सौ.अस्मिता इनामदार

?  जीवनरंग ?

☆ पिकलं पान – भाग – 2… सुश्री मीनाक्षी मोहरीर ☆ प्रस्तुती – सौ.अस्मिता इनामदार ☆

( इथे मात्र कित्येकदा सारी नातीगोती असूनही केवळ ‘ घरात नको ‘ म्हणून हकालपट्टी झालेली असते, ते बघून जीव दुखतो.) इथून पुढे —-

 “असं बघ बेटा, आजकाल अगदी लहान मुलांपासून सगळ्यांचे नाही का, निरनिराळे क्लब निघालेत? ते तुमचे रोटरी, जेसीज, लेडिज क्लब, शिवाय फुलापानांसाठीचे गार्डन क्लब, सगळे नावाजलेले आहेत. तसंच एखादं गोंडस नाव द्यावं अशा वृद्धाश्रमांना गं !”

” खरंय आई तुझं ! किती छान विचार मांडते आहेस तू आज !” मी म्हणाले.

” अगं कसलं काय, सहज मनात आलं एवढंच! खरं तर ‘ ओल्ड इज गोल्ड ‘ ही म्हण आम्हा वृद्धांसाठी किती सार्थ आहे बघ नं ! ओल्डचा अर्थ वयस्क , वृद्ध असा घ्यायचा आणि गोल्डचा अर्थ सोनं असा न घेता, सोन्यासारखा पिवळा असा घ्यायचा. मग याच न्यायानं जर वृद्धाश्रमाला ‘ गोल्डन क्लब ‘ असं नाव दिलं तर कानांनाही ऐकायला किती चांगलं वाटेल? सर्व वृद्धांचा अर्थात पिवळ्या पानांचा तो ‘ गोल्डन क्लब ‘ हो नं? ” 

आईच्या विचारांचं मला सकौतुक आश्चर्य वाटत होतं. इतके दिवस वाटायचं, इतर सर्वांच्या आईसारखीच आपली पण आई आहे. प्रेमळ, शांत, कामसू, हसतमुखानं सारं सहन करणारी! पण आज मात्र तिच्या विचारांनी मी अगदी भारावून गेले होते. आईचा सुरकुतलेला हात कुरवाळत मी म्हणाले…..

” हे मात्र खरंय हं आई! वृद्धाश्रमाला ‘गोल्डन क्लब’ म्हणण्याची तुझी कल्पना आणि त्या मागची भावना एकदम झकास आहे बरं का! पण घरातल्या वृद्धांची काय किंवा पिकल्या पानांची काय, गरजच नसते असं मात्र अजिबात नाहीये हं! बाळंतपणात नाही का, विड्याच्या पिकल्या पानांना, औषधी गुणांच्या दृष्टीनं किती महत्त्व आहे? आणि केवड्याच्या कणसाची पिवळी धम्म पानं किती छान सुगंध पसरवत चक्क गणपतीच्या मस्तकावर विराजमान होतात? आई, तसंच घरातही आहे गं ! कित्येक महत्त्वाच्या गोष्टीत घरातील वृद्धांचा सल्ला अतिशय गरजेचा असतो बघ. कडू गोड अशा अनेक अनुभवांनी माणूस वृद्धत्वाला पोहोचतो अन् हेच अनुभव दुसऱ्या पिढीला ठेचा लागू नयेत, म्हणून कामात येतात, हो नं? त्याहीपेक्षा कुणीतरी आपल्यापेक्षा मोठं घरात आहे, या कल्पनेनीच इतरांना आपलं लहानपण जपता येतं. नमस्कारासाठी वाकायला, आशिर्वादाचा हात डोक्यावर ठेवायला, लहानाचं कौतुक करायला घरातले वृद्ध घरातच असायला हवेत नं आई? नाही ते विचार तू डोक्यात नको हं घेऊस !”

आईच्या हातावरील एक एक सुरकुती, बोटांनी मिटवून बघण्याचा वेडा चाळा करत मी आईची समजूत घालून बघितली. तिचं कितपत समाधान झालं, कुणास ठाऊक! पण तिचा मूड मात्र ठीकठाक झाला.

डिंकाच्या आणि मेथीच्या लाडवांचा डबा माझ्या हातात ठेवत, तिनं म्हटलं, ” सध्या थंडी भरपूर आहे, पंधरा दिवसात संपवून टाका बरं का गं!”

मी ही तिच्या समोरच एक लाडू खायला घेत म्हटलं, ” आई, जेव्हापासून तुझ्या हातचे हे लाडू खातेय, तेव्हापासून त्याची चव अगदी सारखीच कशी गं?”

” अगं साऱ्या मेव्यासोबत, आईची तीच माया पण त्यात असते नं, मग चव कशी बदलणार बाळा?”

आम्ही दोघीही मनापासून हसलो. नाश्ता, चहा घेताना मग वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारल्या. आईचा मूड चांगला झाला याचंच मला मनापासून समाधान वाटलं.आई घरी जायला निघाली. कुंडीतल्या झाडांना तिच्या सुरकुतल्या हातांनी हलकेच गोंजारलं, अगदी मला गोंजारावं तसं ! झाडांची कापून टाकलेली पिवळी पानं हळूवारपणे ओंजळीत धरून, क्षणभर कपाळावर टेकवली आणि सोबतच्या पिशवीत घालत म्हणाली, 

” घरी गेल्यावर यांना विहिरीत शिरवून टाकेन “—डोळे तुडुंबले होते तिचे.

मी ऑटोरिक्षापर्यंत आईच्या सोबत निघाले. आईने नेहमी सारखाच निरोप घेतला—

” ये बरं का गं घरी ! मुलांना घेऊन निवांतपणे ये रहायला. आणि हो, ‘गोल्डन क्लबचा’ विचार असू दे बरं का मनात !”

एवढं म्हणेस्तोवर रिक्षा निघाली. निरोपाचा हात हलवत, रिक्षा नजरेआड होईपर्यंत मी बघत राहिले. ऑटो दूर दूर जात होती. परत येताना मी आईच्या बोलण्यावागण्याचाच विचार करत होते. 

चार दिवसांनी आई एकाएकीच गेली. झाडाची पिवळी पानं गळून पडावीत, तितकी सहज !

आता मात्र मी सतत विचार करते, ” हिरव्यागार झाडांची शान पिवळ्या पानांमुळे नाहीशी नाही होत, उलट भरल्या घरात वयोवृद्ध व्यक्ती, नमस्कार करायला वाकल्यावर आशीर्वाद द्यायला असाव्यात, तशी ही पिवळी पानं मला वाटायला लागली आहेत.”

–तेव्हापासून झाडांवरची पिवळी पानं छाटणं मी पार सोडून दिलंय आणि आईचं स्वप्नं पूर्ण करण्यासाठी ‘ गोल्डन क्लब’ चा विचार मात्र मनात पक्का केलाय !

— समाप्त —

लेखिका : मीनाक्षी मोहरील

प्रस्तुती : अस्मिता इनामदार

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments