जीवनरंग
☆ विसर्जन… लेखक – अनामिक ☆ प्रस्तुती सुश्री नेहा जोशी☆
चहाचा कप हातात दिल्यानंतर तो सांगत होता… “अरे त्या वर्षी अप्पांच्या पायाला दुखापत झाली होती आणि मीही लहान होतो ऐनवेळी गाडीही मिळेना म्हणून अगदी चुकचुकतच पहिल्या माळ्यावरच्या हमीदभाईंना ‘विसर्जन तलावापर्यंत येता का ?’ असं अप्पांनी विचारलं होतं …
माईने ‘त्याला’ कशाला विचारलंत म्हणून प्रचंड चिडचिडही केली होती… पण सुट्टीचा दिवस म्हणून घरी असलेले हमीदभाई ‘अरे बाप्पाला माझ्या गाडीतून काय तुम्ही हुकूम केलात तर माझ्या खांद्यावरूनही नेईन’ म्हणत तडक टेम्पोची चावी घेऊन आले होते…
परत आल्यावर अप्पांनी बिदागी म्हणून दिलेलं भाडंही त्यांनी नाकारलं…
अप्पांना अवघडल्यासारखं झालं. मग माईने आग्रहाने हमीदभाईंना पुरणपोळी आणि मोदक खाऊ घातले… पुढल्या प्रत्येक वर्षी विसर्जन करून आल्यावरच्या पंगतीला हमीदभाईंचं हक्काचं ताट राहिलं…
आम्ही चाळ सोडली .. वस्ती बदलली… आमची घरं बदलली… हमीदभाईंच्या गाड्या बदलल्या, पण त्यांनी विसर्जनाचा मान सोडला नाही.. आम्हीही तो दुसऱ्या कुणाला दिला नाही… कुठेही असले तरी नेमके विसर्जनादिवशी तासभर आधी आरतीला हजर असायचे…
“अगं मोदकांसाठी येतो तो” असं अप्पा हमीदभाईंना चिडवत माईला म्हणायचे… “
तुझा बाप्पा बरकत देतो रे मला… त्याच्या निरोपाला मी नसेन, असं होणारच नाही ” …
२६ वर्षं हे अखंड चालत राहिलं … तीन वर्षांपूर्वी अप्पा गेले, तेव्हापासून ते न जेवता फक्त मोदक घेऊन जाऊ लागले… पण त्यांना भाडं विचारण्याची माझी हिंमत आणि तेवढी ऐपत अजून झाली नाही…
या मे महिन्यात हमीदभाई आजाराने गेल्याचं कळालं होतं … आज विसर्जन आहे… काय करावं सुचत नाहीय… आज माझी स्वतःची गाडी आहे रे… पण त्यांच्या निरोपाशिवाय आमचा बाप्पा कधी गेलाच नाहीय रे… विसर्जनच करूच नये असं वाटतंय…
“आरती करून घ्या रे…” या माईंनी दिलेल्या आवाजाने नंतरची मधली कितीतरी वेळ शांतता मोडली…
आरती संपल्यावर ती सुरू असताना मघाशी जिन्यात अवघडून उभा असलेला माणूस दाराशी आला… सगळ्यांच्या हातात प्रसादाचा मोदक दिल्यावर माईंनी त्याच्याही हातावर मोदक ठेवला… त्यांने तो अदबीने घेत माईंना सांगितलं … “बाप्पा विसर्जनाला न्यायचाय ना… गाडी लेके आया हूं… हमीद खान चा मी मोठा मुलगा.. अब्बानी सांगून ठेवलं होतं… ते नसले, तरी अप्पांचा गणपती आपल्याच गाडीतून न्यायचा… परंपरा आणि आपला मान आहे… म्हणून आलो होतो…”
माईंनी भरल्या डोळ्यांनी आणखी एक मोदक त्याच्या हाती दिला… जो कदाचित हमीदभाईंसाठी होता….
कसंय… शेवटी देव धर्माचा असला तरी उत्सव हा नात्यांचा असतो… त्यातल्या “माणसां”चा असतो.. इतकंच…!!
लेखक : अज्ञात…🙏
संकलन : सुश्री नेहा जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
बहुत ही सुन्दर रचना, आज के इस नफरत बांटते लोगों को एक पैगाम है कि, व्यक्ति अच्छा या बुरा हो सकता है, पूरी कौम नहीं,
बहुत बहुत बधाई