श्री आनंदहरी

?जीवनरंग ?

 ☆ ‘सूर्य ढळलेला माणूस…’ – भाग – 5 ☆  श्री आनंदहरी  ☆ 

” मी इथे बसलो तर चालेल ना ? “

आवाजाने मी ‘ नक्षत्रांच्या देण्यातून ‘, विचारातून भानावर आलो. आवाजाच्या रोखाने पाहिले. माझ्यापेक्षा अंदाजे पाच-सहा वर्षांनी लहान वाटणारी व्यक्ती मलाच विचारत होती, ‘मी इथे बसलो तर चालेल ना ?’

मला कितीतरी वर्षांपूर्वीचा प्रसंग आठवला. मी ही कबीरबाबांना असाच प्रश्न विचारला होता.

” बसा हो.”

” धन्यवाद ! आपण ? “

” मी ? मी, सूर्य ढळलेला माणूस ! “

पूर्वीचा प्रसंग ऐकून नकळत माझ्या तोंडून मला त्यावेळी बाबांनी दिलेले उत्तरच बाहेर पडले.

माझ्या उत्तराने ती व्यक्ती चमकली आणि माझ्या शेजारी येऊन बसत म्हणाली,

” तुम्ही बाबांना भेटला होतात ?  ओळखत होतात त्यांना ? “

” एकदा भेट झाली होती.. पण अजूनही लक्षात आहे. त्यालाही झाली असतील पंचवीसेक वर्षे.”

” पंचवीस वर्षे ? कसे शक्य आहे ? त्यांना जाऊन तर सत्तावीस वर्षे झाली. “

” वर्षांचा हिशेब आठवणीत कुठे राहतो ? आठवणीत फक्त क्षणांची गर्दी असते. काही मोजक्याच क्षणांचीच गर्दी. बाबांची भेटही तशीच. काही क्षण घडलेली. त्यांचे नावही मला ठाऊक नव्हते. मी त्यांना मनोमन कबीरबाबा असे नावही दिले होते. मी त्यांना नाव विचारले होते, नाही असे नाही  तेंव्हा त्यांनी हेच उत्तर दिले होते, ‘ सूर्य ढळलेला माणूस ! ‘

” हो. ते शब्द नेहमी त्यांच्या तोंडात असायचे. “

ते म्हणायचे नाव काहीही असले तरी आपली खरी ओळख हीच असते. उगवत्या सूर्याचे कौतुक असते. कोवळी कोवळी किरणे मनाला उल्हासित करतात, एखाद्या बालकासारखी. मध्यानीचा सूर्य आपल्या मस्तीतच तळपत असतो. आपण साऱ्या जगाला प्रकाश देतो याची त्याला जाणीव झालेली असते. कुटुंबातील कर्ता-सवरता माणूस असाच असतो… आणि सूर्य मावळतीला गेला की आपला अस्त जवळ आला असल्याची जाणीव त्याला होत असावी. त्याने आपल्याला प्रकाश दिला आहे याची कृतज्ञतापूर्वक जाणीव इतरांना असत नाही. ते फक्त मावळत्या सूर्याची शोभा पहात असतात.  त्यांना तो सूर्य क्षितीजपार झालेला, मावळलेला पहायचा असतो. त्यांच्या दृष्टीने त्याची उपयुक्तता संपलेली असते. उगवत्या सूर्याची प्रतीक्षा त्यांच्या मनात असते.

” आयुष्यभर खस्ता काढून थकली-भागलेली माणसे अशीच…. “

” हो. फक्त अडचण ठरणारी. कुणीही उठ म्हणले की उठावे लागणारी..”

माझ्या मनात घरातील प्रसंग तरळून जाऊ लागले.

” तुम्हांला सांगतो, खूप वाईट वाटते हो , बाबांची आठवण आली की.. या वयात अपेक्षा असतात त्या काय आणि किती ? पण आम्ही त्याही पूर्ण करू शकलो नाही. प्रेमाने दोन शब्द बोलायला, विचारपूस करीत दोन क्षण जवळ बसायलाही आम्हांला वेळ मिळाला नाही.. वेळ मिळाला नाही म्हणणेही चुकीचेच आहे. आम्हांला जाणीवच झाली नाही कधी त्याची. “

” त्यावेळी तुम्ही मध्यान्ही तळपत होता ना ! हे असेच असते हो … फार वाईट वाटून घेऊ नका. ही जगराहाटीच आहे. एक विचारू ? “

” विचारा. “

” ही चुकल्याची जाणीव तुम्हांला कधी झाली ? सूर्य ढळल्यावरच ना ? “

क्षणभर विचारात पडून तो म्हणाला,

” खरं सांगायचं तर हो. “

मी हसलो. मी पहिल्यांदा इथं आलो तेंव्हा माझी आणि बाबांची भेट झाली. त्यानंतर बाबा पुन्हा इथं आलेच नाहीत. अनंताच्या प्रवासाला निघून गेले.. इथल्या प्रवासाच्या अंतिम स्टेशनवर पोहोचले.. त्यांचा इथला प्रवास संपला. सूर्य क्षितीजपार गेला.  आज तो इथं आला म्हणजे… म्हणजे माझाही हा प्रवास संपत आलाय. आता उद्यापासून इथं यायचं कारण नाही, कुणाला अडचण वाटायचे कारण नाही.. कुणाच्या टी-पार्ट्या, कुणाचं रॅप-पॉप.. कुठंच अडचण नाही.

मनाला खूप बरं वाटू लागले… मोकळं मोकळं. जणू कसले तरी ओझे उतरून बाजूला ठेवून दिल्यासारखे, डोक्यावरून  उतरल्यासारखे.  

अंतिम स्टेशन जवळ आल्याचे जाणवले तसा प्रवासाचा सारा शीण उतरून गेल्यासारखे वाटू लागले.. एकदम ताजे-तवाने. माझा सूर्य आता क्षितिजापार चाललाय.

उद्या तो माझी वाट पाहिल, परवा वाट पाहिल, काही दिवस वाट पाहिल अन  वाट पाहण्याचं पुन्हा विसरूनही जाईल.. पण तो मात्र इथं येतंच राहील.. पुन्हा कुणीतरी नवागत इथं येईल. त्याला विचारेल,

‘ इथं बसले तर चालेल का ? ‘

तो विचारणाऱ्याकडे नजर टाकून म्हणेल,

‘ बसा. कुणीही तुम्हांला, ‘ इथून उठा, ‘ म्हणणार नाही. ‘

थोड्या वेळाने तो नवागत त्याला विचारेल,

‘ आपण ? ‘

तो म्हणेल,

‘ सूर्य ढळलेला माणूस. ‘

अन् दिशांदिशांमधून प्रतिध्वनी उमटत राहतील,

‘ सूर्य ढळलेला माणूस !’

‘ सूर्य ढळलेला माणूस !! ‘

‘सूर्य ढळलेला माणूस !!! ‘

◆ समाप्त

© श्री आनंदहरी

इस्लामपूर जि. सांगली

८२७५१७८०९९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments