सौ राधिका भांडारकर
जीवनरंग
☆ स्थळ…. भाग – 3 ☆ सौ राधिका भांडारकर ☆
(दीपा काकूला सांगते,”या मुलांना आपल्या चिंता कळतच नाही)
गावात शिरल्यावर लोकेशने नेमका पत्ता विचारण्यासाठी गाडीचा चा वेग कमी केला.
रिक्षावाल्यांना विचार, पादचाऱ्यांना विचार, रस्त्यावर बसलेले भाजीवाले .. फुल वाले.. बरंच मागेपुढे केल्यावर आणि काही दिलेल्या खुणा सापडल्यावर, लोकेशन मुलीच्या वडिलांना फोन लावला.
” जवळच आहात. आता डावीकडे वळून हनुमानाच्या मंदिरापर्यंत या. तिथेच थांबा. मी सुयश ला पाठवतो.”
घर रस्त्यापासून बरच आतल्या भागात होतं. नवी जुनी घरं होती. घरांच्या बांधणीवरुन, आजूबाजूच्या वातावरणावरून ,तिथे राहणाऱ्या लोकांची जीवनपद्धती ,वर्ग सर्वसाधारणपणे ओळखता येत होते.
लोकेश ची लांबलचक मर्सीडीझ त्या गल्लीच्या कोपऱ्यावर अगदीच विसंगत वाटत होती.
सुयश तिथे उभा होता स्कूटर घेऊन.
लोकेशन खिडकी उघडली.
सुयश तत्परतेने म्हणाला,” या काका इथे जवळच आहे घर. माझ्या मागून या.”
” गाडी जाईल ना ?”
“हो आरामात. पार्किंगला जागा आहे.”
काय गंमत असते ना सगळेच पहिल्यांदा भेटत होते. कुणीच कुणाला ओळखत नव्हते.
घर पहिल्याच मजल्यावर होतं. दरवाजातच आई वडील उभे होते. उंबरठ्याबाहेर रांगोळी होती. दाराच्या चौकटीत तोरण होतं, भिंतीला लागून चार-पाच कुंड्या होत्या. त्यात तुळस, मोगरा, जास्वंद फुलले होते.
” या या! घर सापडायला काही त्रास झाला नाही ना? इथे आता सगळं नव्याने बांधकाम चाललंय. गेल्या दहा वर्षांत प्रचंड कायापालट झालाय इथला.”
अग! पाणी आण ग!”
सुयशने न पटकन कोपर्यातले टेबल मध्ये ठेवलं. आईने पाण्याचे ग्लास त्यावर ठेवले.
” कसा झाला प्रवास? तसा रस्ता चांगला आहे. हायवे चौपदरी असल्यामुळे वेगाने येता येते. आता नवीन सरकार आल्यापासून, रस्त्यांची कामे फार चांगल्या रीतीने चालू आहेत. वगैरे वगैरे
लोकेश तसा मोकळा आहे. त्यांने त्या लहानशा घरात फेरफटका मारून घेतला.
” छान आहे काका तुमचं घर. हा भिंतीवरचा फॅमिली फोटो वाटतं तुमचा? वा काय मस्त हवा उजेड!”
अशा रातीने, हवापाणी, सरकार, सुधारणा, आगामी निवडणुका, यावर गप्पा झाल्या. नंतर एकदम विषय संपल्या सारखे झाले. मुख्य विषयाची काही सुरुवात होत नव्हती. दडपण खूपच होते. आई, सुयश आत बाहेर करत होते.
क्रमश:…
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈