सुश्री गायत्री हेर्लेकर
जीवनरंग
☆ स्वामिनी मुक्तानंदा – भाग -1 ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर ☆
तपोवन आश्रमातील सत्संग हॉल.
ऊद्यापासुन सुरु होणाऱ्या शिबिराच्या परिचय कार्यक्रमासाठी जमलेले शिबिरार्थी उत्सुकतेने वाट बघत होते.
दुपारी पडलेले रणरणते ऊन,मधेच जोरदार पाऊस,अन् आता धुसर वातावरण—निसर्गाच्या लहरीपणा अनुभव देणारा हा हिमाचलप्रदेश.
बरोबर ४-२५ ला स्वामिनी मुक्तानंदांनी मागील भव्य प्रवेश द्वारातुन आत पाऊल टाकले.सर्वानी उभे राहुन अभिवादन केले.स्वामिनी हात जोडुन प्रत्युत्तर देत हसतमुखाने,शांत गतीने मधल्या कार्पेटवरुन व्यासपीठाकडे निघाल्या.
अंगावर संन्याशिनीची भगवी वस्त्रे, वर भगवीच शाल, गळ्यात तुळशीमण्यांची माळ. उंच शिडशिडीत बांधा, गोरा रंग यामुळे साठी उलटून गेली तरी मुळचे देखणेपण लपत नव्हते. केसात रुपेरी झाक आली असली तरी मानेवरचा अंबाडा भरगच्च होता. दोन अडीच तप – ३० वर्षांपेक्षाही जास्त –केलेल्या साधनेने मुद्रेवर, शांत, प्रसन्न भावाचे तेज झळकत होते.
व्यासपीठाच्या मागील शिशवी देव्हार्यातील गोपाळकृष्णाच्या सुंदर मूर्तीला वंदन करुन त्या स्थानापन्न झाल्या. डोळे मिटले.
ओम् ओम्, ओम्
ओंकार, नंतर, गुरुवंदना, नित्याचेच श्लोक, शांतीपाठ– अशी प्रर्थना-हॉलच्या शांत वातावरणात घुमु लागली.
हलकेच डोळे ऊघडुन हॉलवर नजर फिरवली. शिबिरार्थींची संख्या मर्यादित होती. नव्हे त्यांचा तसा आग्रहच असायचा. परत एकदा त्या शांतपणे प्रत्येकाचा चेहरा न्याहळु लागल्या. हॉलच्या डाव्या बाजुला मागील कोपऱ्यात एका गोरापान, मुलगा दिसला.
जेमतेम १२-१४ वर्षांचा असेल, –त्याचे डोळे –त्यातला वेगळाच भाव, —-त्यांची नजर तिथुन हटेना. त्यानेही आपले डोळे भिडवले.
जणूकाही अनेक प्रश्ण विचारले—-आणि उत्तरे, आधारच मागत होते ते डोळे.. आणि डोळ्यापुढे उभा राहिला —आशुतोष—शेवटची भेट झाली तेंव्हा एवढाच, अन् असाच सैरभैर डोळ्यांनी पहात होता आपल्याकडे,
मनाची तगमग–अस्वस्थता,—
आयोजक गंगासागरजींनी कार्यक्रम सुरु करण्यास अनुमती विचारली.
मिशन, अध्यात्मिक अभ्यासाचा प्रसार,जगभर पसरलेले कार्यकर्य्यांचे शिस्तबद्ध संघटन, सिध्द मार्गदर्शक गुरुपरंपरा, अशी प्राथमिक माहिती गंगासागरजींनी दिली.
तोपर्यंत स्वामिनींनी स्वतःला सावरले. पण नंतर कार्यक्रम पुर्ण होईपर्यंत डाव्या बाजुला —मागच्या कोपर्याकडे डोळे जाऊ दिले नाहीत.
आवारातील निवासस्थानी गेल्यावरही मागच्या रुंद खिडकीजवळ बसल्यावर काचेतून चंद्राच्या धुसर प्रकाशात चकाकणारे बर्फाच्छादित सुळके, आणि दुरवर पसरलेले दिवे या मधुन तेच डोळे आपल्याकडे रोखून पहात आहेत, प्रश्ण विचारत आहेत असेच वाटु लागले.
तेवढ्यात सुमुखी आली. सुमुखी—जेमतेम ३०, ३२ वय.
दोन मुलांचा बालवयात मृत्यु आणि नंतर मुल होऊ शकणार नाही म्हणुन नवर्याने केलेले दुसरे लग्न–यामुळे निराश होऊन आत्महत्या करायला निघालेली –योगायोगाने आश्रमात आली होती, आणि अध्यात्मिक रुची नसल्याने स्वामिनींची मनापासुन सेवा करणारी—शिष्या, परिचारिका
–नेहमीप्रमाणे रात्रीचा फलाहार आणि दुध पुढे केले.पण कोणताच प्रतिसाद नाही, म्हणुन तिने “स्वामिनी —तब्येत बरी नाही का?” विचारल्यावर तुटक उत्तर —काहीसे रागावूनच दिले.
तसं तर स्वामिनी सहसा कोणावर रागावत नसत. कारण राग—-क्रोध म्हणजे स्वतःलाच केलेली शिक्षा हे गुरुदेवांनी सांगितले होते. तसे फारसे प्रेम, आपुलकीही दाखवत नसत. क्रोध आणि प्रेम दोन्हींवर त्यांनी तपंसाधनेने नियंत्रण मिळवले होते.
शिबिराचा आज पहिला दिवस,.
पहाटे ध्यानवर्ग, मग गुरुस्तवन, दुपारी गीताप्रवचन, असा सर्व दिनक्रम व्यवस्थित चालु होता. स्वामिनी ईतर दैनंदिन कामात व्यस्त होत्या. कारण गंगासागरजींसारखे अनुभवी, निष्णात सर्व व्यवस्था चोख ठेवीत असत.
संध्याकाळी विशेष मार्गदर्शनपर प्रवचन मात्र स्वामिनींचे. गुरुदेवांच्या समाधीमंदिरातील आरती झाल्यावर स्वामिनी प्रवचनासाठी मधल्या पायवाटेने हॉलकडे निघाल्या.
तेवढ्यात कोणीतरी समोर येऊन त्यांच्या पदस्पर्शासाठी वाकले.
क्रमशः…
© सुश्री गायत्री हेर्लेकर
201, अवनीश अपार्टमेंट, कोथरुड, पुणे.
दुरध्वनी – 9403862565
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈
छान