☆ जीवनरंग ☆ बोध कथा – धूर्त मंत्रिपुत्र ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी ☆
||कथासरिता||
(मूळ –‘कथाशतकम्’ संस्कृत कथासंग्रह)
बोध कथा
कथा ४. धूर्त मंत्रिपुत्र
अयोध्या नगरीत एक राजा होता. त्याला फुलांचे भयंकर वेड होते. त्याने त्याला आवडणाऱ्या विविध प्रकारच्या फुलांचे एक ‘पुष्पउद्यान’ तयार करून घेतले होते. तो आपलं विश्रांतीचा काळ त्या पुष्पोद्यानातच घावलीत असे व भरपूर आनंद उपभोगीत असे.
राजाचा एक मंत्री होता. त्याचा एक पुत्र दररोज त्या उद्यानात जाऊन फुले चोरीत असे. त्यामुळे त्या उद्यानातील बरीचशी फुले नष्ट झाली होती. हे लक्षात येताच राजाने माळ्याला बोलावून “माझ्या उद्यानात उमललेली फुले कोणीतरी चोरून नेत आहे. तेव्हा तू पहारा ठेवून त्या चोराला पकडून आण” असा आदेश दिला. आदेशानुसार माळ्याने जागता पहारा ठेवला. तेव्हा मंत्रिपुत्र फुले तोडतोय हे पाहून त्याला तत्काळ फुलांसह पकडून पालखीत बसवून नगरीत नेले.
त्यावेळी तो मंत्री नगरद्वाराजवळच होता. त्याला पाहून माळी म्हणाला, “तुझा हा पुत्र पुष्पोद्द्यानात फुले चोरत होता. त्याला आम्ही राजाजवळ नेत आहोत. तेव्हा याला राजगृही जाऊन सोडविण्याचा प्रयत्न करू नकोस.” हे ऐकून मंत्री त्याच्याकडे बघून “जर जगायचं असेल तर तोंड आहे. तुम्ही जा” असे मोठ्याने बोलला.
मंत्र्याचे हे शब्द ऐकून व त्याचा अभिप्राय लक्षात घेऊन मंत्रिपुत्राने स्वतःजवळ असलेली सगळी फुले खाऊन टाकली. नंतर राजाजवळ गेल्यावर राजाने “तू फुले का तोडलीस?” असे विचारताच मंत्रिपुत्र म्हणाला, “महाराज, मी आपले उद्यान बघण्यासाठी गेलो होतो. तिथे फुले तोडण्यासाठी नाही. मला ह्या माळ्याने अन्यायाने व जबरदस्तीने पकडले आहे.”
मंत्रिपुत्राजवळ फुले मिळाली नाहीत. तेव्हा माळ्याने मंत्रिपुत्राला अन्यायाने व जबरदस्तीनेच पकडले आहे असे निश्चित ठरवून राजाने माळ्यालाच दंड केला व मंत्रिपुत्राला सोडून दिले.
तात्पर्य – बुद्धिमान लोक ओढवणाऱ्या संकटाचा विचारपूर्वक सामना करतात.
अनुवाद – © अरुंधती अजित कुळकर्णी
कथासरिता उपक्रम साहित्य कट्टा,संयोजन- डॉ. नयना कासखेडीकर
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
‘धूर्त मंत्रिपुत्र’ कथा खऱ्या अर्थाने बोधकथा नाही. त्यातून दिलेला बोध म्हणून जे वाक्य दिले आहे, (बुद्धिमान लोक ओढवणाऱ्या संकटाचा विचारपूर्वक सामना करतात.) ते खरे असले तरी पटण्यासारखे नाही. मंत्रिपुत्र फुले चोरत होता. त्याने चोरीच्या आरोपातून लबाडीने सुटका करून घेतली आहे. म्हणजे त्याने बुद्धी वाईट कामासाठी वापरली आहे. त्यामुळे त्याच्या ऐवजी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माळ्याला शिक्षा झाली. थोडक्यात ह्या कथेचा बोध घ्यायचाच झाला, तर तो असा होईल – प्रामाणिकपणालाच शिक्षा मिळते. काहीही गैर करून तुम्हाला लबाडीने त्यातून सुटका करून घेता येणे शक्य आहे!