श्री आनंदहरी

?जीवनरंग ?

 ☆ ‘सूर्य ढळलेला माणूस…’ – भाग – 4 ☆  श्री आनंदहरी  ☆ 

“बाबा, लवकर या हं ! अंधार पडायच्या आत या… आणि जाता -येता वाहनाकडे लक्ष ठेवा.. वाहने किती वाढलीत हल्ली. “

पूर्वी फ़िरायला निघालो की सुनबाई रोज म्हणायची ते आठवले.  आता ती काहीच बोलली नाही. हल्ली ती माझे सगळेच बोलणे ऐकूनही न ऐकल्यासारखे करते. जणू मी दुसऱ्या कुणाशीतरी बोललोय. मी तिचे पूर्वीचे वाक्य आठवताच हसलो.. स्वतःशीच.

अलीकडे वस्ती किती वाढलीय. पूर्वी इकडे चिटपाखरूही नसायचे. आता तर रोज नवे एखादे घर होताना दिसतेच. किती ही वाहने ? रस्त्यावरून चालायचीही भीती वाटते. कितीही पाहून रस्ता ओलांडायचा म्हणले तरी रस्ता ओलांडेपर्यंत एखादे वाहन, निदान मोटरसायकल तरी येतेच. तो अगदी जवळ येऊन करकचून ब्रेक दाबून गाडी उभी करतो. त्यावेळी नेमके गोंधळल्यासारखे होते हो. पाय ही अचानक लटपटू लागतात. तोल जातोय की काय असे वाटू लागते. येणाऱ्या वाहनाचा अंदाजही न आल्याने पावले जागीच थबकतात तीच नेमकी त्या वाहनासमोर येऊन. अपराधीपणाचा भाव मनात येऊन भीतीने त्या वाचनाकडे नजर जाते. ते थांबलेले आहे हे पाहून थोडा धीर येतो. थोडे जलद चालून रस्ता पार करावा असा विचार मनात येतो. वाहनाचा चालक काही बोलत नसतो, नुसता पहात असतो पण त्याची नजर म्हणत असते,

 ‘धड चालता येत नाही तर मरायला येतात कशाला रस्त्यावर ? काही झाले, चुकून धक्का-बिक्का लागला तर नस्ता ताप. ‘

 त्याच्याकडे पाहून ओशाळवाणे हसत रस्ता ओलांडतो तेंव्हा जरा धीर येतो. वस्ती संपून नदीजवळ पाऊलवाटेवर आले की बरे वाटते.

 आता चालायला या पाऊलवाटाच बऱ्या. पावसाळ्यात निसरड्या असतात पण पावसाळ्यात बाहेर पडायला जमतंच नाही.. बाहेर पडावे असे कितीही वाटत असले तरी.

 पाऊलवाटेच्या उतारावरून काठीचा आधार घेत हळूहळू चालत नदीकाठच्या कातळावर आलो आणि टेकलो. अलीकडेच डाव्या बाजूला रेल्वेचा पूल झालाय.. कितीतरी उंच. कधीतरी नेमकी याचवेळी एखादी मालगाडी धडधडत पुलावरून जाते. आत्ताही इंजिनच्या शिट्टीचा आवाज ऐकू आला. नजर पुलकडे गेली. मालट्रक लादलेली मालगाडी धडधडत पुलावरून जात होती. आपल्याच गतीत, जगाची फिकीर नसल्यासारखी. साऱ्यांचे तसेच असते. जो तो आपआपल्या गतीने धावत असतो, मनात एखादे स्टेशन ठरवून. तिथे पोहोचले की पुढचे स्टेशन खुणावू लागते, साद घालू लागते. मग पुन्हा त्या स्टेशनच्या ओढीने पुन्हा धावणे सुरू. जीवनातील कितीतरी स्टेशने पार केली तरी धावणे सुरूच असते. दिसणारी, हवीहवीशी वाटणारी , खुणावणारी स्टेशने संपतात.. गती मंदावते. कुणाला हवेसे वाटणारे, कुणाला नकोसे वाटणारे एकच स्टेशन उरलेले असते, जिथे सर्वांचाच प्रवास संपत असतो.. पण ते स्टेशन कधी येईल कुणालाच माहीत नसते.. आपल्याही नकळत आपले शेवटचे स्टेशन येते आणि प्रवास संपून जातो. प्रवास संपल्याचे आपल्यालाही कळत नाही. दुरून स्टेशनचे दिवे मात्र लुकलुकत असतात, खुणावत असतात. प्रवासाच्या संधिकाळाची ही वेळ असते. मनात हुरहूर दाटून आलेली असते. दिल्या-घेतल्या क्षणांच्या आठवणींचा कल्लोळ असतो. काहीतरी द्यायचे , काहीतरी घ्यायचे, काहीतरी करायचे राहून गेलेले असते.

कुठूनतरी कानात स्वर गुणगुणतात,

‘गेले द्यायचे राहुनी, तुझे नक्षत्रांचे देणे..’

‘नक्षत्रांचे देणे ‘  हे शब्द कानात, मनात रुणझुणत राहतात.

क्रमशः...

© श्री आनंदहरी

इस्लामपूर जि. सांगली

८२७५१७८०९९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments