सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ स्थळ…. भाग – 5 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(शिवांगी आतल्या खोलीत गेली.तिच्यापाठोपाठ तिची आईही गेली…आता पुढे.)

बाहेरच्या वातावरणात एक अवघडलेपण होतं .शिवांगी आतल्या खोलीतून बाहेर आली.

तिने  छान हसून पाहिलं सर्वांकडे. आईने डोळ्यांनी इशारा केला म्हणून, तिने आम्हा सर्वांना वाकुन नमस्कार केला.  काहीसे विस्कटलेले, मानेवर बांधलेले, खांद्यापर्यंतचेच  केस. साधाच फिकट रंगाचा टॉप आणि जीन्स. गळ्यात कानात काहीच नाही. फक्त हातावर एक घड्याळ. 

दीपाच्या  मनात आले अनुभवला लांब केस आवडतात. आधुनिक रहाणी, थोडी फॅशन त्याला आवडते. शिवांगी फारच साधी होती. मुळात आपली छाप पडावी म्हणून तिने कुठलाच विशेष प्रयत्नही केला नव्हता.

मग लोकेशनं तिला विचारलं,” कसा झाला सेमिनार?”

“छान चाललाय. मी मध्यंतरात घरी आले. पण मला परत जायचंय् .”

शिवांगी च्या आईने तिच्याकडे अगदी नाराजीने पाहिले.

पण तिचे वडील   म्हणाले,” शिवांगीला  लहानपणापासूनच अभ्यासाची आवड आहे. खूपच सर्व गोष्टी गांभीर्याने करते. एकदा जबाबदारी स्वीकारली की ती पार पडेपर्यंत तिच्या डोक्यात दुसरा विषय नसतो.”

“चांगली गोष्ट आहे ही.” मी म्हणाले.

“पण घरातल्या कामात मागे नाही बरं का?” तिच्या आईने काहीतरी तुटत जाणार सांधण्याचा प्रयत्न केला.

मग मी  या संभाषणात भाग घेतला. काही प्रश्न विचारले. पण एकंदरच सगळ्या संभाषणाच्या केंद्रस्थानी केवळ शिवांगी असल्यामुळे तिनेच विषय तोडला.

“नाही काकू. मला काही स्वयंपाकाची वगैरे इतकी आवड नाही. ती आवड आमच्या सुयशला  आहे. हं! आणि एक सांगते, मला कसल्याच कला अवगत नाहीत. म्हणजे चित्रकला, भरत काम, वगैरे. माझं मन अशा गोष्टीत रमत नाही. गाणी ऐकायला मला आवडतात. पण गाता वगैरे मुळीच येत नाही. पण जीवनाबद्दलचे  माझे निश्चित आराखडे आहेत. मला काय करायचंय, काय बनायचे आहे हे मी पक्क ठरवलं आहे.माझी दिशा मला माहित आहे.

माझे इंटरेस्ट्स मला माहित आहेत.”

तिच्या बोलण्यात कमालीचा आत्मविश्वास होता. तिच्या संपूर्ण साध्या व्यक्तिमत्त्वात एक निश्चित चमक होती. तिच्यात कुठल्याही प्रकारचं, पाहायला आलेली मुलगी किंवा यंदा कर्तव्य असलेली मुलगी ही सामुग्री नव्हती. तिला ना होकाराची परवा होती ना नाकारले जाण्याची चिंता होती!  घरात आलेल्या कुणाशी सहज गप्पा माराव्यात इतका मोकळेपणा तिच्यात जाणवला. खरं म्हणजे अनुभव सारख्या मुलाचा होकार मिळावा म्हणून कित्येक मुलींनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले असतील. पण हिच्या ते गावीही नव्हतं. ही वेगळी होती.

क्रमश:…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments