सौ. गौरी सुभाष गाडेकर
जीवनरंग
☆ परिवर्तन…भाग – 2 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆
(पूर्वार्ध : अविवाहित राणी वेगळं राहण्याचा विचार करत असल्याचं आई-वडिलांना सांगते……..)
ती असं काही बोलेल, असं मला अजिबातच वाटलं नव्हतं.
“काsssय? वेड लागलंय तुला? एक तरुण, अविवाहित मुलगी एकटीच राहणार! ” नाही म्हटलं तरी माझा आवाज चढलाच होता.
बाप रे! आई-बाबांना जाग आली तर? मी हळूच दार उघडून त्यांच्या खोलीत डोकावले. दोघंही गाढ झोपली होती. बाबांच्या घोरण्याचा आवाज खोलीत भरून राहिला होता. शिवाय पंख्याचा घुं घुं आवाजही होताच सोबतीला. त्यामुळे बाहेरचं बोलणं आत ऐकू येण्याची शक्यता तशी कमीच.
तोपर्यंत मीही थोडी शांत झाले होते.
“असं कर, राणी.सकाळी जाताना डबा घेऊन जात जा. दिवसभर तिथे काम कर. रात्री जेवायला आणि झोपायला इकडे ये.” माझा तोडगा सगळ्यांनाच पटण्यासारखा होता.
“पण आई, तिथे मी रात्री उशिरापर्यंत काम करू शकेन. इथे आजोबा ओरडत असतात, ‘लवकर झोप. पहाटे पाचला उठून काम कर.’ मी नाईट पर्सन आहे. मला पहाटे जाग नाही येत. त्यापेक्षा रात्रीच्या शांत वेळी काम करायला मला खूप आवडतं. आणि त्यावेळी कोणत्याही व्यत्ययाशिवाय काम होतंही चांगलं. माझा अभ्यासही मी रात्री जागूनच करायचे ना. तेव्हाही आजोबा असेच ओरडत राहायचे. पण तेव्हाचं एक सोड. मी लहान होते तेव्हा. पण आताही…..? मी स्वतःच्या पायावर उभी राहिल्यावरही? मी काय म्हणतेय, ते लक्षात घे, आई. यासाठीच मला एकटीला राहायचंय. दादा कसा राहतो एकटा?”
“अगं, त्याचं पोस्टिंग मुंबईबाहेर आहे. ते जर मुंबईत असतं, तर घरातच राहिला असता ना तो!” मी विजयी मुद्रेने ह्यांच्याकडे बघितलं.
हे काहीच बोलले नाहीत. त्यांची मनस्थिती द्विधा झाली असावी. एकीकडे त्यांचे ते ‘मी नाही मुलगा- मुलगी भेदभाव करत’ हे आदर्श आणि दुसरीकडे लाडक्या लेकीची काळजी.
तशी मीही एरव्ही भेदभाव करत नव्हते. पण ही गोष्ट वेगळी होती.तिची काळजी तर होतीच. शिवाय लोक काय म्हणतील, ही भीती.
“तुझा नक्की प्रॉब्लेम काय आहे, आई? मी एकटी राहणार हा की लोक काय म्हणतील हा?”
मी काहीच बोलले नाही.
“माझ्या एकटं राहण्याची तुला काळजी वाटत असेल, तर हे लक्षात घे. समजा, माझं लग्न झालं असतं, तर मी दुसरीकडेच राहत असते ना! तू म्हणशील, ‘हो.पण नवऱ्याबरोबर.’ पण समज, त्याच्या कामासाठी त्याला वरचेवर बाहेरगावी जावं लागलं असतं, तर त्यावेळी मी घरी एकटीच राहणार होते ना?”
तसं राणी बोलली, ते चुकीचं नव्हतं.
“आणि जर तू लोकांचा विचार करत असशील, तर मी त्यांची अजिबात पर्वा करत नाही. तूपण तो विचार करणं सोडून दे. हे बघ, आई. आपलं कुटुंब जुन्या विचारांचं आहे. त्यामुळे तुला हा विचार क्रांतिकारी वाटतोय. पण सद्या मुंबईत कितीतरी मुली, कितीतरी बायका एकट्या राहतात, अगं.”
“पण तुझं काम आणि घर सांभाळणं – दोन्ही कसं जमणार तुला?”मी शस्त्र बदलून लढायला सुरुवात केली.
“आई, तू आणि आजीने घर सांभाळायचं व्यवस्थित ट्रेनिंग दिलंय मला. त्या दृष्टीने बघितलं, तर मी दादापेक्षा उजवी आहे त्या बाबतीत. घर आणि काम – दोन्ही व्यवस्थित मॅनेज करू शकेन. शिवाय निशाची बाई आणि स्वयंपाकीण -दोघी तयार आहेत माझ्याकडे काम करायला.”
“याचा अर्थ, तू सगळा विचार केलायस, तुझा निर्णयही घेऊन झालाय. आता तू फक्त आमच्या कानावर घालते आहेस.” नाही म्हटलं, तरी माझा आवाज कापत होता.
“अगं आई, एवढा मोठा निर्णय मी सांगोपांग विचार न करता आणि सगळं प्लॅनिंग न करता कसा घेईन?मी दादाशीही या बाबतीत बरेचदा चर्चा केली. त्यानेही साधकबाधक विचार करून मला संमती दिली. म्हणूनच मी निशाला होकार दिला.”
“म्हणजे तू दादाशी चर्चा केलीस! तीही बरेचदा!आणि आम्हाला विचारावंसं तुझ्या मनातही आलं नाही आतापर्यंत! ” आता मात्र माझ्या डोळ्यांनीही मला दगा दिला.
“हेच. तू रडणार, हे ठाऊकच होतं मला. मला भावनांच्या वादळात अडकायचं नव्हतं. सर्व दृष्टीने नीट विचार करून योग्य तो निर्णय घ्यायचा होता मला.”
आता मात्र मला सगळ्यांचाच राग आला. मग मी शेवटी ह्यांच्यावरच चिडले,”बघितलंत ना? तिचं शिक्षण संपलं, तेव्हाच मी तुम्हाला सांगत होते, तिच्या लग्नाचं बघूया, म्हणून. पण तुम्ही तिच्या बिझनेसच्या योजनांवर भाळलात. आणि आता मॅडम एवढ्या स्मार्ट झाल्यात, की त्यांना आपल्या जन्मदात्या आईवडिलांचं मत विचारात घेण्याचीही गरज वाटत नाही. उद्या उठेल आणि म्हणेल – मला लग्नच करायचं नाही.”
क्रमश:…
© सौ. गौरी सुभाष गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
पिढ्यांन मधले ताणे बाणे छान टिपले आहेत