? जीवनरंग ❤️

☆ अवघा रंग एक झाला – भाग १ – अज्ञात ☆ संग्राहिका: सुश्री प्रतिमा जोशी ☆

‘माई मी निघते, पोळी भाजी करून ठेवली आहे, दुपारी मावशी येतील, त्यांना वरण भाताचा कुकर लावायला सांगा, रात्रीचं मी बघेन आल्यावर…’

माई मख्ख चेहेऱ्याने अनुजाच्या सुचना ऐकत होत्या. त्यांच्या चेहेऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती, म्हणजे आजपण दिवसभर त्या एकट्याच असणार. नात काय शाळेतून आली की जेवेल आणि क्लासला जाईल. तिथून आली की खेळायला मैत्रिणीकडे पळेल.

अनुजाचं त्यांच्या कडे लक्ष गेलं.

काय झालं माई ? नाराज आहात का ? कसला राग आलाय का ?माझं काही चुकलंय का ?”

‘तुझं काही चुकलं नाहीये ग बाई, माझंच चुकलंय. मीच एक अडगळ होऊन राहिले आहे  तुमच्या घरात…” बोलता बोलता त्यांचा कंठ दाटून आला.

आज काहीतरी वेगळाच नूर दिसतोय माईंचा, त्या सहसा असा त्रागा करत नाहीत. अनुजाने पर्स खाली ठेवली त्यांच्या जवळ बसत तिने विचारलं,

‘काय झालं माई ? मनात काय असेल ते बोलून मोकळ्या व्हा म्हणजे तुम्हाला हलकं वाटेल’.

माईंनी एकदा अनुजाकडे बघितले, तिच्या आवाजात, नजरेत आर्जव होतं, त्यांना एकदम अपराधी वाटलं. खरं तर त्यांना तक्रार करायला काही जागा नव्हती. घरात सगळ्या सोयी होत्या, मुलगा, सून, नात सगळी त्यांच्याशी नीट वागत होती. त्यांचं औषधपाणी, व्यवस्थित होत होतं. फक्त प्रश्न होता तो त्यांच्या समोर अजगरासारख्या पसरलेल्या वेळेचा…

“कंटाळा येतो गं दिवसभर, काही काम न धाम, टिव्ही बघितला की डोकं दुखतं, तुम्ही सगळी आपापल्या व्यापात…. दिवस खायला उठतो बघ… पण हे बघ तुम्हा कोणाची काही चूक नाहीये…. तुम्ही माझं सगळं व्यवस्थित करता… ‘सुख दुखतं’ म्हणतात ना तसं झालंय माझं…

अनुजा जरा विचारात पडली. मग म्हणाली, “तुम्हाला वाती करायला जमतील का ?

“हो… बोटं दुखतात त्याने सुद्धा… पण थांबून थांबून करीन.”

“ठीक आहे, मी कापूस आणून ठेवीन तुम्हाला कंटाळा आला की तुम्ही वाती करत जा.”

अनुजा लहान मुलीची समजूत काढावी तशी बोलत होती. माईंनी मान डोलावली तशी अनुजा म्हणाली,

“निघू मग मी आता ? रात्री लवकर येते….”

अनुजा गेली आणि त्या घरात एकट्याच उरल्या….इतक्यात बेल वाजली….

त्यांनी दार उघडलं…. खालच्या वाण्याच्या दुकानातला मुलगा कापूस घेऊन आला होता.

अनुजाच्या तत्परतेचं त्यांना कौतुक वाटलं… त्यांनी पिशवी टेबलावर ठेवली जेवण झाल्यावर त्यांनी  पिशवीतून कापूस पुढे काढला… तो फुटबॉल एवढा गोळा बघून माईंना हसूच फुटलं… एवढ्या कापसाच्या हजार-दीड हजार वाती होतील… आणि घरात वर्षात एखादं दुसऱ्या वेळी निरांजन लावलं जातं… काय उपयोग इतक्या वाती करून ?

विचार मागे सारत त्यांनी वाती वळायला सुरवात केली. इतक्यात ऋत्विका तिथे आली.    ‘आजी मी पण करू ? नको तुला नाही जमणार.

“तू शिकवं ना मला.”

त्या दाखवतील त्याप्रमाणे ऋत्विका पण प्रयत्न करू लागली आणि विशेष म्हणजे तिला जमायलाही लागल्या

तिने केलेल्या वाती माई थोड्या सुधारून घेत होत्या….पुढचे दहा बारा दिवस माईंना एक उद्योगच झाला. वाती वळण्याचा… पण वेळही चांगला जात होता… वैषम्य एवढंच होतं की, एवढ्या वातींपैकी चार वातीसुद्धा घरात वापरल्या जाणार नव्हत्या…

एवढी कशी अश्रद्ध माणसं ? एकही परंपरा पाळावी असे वाटू नये यांना ?

अनुजा रोज सकाळी बाहेर पडत असे ती संध्याकाळीच परते…. आज तर सात वाजून गेले तरी अनुजाचा पत्ता नव्हता… शेवटी ७.३० ला आली… खूप थकलेली वाटत होती, हातात कसली तरी गुंडाळी होती…आल्या आल्या तिने माईंना हाक मारली…

माई आल्या… अनुजाने गुंडाळी उलगडली… आणि…. माईंच्या अंगावर काटा उभा राहिला… ते विठ्ठलाचे चित्र होते… मूर्तिमंत  पांडुरंग. त्यांच्या कडे फ्रेम होती… अगदी तसाच विठोबा रेखाटला होता… वत्सल, आश्वासक… माईंचे हात जोडले गेले.  स्वतःच्याही नकळत….

कोणी काढलं हे चित्र ? भानावर येत माईंनी विचारलं….

माई तुम्ही ऐकून थक्क व्हाल, हे चित्र करुणा नांवाच्या एका अनाथ, दिव्यांग मुलीने काढलंय… तिला दोन्ही हात नाहीयेत… पायाने काढलंय तिने हे चित्रं… तिलाच चित्र काढायला शिकवायला जात होते पंधरा दिवस…

“अगं किती सुरेख चित्र काढलंय… आपल्याकडे एक तसबीर होती पांडुरंगाची… अगदी हुबेहूब तसंच चित्र आहे.”

“अगदी बरोबर, कारण त्या फ्रेम वरूनच तिने हे चित्र काढलंय… मीच नेली होती तिला दाखवायला…  तिने काढलेल्या ह्या चित्राला स्पर्धेत पाहिलं बक्षीस मिळालं…

“आता ह्या चित्राचं काय करणार ?”

“काही नाही… खास तुम्हाला दाखवायला आणलंय.”

‘मी काय म्हणते हे चित्र आपण सोसायटीच्या लॉबी मध्ये लावूया, बाजूला चित्र कोणी काढलं त्याची माहितीही लिहू… नाहीतरी उद्या एकादशी आहे…’

“अरे वा ही आयडिया माझ्या डोक्यातच नाही आली…..फक्त सेक्रेटरींची परवानगी घेऊ म्हणजे झालं.”

झालं… सगळे कामाला लागले आणि चित्र खाली लागलं… बाजूला करुणाची माहिती… आणि बाजूला एक वही ठेवली… त्यात अभिप्राय लिहायचे होते…

क्रमश:…

लेखक – अज्ञात   

संग्राहिका – सुश्री प्रतिमा जोशी– संवादिनी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments