सौ. उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ गंगेत घोडं न्हालं– भाग 4 … (भावानुवाद) – सुश्री सुषमा मुनींद्र ☆ सौ. उज्ज्वला केळकर

(मागील भागात आपण पाहिलं- घरात निराशेचं वातावरण. पुन्हा एकदा अपयश. आता इथून पुढे)

श्रेष्ठीची बेफिकिरी तर पहा. श्रेयसला खुशाल टकलू म्हणून त्यचा अपमान केला. त्या लोकांना पुण्याला पाठवल्यावर श्रेष्ठी म्हणाली,  `ते लोक कॉल करणार नाहीत. तुम्ही कॉल करून त्यांच्यापुढे `आपला काय निर्णय झालाय’,  असं म्हणत आजिबात गयावया करायची नाही.

एक आठवडा उलटला.

श्रेष्ठीच्या बोलण्यामुळे लज्जित होऊन, कॉल करून श्रेयसच्या वडलांची माफी मागण्याचे धाडसही त्यांना झाले नाही. ते शिथील होऊन बसले होते,  एवढ्यात श्रेयसचाच कॉल आला. हरेकृष्णशी तो आदराने बोलला व  श्रेष्ठीचा मोबाईलचा नंबर विचारला. उमेदीचा पदर धरत हरेकृष्णांनी नंबर दिला. अनुराधाने कॉल करून तिला थोडं सभ्यपणे बोलायला सांगितलं. श्रेष्ठीने तिकडे दुर्लक्ष केलं. श्रेयस ज्या टोनमध्ये बोलेल,  त्याच टोनमध्ये बोलायचं तिने ठरवलं. त्याने झटका दिला,  ही पण देईल. तो आखडला,  ही पण आखडेल. तो सभ्यपणे बोलला,  ही पण तशीच बोलेल. श्रेयसच्या कॉलने तिला काहीसा धक्काच बसला होता. नकारात्मक कारणाने नव्हे,  श्रेयसच्या सकारात्मक भावामुळे.

श्रेष्ठी त्या दिवशी तू माझा मोठा इंटरव्ह्यू घेतला होतास, मी जाणून घेऊ इच्छितो, मी रिक्रूट झालो की नाही?

`म्हणजे?’

`मी जेव्हा तुझ्या घरातून बाहेर पडलो,  तेव्हा खूप संतापलो होतो. तिरस्काराने भारलो गेलो होतो. वाटत होतं, तुला फोन करावा आणि काही कठोर गोष्टी तुला ऐकवाव्या. माझा उतरलेला चेहरा बघून वहिनींनी माझी चेष्टासुद्धा केली. म्हणाल्या ‘माकडाला हिरा मिळतोय आणखी काय पाहिजे?’ पण माझा राग जेव्हा शांत झाला,  तेव्हा वाटलं, तुझ्या स्पष्टवक्तेपणामुळे मला राग यायला नको, उलट प्रेरणा मिळायला हवी.’

`म्हणजे?’

`तू मला टकलू म्हणून माझ्यातील उणेपणा दाखवलास, पण…’

`मला टकलू म्हणायचं नव्हतं, बस,  जीभ घसरली.’

`ती घसरली नसती, तर मी माझे विचार बदलू शकलो नसतो. आता वाटतय,  रिजेक्शन मुलीला किती निराश करत असेल. मुलाकडचे लोक छोट्या छोट्या उणिवा दाखवत बसतात किंबहुना शोधत असतात,  ज्या सामान्यत: लक्षातही येत नाहीत. असं करून ते आपली घमेंड,  मूर्खपणा किंवा सणक वा  आपला फालतूपणा शाबीत करत असतात. खरंच सांगतो,  नीतावहिनीच्या बाबतीत मला पहिल्यांदाच वाईट वाटलं.’

`म्हणजे?’

दादाचा साखरपुडा झाला होता. बाबांनी अचानक वहिनीच्या बाबांकडे कार मागितली आणि त्यांनीही कार दिली कारण विवाह मोडला,  तर बदनामी होईल. इतकं  होऊनही आई वहिनीवर खूश नाही. काही न काही कमतरता तिच्यात काढतेच. आता मला वहिनीबद्दल खूप सहानुभूती वाटू लागलीय.’

`सो स्वीट!’

`आता मला माझ्या तिन्हीही मोठ्या बहिणींची आठवण येते. त्यांच्या लग्नाच्या वेळी आई-बाबांना खूप त्रास सहन करावा लागला होता. मधल्या बहिणीच्या लग्नाच्या वेळी निमंत्रण पत्रिकासुद्धा छापून झाल्या होत्या आणि मुलाकडच्यांकडून फर्मान आलं, आणखी कॅश हवी.  बाबांनी लग्न मोडलं. मुलाकडच्यांना वाटलं नाही की बाबा एवढे फर्म राहतील. मग मुलाकडच्यांनी पुन्हा पुन्हा कॉल केले. आमच्याही निमंत्रण पत्रिका छापल्या आहेत. आमचीही बदनामी होईल. आपल्याला जे द्यायचं असेल, ते द्या, न द्या पण हा विवाह होऊ दे, पण बाबांनी ऐकलं नाही. त्यानंतर तिचा दुसरा विवाह ठरला. चांगला झाला पण मधल्या काळात घरावर जी शोककळा पसरली होती,  जे उदास वातावरण पसरलं होतं,  आमची जी बदनामी झाली होती, त्या सगळ्याची तू नकळत आठवण करून दिलीस. मला माहीत आहे,  मुलं काही देवदूत नसतात. त्यांच्यातही काही उणिवा असतात. ते टकलू असू शकतात.’

`म्हंटलं नं जीभ घसरली.’

`तुझा हाच प्रामाणिकपणा मला आवडला. तू मला पसंत आहेस.’

`जाड असूनही?’

`जर तुला माझं टक्कल पसंत असेल तर!’

`मी या दाखवण्या-बघण्याच्या कार्यक्रमाला अगदी उबून गेलेय. मी लग्न करणार नाही.’

`तुझ्या दारावर धरणं धरून बसेन. मग तर करशील ना? आणि हो, व्यायाम, डाएट वगैरे करू नकोस. मला तू जाडच असलेली आवडलीयस.’

श्रेष्ठी खो खो करत हसू लागली.

`आपणसुद्धा केस उगवणारी क्रीम,  तेलं वगैरे अजमावून बघू नका.  टकलू असल्यामुळे बुद्धिमान वाटताय.’

श्रेयसनेही मोठ्याने हसत म्हंटलं,  मग तर तुझाही विजय झाला आणि माझाही… होय की नाही?’ 

 – समाप्त –

मूळ हिंदी कथा –  तुम्हारी भी जय, हमारी भी जय – मूळ  कथा लेखिका – सुश्री सुषमा मुनींद्र  

अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments