सौ राधिका भांडारकर
जीवनरंग
☆ स्थळ…. भाग – 1 ☆ सौ राधिका भांडारकर ☆
रात्री झोपायचीच तयारी करत होते.
गोळ्या घेतल्या. नाईट क्रीम लावली. डोळ्यात ड्रॉप्स टाकले. पांघरुणाची घडी उलगडली. पुस्तक हातात घेतलं. तेवढ्यात फोन वाजला.
पलीकडून आवाज.
” काकू झोपला नाही ना अजून?”
” नाही. तुझा फोन उचलला म्हणजे नक्कीच ना. हं बोल. “उद्या सकाळी सात वाजता आम्ही तुम्हाला घ्यायला येतो. तयार रहा. आपल्याला कोल्हापूरला जायचे आहे.”
” अग पण”
” नाही तुम्ही काही कारण सांगू नका. तुम्ही येणार आहात. “अग पण”
” हे बघा अनुभव साठी एक चांगलं स्थळ आलंय. फेसबुक वर मुलीचे फोटो पाहिलेत. चांगली वाटते. बाकी सगळं सविस्तर मी तुम्हाला सांगेनच. मुख्य म्हणजे अनुभव ही मुलगी बघायला तयार झालाय.
” तो येणार असेलच ना?”
” नाही ना. पण तो म्हणाला, तुम्ही भेटून घ्या. तुम्हाला पटलं तर आपण पुढे जाऊ.
म्हणताना मी म्हणाले,” बरं येते. सकाळी तयार राहते.”
पण मनात दुसरंच होतं. एक तर मला अशा प्रकारच्या मुलाखतींना उपस्थित राहणे आवडत नाही. अनुभव का येणार नव्हता? लग्न तर त्याला करायचं ना? आणि लोकेश, दीपा तरी हे असं कसं चालवून घेतात?
गेली दोन-तीन वर्ष अनुभवचं वधु संशोधन चालू आहे. खरं म्हणजे भक्कम वैवाहिक पार्श्वभूमी असतानाही, कुठे मनासारखं जुळत नव्हतं. उत्तम शिक्षण. उत्तम नोकरी. भरभक्कम बँक बॅलन्स. पुण्यात प्रशस्त फ्लॅट. दाराशी महागड्या गाड्या. म्हणायला, अनुभवला थोडसं टक्कल होतं. पण तो काही मोठा अडथळा नव्हता. म्हणजे नसावा. म्हणजे काही मुलींनी, त्याला त्या कारणास्तव नाकारलं होतं. पण बऱ्याच ठिकाणी अनुभवच… “काहीतरीच काय मला मुळीच क्लिक होत नाही” असे म्हणून मोकळा व्हायचा.
आज-काल तर त्यांनी अशा बैठकींना येण्याचही बंद केलं होतं.
दीपाची आणि त्याची खूप भांडणं व्हायची. वाद व्हायचे.तुझं लग्न तूच का नाही जमवलंस इथपर्यंत विषय ताणला जायचा. शेवटी अनुभव उठून बाहेर जायचा. आणि मग तो विषय संपायचा. नव्हे तिथेच अर्धवट राहायचा.
क्रमश:…
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈