श्री उदय गोपीनाथ पोवळे

? जीवनरंग ❤️

☆ तुम्ही सध्या काय करता ? – भाग -1 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

नमस्कार राव ….. ओळखलेत ना मला. अहो तुम्ही मला खूप वेळा बघितले आहे. हां बरोबर- तोच तो. बाईकला आमच्या पक्षाचा झेंडा लावून फिरणारा. आमच्या म्हणजे भाऊ ज्या  पक्षात असतात त्या पक्षाचा झेंडा. ते आपल्या नाक्यावर भाऊंच्या वाढदिवसाच्या दिवशी भाऊंच्या फोटोचा फ्लेक्स लागतो ना त्याच्या खाली बघा माझा फोटो असतो…. हां तोच तो..मी…. भाऊंच्या  अनेक विश्वासातल्या कार्यकर्त्यातला एक. गेली दहा वर्षे भाऊंसाठी काम करतो. भाऊंसाठी काय पण काम करतो. आता थोडा सिनिअर झालोय. आपले भाऊ मला लय इज्जत देतात. बरोबर…. ही  बाईक पण भाऊंनीच दिली आहे. मानतात आपल्याला. भाऊंसाठी लॉकपमध्ये पण जाऊन आलोय तेव्हापासून आपली इज्जत लय वाढली. नशीब लागते भाऊंच्या एवढ्या जवळ जायला.

हां  …. तर विषय असा आहे… तिशीतल्या माझे लग्न करायला माझ्या घरचे मागे लागले आणि त्यांच्या आग्रहाखातर मी मुलगी बघायला गेलो तर तिचा बाप मला विचारतो, “तुम्ही सध्या काय करता “– अरे हा काय प्रश्न आहे काय, अरे तुम्ही किती कमवता असे विचारा ना…. तुमच्या मुलीला सुखी ठेवणार का… ते विचारा ना. काय तरी भलताच प्रश्न विचारला.  माझे डोके फिरले. मी तिकडेच मुलीला रिजेक्ट केला. आता त्याला काय सांगायचे, माझ्या सुखी जीवनाची कथा. तुम्ही आपले म्हणून तुम्हाला सांगतो.

माझा रोजचा दिवस फुल्ल बिझी असतो. रोज रात्री उशिरा झोपतो म्हणून सकाळी १० ला उठतो आणि कडक गरम पाण्याने आंघोळ करून सफेद इस्त्रीचे शर्ट आणि मळकी असली तरी मळकी दिसत नसलेली जीन्सची पॅंट घालून, घरातल्या देवांना नमस्कार करून, कपाळावर दोन भुवयांच्या मध्ये उभे कुंकू लावतो आणि घराबाहेर पडतो. दहा वर्ष्यापुर्वी बाहेर पडतांना आईकडून नाही तर बहिणीकडून १०० रुपये घेऊन पडायला लागत होते. बाईकमध्ये ५० चे पेट्रोल भरूनच– पुढे ५० रुपये मामलेदारची मिसळीसाठी लागायचे. पण आता आपण घरी पैसे नाय मागत. आता आपण आपल्या पायावर उभा आहे. म्हणजे भाऊंचा वरदहस्त असल्याने कसली कमी नाही.

हां तर ….. तर्रीवाली मिसळ हाणली कि पुढे स्ट्रेट, सरळ स्वामींच्या मठात जाऊन त्यांच्या पादुकांवर डोके ठेवायचे. लय भारी वाटते. भाऊंनी एक सांगितले आहे देवाकडे तोंड करून आपण काय बी मागायचं, देव आपल्या पाठीशी कायम असतो, म्हणूनच देवाकडे एकदा का पाठ झाली की आपण काय पण करायला मोकळे. तेथून कुठेही टाइमपास न करता भाऊंच्या पक्षाच्या ऑफिसमध्ये हजेरी लावायची. तिकडे पक्या, मध्या, सुन्या आलेले असतात. बरोबर १२ च्या आसपास भाऊ आले की, पहिले त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घ्यायचा. हां…. आपण जगात दोन जणांच्या पायाला हात लावतो. एक स्वामी समर्थ आणि आमचे भाऊ. भाऊंनी काही काम सांगितले तर ते हाती घ्यायचा. आपल्यामागे तसे १०० पोरं उभी करायची ताकद आहे हे भाऊंना माहित आहे म्हणून एखादी सभा किंवा शक्ती प्रदर्शन करायचे असेल तर भाऊ माणसं जमवायची जबाबदारी माझ्यावरच देतात. दोन तीन तास ऑफिसमध्ये काढले की ऑफिसमध्येच भाऊंच्या कृपेने दोन लंच बॉक्सचे डबे येतात. तेथेच जेवण करून जर काही काम नसेल तर टेबलावर डोके ठेऊन एक डुलकी मारायची. इलेक्शन आले की ते डुलकी, झपकी वगैरे विसरायला लागते. तेव्हा लय खूप काम असते. आपल्या वार्डातला हिंदूंचा एरिया कुठला, मुस्लिम एरिया कुठला ह्याचा पूर्ण अभ्यास करून त्यानुसार मतदारांना काही ना काही वाटप करायला लागते.

क्रमशः…

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments