श्री मंजुषा सुनीत मुळे
☆ जीवनरंग ☆ एक्सचेंज ऑफर ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
मॉर्निंग वॉकहून परततांना, वाटेवरच्या एका हॉलकडे आपोआपच लक्ष जात असे. वेगवेगळ्या प्रदर्शनांसाठी आणि सेल्ससाठीच तो हॉल बांधलायया विचाराने रोजच हसू यायचं. आज तो हॉल आठ वाजताच उघडलेला होता, आणि तिथे माणसांची रांग लागलेली होती. उत्सुकतेपोटी तिथे जरा रेंगाळले. दारावर एक पाटी टांगलेली दिसली ….” फ्री एक्सचेंज ऑफर “…. कुणातर्फे ते काही लिहिलेलं नव्हतं. रविवार असल्याने तिथे थोडा वेळ घालवायला हरकत नव्हती. म्हणून जाऊन त्या रांगेत उभी राहिले. सगळ्यांच्याच हातात काही जुनाट वस्तू होत्या. चेहेऱ्यावर उत्सुकता ओसंडून वाहत होती. हॉलच्या दारात एक दणकट माणूस उभा होता. संयोजक असावा. थोड्याच वेळात त्याने पहिल्या २५-३० माणसांना आत बोलावलं. त्यात शेवटचा नंबर माझा होता.
” हातातलं सामान त्या शेल्फात ठेवा, आणि तिथे मध्यभागी ठेवलेल्या मोठ्या टेबलभोवती उभे रहा “…. त्याने जणू हुकूमच सोडला. हॉलमध्ये इतर एकही वस्तू नसल्याने आधीच्या उत्सुकतेच्या जागी फसवल्याचा संशय दिसायलालागला होता…. दार बंद करून संयोजक तिथे आला. त्याने प्रत्येकाला एकेक थाळी दिली. डोळे बंद करायला सांगितले. मग जादूची छडी फिरवावी तशी हातातली काठी सगळ्यां-भोवती फिरवली. त्याचा डोळा चुकवून मी हातातली थाळी टेबलखाली सरकवली, आणि गुपचुप त्याच्याचमागे लपले.
…..” आता प्रत्येकाने स्वतःच्या आयुष्यात अजिबात नकोशी आणि असह्य वाटणारी फक्त एक गोष्ट डोळ्यासमोर आणा आणि थाळीत हात ठेवा. आणि आता थाळी टेबलवर ठेवा..हां, आता ऐका. तुम्ही स्वतःची थाळी सोडून बाकीच्या पैकी तुम्हाला जी थाळी आवडेल ती एक थाळी उचलायची आहे. आणि कोणालाही रिकाम्या हाताने परत जाता येणार नाही. वेळ मर्यादित आहे. कळलय? आता उघडा डोळे “… आता प्रत्येकाच्या थाळीत काही ना काही दिसायला लागलं ….. प्रचंड गोंधळून सगळे नुसतेच टेबलभोवती फिरायला लागले… दचकत होते …. माना नकारार्थी हलत होत्या. मी नीट निरखून त्या टेबलकडे पाहिलं, आणि प्रचंड दचकले…..बाप रे …..नकोशा गोष्टी? त्रास, चिंता आणि दुःख यांची केवढी व्हरायटी होती त्यावर …. विद्ध झालेली मने…. पोखरलेले मेंदू…. मनावरचे खोलवर घाव आणि मनाच्या भळाभळा वहात असणाऱ्या जखमा, काळवंडलेल्या विझलेल्या असहाय्य नजरा…असाध्य रोगांच्या वेदनांनी तडफडणारे अवयव …. कुठे घरावरचे छप्पर टिकवतान्ना त्राण संपलेले हात पाय….. भुकेने तडफडणारे पोटाचे हताश खड्डे आणि त्यांना धरून लोंबकळणाऱ्या काही आशाळभूत नजरा…. तर कुठे स्वतःची संपत्ती चोरीला जाऊ नये म्हणून तगमगणारी अधाशी मने…. बाप रे बाप…. ते सगळं बघतांना असह्यतेखेरीज कुठली भावना जाणवतच नव्हती. डोळे विस्फारून सगळे नुसतेच टेबल भोवती फिरत होते. तिथून निसटण्याची संधी शोधत होते. … तेवढ्यात संयोजक हातातली काठी उगारत ओरडला…..”चला घ्या पटापट कुणाला काय चालणार आहे ते. बाहेर रांग वाढते आहे.”
सगळेच एव्हाना रडकुंडीला आले होते. तो आणखी मोठ्याने ओरडला.. “आवरा …. आणखी पाच मिनिटं देतो. उचला पटकन हवी ती थाळी. एवढी चांगली एक्सचेंज ऑफर पुन्हा कधीही मिळणार नाही तुम्हाला. ” आता सगळ्यांचा नाईलाज झाला. त्याची पाठ वळताच प्रत्येकजणच घाई -घाईने टेबलजवळ गेला, आणि गुपचुप स्वतःचीच थाळी शोधून उचलून निघू लागला. सगळ्यांची ती धावपळ तिरक्या नजरेने पहात, खट्याळपणे गालातल्या गालात हसत असलेला तो, त्याच्यामागेच लपलेल्या मला स्पष्ट दिसत होता. टेबलवरच्या सगळ्या वस्तू संपल्या, तशी खालच्या रिकाम्या थाळी कडे तीक्ष्ण नजर टाकत त्याने गर्रकन वळून माझ्याकडे पाहिलं. भीतीने मी थरथरायला लागले, तसा गडगडाटी हसत तो म्हणाला, ” लबाडी केलीस नामाझ्याशी? पण चल, माफ करतो तुला. कारण या सगळ्यांमध्ये तू एकटीच विवेकी आणि विचारी दिसतेआहेस…” आणि कौतुकाने त्याने माझ्या पाठीत धपाटा घातला …….
……….. आणि मी दचकून खाडदिशी जागी झाले. बाप रे ….. म्हणजे हे सगळं स्वप्न होतंतर. पण मग प्रकर्षाने जाणवलं की, त्या स्वप्नाइतकं विदारक वास्तव दुसरं कुठलंच नसावं.
‘परदुःख शीतल’ असं मला तरी यापुढे कधीच वाटू शकणार नाही हे मात्र नक्की. कारण मनापासून पटले होते की……. दगड मातीचे असोत, की दुःख वेदनांचे असोत, डोंगर दुरूनच साजरे असतात.
© सुश्री मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२.
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
Khoop ch chhaan lihilay!! Pratyaksha samor ghadtay asa bhaas ch hoil janu. Sundar vichar vegalya reetine uttam mandala ahe. Lihitya raha ani share karat raha.
फारच सुंदर