सुश्री गायत्री हेर्लेकर

 

? जीवनरंग ❤️

☆ स्वामिनी मुक्तानंदा – भाग -2 ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर ☆

आज दिवसभर कामाच्या घाईत ज्याचा विसर पडला होता तोच मुलगा. गोरापान रंग, कोवळा चेहरा पण हाडापेराने मजबूत,. डोळ्यातली  व्याकुळता आज जवळुन स्पष्ट जाणवत होती. स्वामिनींच्या मनात आले, त्याला, जवळ घेऊन, पाठीवर हात फिरवुन, त्याचे नावगाव  विचारावे.

तोही काहीतरी बोलु पहातोय असेही वाटले.

तेवढ्यात मागुन आलेल्या प्रौढ व्यक्तिने त्याला बाजुला घेतले, त्यानेही आदरपूर्वक वंदन केले.

स्वमिनींच्या, जीवाची परत घालमेल अस्वस्थता बेचैनी,. अन् मनात आशुतोषच्या आठवणीची वीज चमकुन गेली.

क्षणभरच.

आणि संन्यासग्रहणावेळी, गुरुदेवांनी सांगितलेले शब्द आठवले.

“संसार, वैयक्तिक सुखदुंखापासुन आता मुक्त झालेली आहेस.

Now hence forward you life is not yours.

You have to live for others”

आणि शांत मनाने  प्रवचनासाठी हॉलकडे गेल्या.

नित्याचेच प्रवचन, —ते ही प्राथमिक शिबिरातले–तरीही आज त्यांना थकल्यासारखे वाटले.

रात्री त्यांनी गंगासागरजींना बोलावून शिबिरार्थीच्या नावपत्त्याची यादी द्यायला सांगितले. गंगासागरजींना हे अगदीच अनपेक्षित होते, आतापर्यंत यादी दिली तर “मला कुणाच्या नावगावशी काहीही देणेघेणे नाही. मला यादी पाठवत जाऊ नका.” असेच सांगितले होते.

पण आता मात्र “, यादी उद्या दिली तर चालेल ना?” असे गंगासागरजींनी नम्रपणे विचारल्यावर त्या काहीशा नाराजीने, “ठीक आहे. ” म्हणाल्या.

नेहमीप्रमाणे सुमुखी, रात्रीचा फलाहार, दुध घेऊन आली,.

“सुमुखी, कसे काय काय आहेत ग या वेळचे शिबिरार्थी?”

सफरचंद चिरणारी सुमुखी आश्चर्याने बघतच राहिली, पण बडबड्या सुमुखीने तेवढीच संधी साधली.

स्वामिनी, –हो, सगळे चांगले आहेत. आणि विशेष म्हणजे  एक मुलगा आहे छोटा. त्याच्या दोन आजोबांबरोबर आलाआहे. . खुप गोड, दोनच दिवसात छान रुळलाआहे, सगळ्या कामात पुढे असतो. नावही छान आहे   योगी. आणि—-“

स्वामिनींनी ” मुलगा म्हटल्यावर पाघळलीस. सांगितले आहे ना तुला कुणातही, कशातही गुंतवायचे नाही. आता, मला नकोय त्याची माहिती बस पुरे, “

म्हणुन तिला थांबवले.

तिला थांबवले खरे पण आपल्या मनातले विचार थांबवु शकल्या नाहीत.

आशुतोष, अवंतिका, आपली लाडकी मुले आणि आपल्यावर, म्हणजेच त्याची लाडकी  बायको –अरुंधतीवर  मनापासुन प्रेम करणारा नवरा  साघा सामान्य अविनाश— सुखाचा संसार. पण आपला काहीसा सुखासीन, चैनी स्वभाव—- श्रीमंत, छानशौकिन शेखर

खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकणे—अविनाश बरोबर वाद, भांडणे, घटस्फोट—

शेखरने केलेली फसवणुक—.

अविनाशकडे परत येणे—

अविनाशचे सुलभाशी लग्न—

पश्चाताप, हतबलता–आणि हरल्याची भावना. त्यामुळे अर॔धती गेल्यापावली घरातून बाहेर पडली.

आणि अचानक पडलेली गुरुदेवांची भेट. आणि त्यांनी दाखवलेली ही अध्यात्म अभ्यासाची, परमार्थाची वाट,. ,

गुरुदेवांनी कधीच कशाचीच सक्ती केली नव्हती. पण आपण स्वेच्छेने स्वीकारली.

रंगबेरंगी कपड्यातल्या साध्या गृहिणीपासुन भगव्या वस्त्रातली संन्याशिणी, , —ही वाटचाल सोपी नव्हती.

साधकापासुन गुरुदेवांचा उत्तराधिकारी होण्यापर्यंतचा हा प्रवास तर खडतरच होता,

त्यातच एकदा आशुतोष भेटायला आला —त्त्याला परत पाठवतांना झालेली मनाची तगमग, काहिली —

हो —तशीच अस्वस्थता त्या मुलाला योगीला पाहिल्यापासून जाणवते त्यामुळे योगीचा विषय डोक्यातुन जात नव्हता. ४, ५, दिवसात  शिबिर संपल्यावर तो गेला की विषय आपोआपच संपेल म्हणुन त्यांनी मनाची समजुत घातली.

पण, —त्याआधीच, असेच एका रात्री सुमुखीने योगी त्यांना भेटायला आल्याचे सांगितले, नव्हे योगी समोरच येऊन उभा राहिला.

अन् पाठोपाठ ते गृहस्थ,. साहजिकच तिने नेहमीप्रमाणे सौम्य शब्दात, “शिबिरासंबंधी काही शंका–तक्रारी आहेत का?काय बोलायचे आहे?”

“नाही, मला नाही, माझ्या मित्राला –योगीच्या आजोबांना बोलायचे”.

म्हणुन बाहेर  जाऊन “ये, रे, आत ये”

म्हणुन —-बाहेरच्या व्यक्तिला आत बोलावले.

क्रमशः…

© सुश्री गायत्री हेर्लेकर

201, अवनीश अपार्टमेंट, कोथरुड, पुणे.

दुरध्वनी – 9403862565

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments