सौ. वंदना अशोक हुळबत्ते
जीवनरंग
☆ सदमा.. . भाग 1 ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆
नवीन घराच्या अंगणात मोठ्या हौसेने बाग फुलवली होती. वेगवेगळी फुलझाडे, फळझाडे लावली होती. वेळोवेळी झाडांच्या मूळा जवळची माती सारखी करावी लागे. खत घालावे लागे,एखादं जंतूनाशक फवारावे लागे, ही सारी देखभाल अनुजा करीत असे. आपल मन बागकामात गुंतवून ठेवत असे. आता ही ती अंगणातील झाडांची पिकली पानं काढून टाकण्यात मग्न होती. तेवढ्यात ” काकू.. .. . काय करता ? येवू.. .
का.. . मी?”आवाज ऐकू आला. मागे वळून बघते तर दिपा समोर उभी होती. निळी जिन्स्,त्यावर पिवळा टाॅप,मानेवर रूळणारे मोकळे केस,हसरा चेहरा किती स्मार्ट दिसत होती. अनुजा तिला बघतच राहिली तिच्याकडे आपण बघतोय हे लक्ष्यात येता ती काहीशी ओशाळली. भानावर येत म्हणाली ” ये.. .. ना.. . दिपू.. . ये. फार वर्षांनी आलीस,कुठे आहे पत्ता ? आम्हाला विसरलीस वाटतं?”
” मी कशी विसरेन ? लहानाची मोठी तुमच्याच घरात झाले. मागे एकदा सांगलीत आले होते तेव्हा समजले तुम्ही कुठे दुसरीकडे शिफ्ट झाला आहात. आता मी बेंगळुरूला जाॅब करते. आजच आले,दोन दिवसांत माझी ऐंगेजमेंट आहे. ही बातमी आधी माझ्या सखीला द्यावी,म्हणून धावत इकडे आले. कुठे आहे विजू ? मला भेटायच आहे तिला,आधी तिच्याशी खूप भांडणार आहे. मला सोडून तिने लग्न केले. मी मावशी झाले. हे.. . ही .. .. मला काही.. . कळवले नाही. मी मात्र तिला सोडून लग्न करणार नाही. “दिपा बोलत होती. अनुजाला दिपाच्या जागी विजू दिसू लागली. किती आत्मविश्वास आहे हिच्या बोलण्यात. क्षणभर तिचा हेवा वाटला. आज माझ्या विजूने ही अशीच उंच भरारी घेतली असती. पण प्रालब्धा पुढे कुणाचे चालते. एक मोठा उसासा सोडत अनुजा म्हणाली ” चल पोरी.. .. चल. भेट तुझ्या सखीला”
सावकाश पावले टाकत त्या घरातील हाॅल मध्ये आल्या, उजव्या बाजू जिन्याने वर गेल्या. दिपा नवीन घर न्याहाळत काकू मागून चालत होती. एका खोली जवळ त्या थांबल्या,त्यांनी हलक्या हातानी खोलीचे दार उघडले तर दारात काही खेळणी पडली होती. ती बाजूला करून आत गेल्या ” विजू.. . विजू.. . बघ
कोण आलं आहे?बघ .. . बघ. “हु नाही की चू नाही. शांत. शून्यात नजर हरवलेली विजू. स्वत:शी बडबडत होती,काही तरी विचित्र हातवारे करत होती,अंगात एक गाऊन अडकवला होता,त्याची ही तिला शुध्द नव्हती ,ती पुढ्यातील बाळाला झोपवत होती.
ही.. विजू.. . आहे? यावर कसा विश्वास बसणार माझा?माझ्या नजरेसमोर शाळा,काॅलेज मधील चुलबुली विजू उभी राहिली. नेहमी हसतमुख असणारी आणि प्रचंड उत्साही विजू. विजू म्हणजे आनंदाचे गाणं,विजू म्हणजे ऊर्जेचा स्त्रोत,विजू म्हणजे साक्षात चैतन्य,विजू म्हणजे एक लोभस रेखीव व्यक्तीमत्व. जे रंगमंचावर उभं राहिलं की आख्खा रंगमंच व्यापून टाकणार. सर्वाच्या गळ्यातील ताईत होती. बारावी पर्यंत आम्ही एकत्रच शिकलो. या पाच सहा वर्षांत असे काय झाले? की होत्याचे नव्हते झाले. मी नाही बघू शकत अशी मी हिला
क्रमशः…
© सौ.वंदना अशोक हुळबत्ते
संपर्क – इंदिरा अपार्टमेंट बी-१३, हिराबाग काॅनर्र, रिसाला रोड, खणभाग, जि.सांगली, पिन-४१६ ४१६
मो.९६५७४९०८९२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈