सौ. उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ गंगेत घोडं न्हालं– भाग 1 … (भावानुवाद) – सुश्री सुषमा मुनींद्र ☆ सौ. उज्ज्वला केळकर

अनुमानं नेहमी चुकीची ठरतात.

अनुमानं कल्पनेची भरारी घेत आकाशात झेपावतात आणि खूश होतात, पण जेव्हा ते अनुभवामधून मार्गक्रमण करतात,  तेव्हा ती फसतात. दाणकन जमिनीवर आदळतात. मग सारी खुशी सारा आनंद नाहिसा होतो.

अनुमान किंवा अंदाज नेहमी चुकीचे ठरतात.

श्रेष्ठी ही हरेकृष्ण – अनुराधा यांची दोन मुलांमधली एकटी मुलगी. चांगल्या संस्थेतून एम. बी.ए. झालेली. उंच. सुंदर. सुडौल. एकूणच चांगली दिसणारी. वडील हरेकृष्ण. यांची आर्थिक स्थिती चांगली आहे. इतकं  सगळं असल्यावर  तिच्याबाबतीत काही अनुमान करणं अगदी योग्य असंच आहे. श्रेष्ठीच्या विवाहाच्या बाबतीत सगळेच जण चांगल्या कल्पना आणि कामना करताहेत. तिला उंच आणि देखणा पती हवा. तिची आई अनुराधा हिला वाटतं की मुलगा एकुलता एक असावा. त्यामुळे श्रेष्ठीवर कुठलीही जबाबदारी पडणार नाही. हरेकृष्णांना वाटतं की मुलगा चांगल्या पदावर असावा आणि कुटुंब प्रतिष्ठीत असावं. श्रेष्ठी आणि आर्थिक स्थिती दोन्ही श्रेष्ठ आहेत,  त्यामुळे या परिवाराला वाटतं,  की सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकेल,  असा मुलगा शोधून काढणं सहज शक्य आहे आणि ते तसा काढतीलच.

श्रेष्ठीने आव्हान दिलं, `बाबा, आपण मुलाचा शोध घ्या. मी नोकरीचा घेते. बघू कुणाचा शोध आधी पूर्ण होतो.’

हरेकृष्ण खुशीने म्हणाले, `बघुयाच कुणाचा शोध आधी पूर्ण होतो.’

अनुमानं नेहमी चुकीची ठरतात.

कल्पना जेव्हा थेट वास्तवाच्या भूमीवर उतरल्या,  तेव्हा लक्षात आलं,  श्रेष्ठीसारख्या श्रेष्ठ मुलीचा विवाहदेखील वाटलं होतं तेवढा सोपा नाही. तो सोपा झाला असता, जर सगळ्यांच्याच अपेक्षा पूर्ण करण्याचं ध्येय समोर ठेवलं नसतं तर. असामान्य मुले आपल्या कुटुंबासहित आकाशात उडत असतात,  असं दिसतं. हरेकृष्णांच्या सांपत्तिक स्थितीपेक्षा ज्यांची सांपत्तिक स्थिती जास्त चांगली आहे,  ते तोंडाला येईल तो आकडा बोलून ती किंमत आकाशातच वसुलतात.  

श्रेष्ठीचा शोध आधी पूर्ण झाला. पुण्याच्या एका चांगल्या कंपनीत रिक्रूटमेंट एक्झिक्यूटीव्हचा जॉब तिला मिळाला. कंपनीत नोकरी मिळण्याच्या लालसेने येणार्‍या उमेदवारांची ती दक्षतेने मुलाखत घेऊ लागली. निवडीच्या पहिल्या प्रक्रियेत, ती जो उमेदवार योग्य वाटेल,  त्याला तिच्या वरच्या बॉसकडे पाठवू लागली. लवकरच ती आपलं काम एंजॉय करू लागली.

हरेकृष्णांचा शोध अजून चालू आहे.

श्रेष्ठीला स्वत:ला प्रदर्शनीय बनवावं लागतं. मुलाकडची बघण्यासाठी जो दिवस नक्की करतील, त्या दिवशी रात्रीचा ट्रेनने प्रवास करून त्यांच्यापुढे उपस्थित रहावं लागतं. आपली बहादुरी आपल्या ऑफीसमधेच सोडून ती येते आणि अगदी संस्कारी मुलगी बनून मुलाकडच्यांपुढे उपस्थित होते.

उपक्रम चालू आहे. प्रयत्न सुरू आहेत. उप पोलीस अधिक्षक असलेला मुलगा आपल्या सगळ्या दलाबरोबर मुलगी बघायला आला. मग त्याच्या वडलांनी श्रेष्ठीचे विविध पोझमधले फोटो स्पीड पोस्टाने मागवले. ऐरे गैरे नत्थू खैरे अशा सगळ्यांना फोटो दाखवायचे होते. मग मोबाईलवरून हरेकृष्ण यांना खर्च कितपत करू शकतील,  अशी विचारणा झाली. त्यांनी २५ लाखापर्यंत खर्च करण्याची तयारी दाखवली. मग एक दिवस त्यांनी हरेकृष्णांना त्यांची लायकी दाखवून दिली.

`मुलाचा विवाह ठरलाय. विवाह नक्की करण्यासाठी त्यांनी पाच लाख देऊ केलेत. पुढे ते किती देतील, हे आपल्या लक्षात येईलच.’

हरेकृष्णांची कल्पना आणि कामना दोन्ही कोमेजून गेले. आम्हाला का आत्तापर्यंत लटकत ठेवलत. अशा तर्‍हेची डळमळित,  अस्थीर स्थिती ठेवण्यात मुलाकडचे स्वत:ची कोणती प्रगती समजतात कुणास ठाऊक?

हरेकृष्णांनी सी.ए. झालेल्या मुलाचं स्थळ पाहीलं. त्याच्याबद्दल त्यांना खुप आशा होती. फळ-मिठाई घेऊन अनेकदा त्यांनी घरी हेलपाटे घातले. अनेकांना बरोबर घेऊन मुलगा श्रेष्ठीला बघायला आला. मुलगा गावातलाच असल्याने ते अनेकदा त्याच्याकडे जाऊन आले,  अखेर शेवटी  मुलाचे वडील म्हणाले, `मुलाला खूप समजावलं मी, पण तो त्याच्याबरोबर काम करू शकणार्‍या मुलीशीच लग्न करू इच्छितो. आम्ही समजावू लागलो,  तर तो जीव देण्याची धमकी देतो. आपण अन्यत्र…

हरेकृष्णांची कल्पना आणि कामना दोन्ही पुन्हा कोमेजून गेले. धमकी तर तो आधीपासून देत असणार. आम्हाला का मूर्ख बनवत राहिलात? इतकी फळं, मिठाया रिचवत राहिलात?

पुढच्या मुलाच्या वडलांनी अट घातली, `आपलं वरदक्षिणेचं वगैरे ठीक आहे, पण आपल्याला मुंबईला येऊन लग्न करून द्यावं लागेल. फाईव्ह स्टार हॉटेल बुक करा. वर्‍हाडी पाचशे तरी असतीलच. मुलीची पाठवणी करताना प्रत्येकाला एकेक चांदीचा ग्लास द्यायला हवा. आमचा तो एकुलता एक मुलगा आहे. आमची सारी स्वप्नं त्याच्याच लग्नात आम्हाला पूर्ण करून घ्यायला हवीत… आमच्या सगळ्या नातेवाईकांना या लग्नाची खूप प्रतिक्षा आहे.’

हरेकृष्ण निराश झाले. त्याचा अर्थ एक कोटीचं लग्न. घर-दार विकायला हवं त्यासाठी. श्रेष्ठीमधे कशाचीच कमतरता नाही. एवढा महाग विवाह ठरवून मी मूर्ख नाही बनू इच्छित.

त्यानंतरच्या मुलाकडच्यांनी सांगितले,  आमच्याकडे खूप प्रस्ताव आलेले आहेत. आपण फोन करून विचारत चला. जोड्या तर वरच जमून येतात. योगायोग असेल, तर आपल्या मुलीशी संबंध जुळून येतील.’

हरेकृष्ण पुन्हा निराश. ‘योगायोग असेल, तर जिथे जुळेल, तिथे जुळेल. रोज रोज फोन करून मी आपला विजयदर्प वाढवणार नाही. रोज रोज आपल्याकडे इतके प्रस्ताव येतात. आपण इतक्या मुलींना नाकारलंत, हा अहंकाराचा आनंद मी आपल्याला मिळू देणार नाही.’

अनुमानं नेहमी चुकीची ठरतात.

हरेकृष्ण आणि अनुराधा सध्या निराशा आणि अपमान भोगत आहेत. श्रेष्ठी मानसिक पीडा आणि हीनताबोध सोसत आहे. ती स्वत:च्या बाबतीत आश्वस्त होती. तिने असा विचारच मुळी केला नव्हता की कुणी मुलगा तिला रिजेक्ट करू शकतो. ती आता निश्चित केलेल्या दिवशी येण्या-जाण्यात थकू  लागली. शिथील झाली. वैतागून वाद घालू लागली.

`आई, मुलंच का मुलीला पसंत करतात?  मुलगी का नाही, मुलगा पसंत किंवा नापसंत करू शकत?  माझ्याजवळ डिग्री आहे, नोकरी आहे, आत्मविश्वास आहे. गुण आहेत. मग मला मुलाला पसंत करायचा अधिकार का नाही?’

`आता मुलीसुद्धा मुलाला बघतातच की! तूसुद्धा बघितलंसच ना!’

`चूक. मुलगी मुलाला बघत नाही. स्वत:ला दाखवते. मुलीला मुलगा पसंत आहे,  नाही , कुणीच जाणून घेऊ इच्छित नाही. तू मला विचारलस कधी की तुला कोणता मुलगा पसंत आहे?’

`समाजाची अशीच रीत आहे.’

`समाजात किती किती, काय-काय बदललय आई आणि काय काय नवीव आलय. हा कायदा आणि नियम तेवढा बदलला नाही. या नियमानुसार चालणार्‍यांना तोंडघशी पडावं लागतं. अपमान सहन करावा लागतो. मला शक्य झालं तर मी असा नियम बनवीन की मुलाकडच्यांनी मुलीकडच्यांना हुंडा द्यायचा. मुलगी आयुष्यभर मुलाच्या आणि त्याच्या परिवाराच्या तैनातीत राहत असते.’

क्रमशः…

मूळ कथा लेखिका – सुश्री सुषमा मुनींद्र  

अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments