त्यामुळे तुमच्याकडून पैसे घेणे हे मला शोभत नाही. अशाच प्रकारची प्रामाणिक सेवा तुम्ही सर्व जनतेला देत आहात हे पाहून मला खूप आनंद झाला आहे.”
प्रामाणिकपणाचे फळ नेहमीच चांगलं असतं.
© श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर
सदस्य, अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण
पत्ता – मु. बागायत, पो. माळगाव, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग. 416606
संपर्क – 9420738375
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈