श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ❤️

☆ ‘आनंदाचे ठसे…’ – भाग – ३ ☆ श्री अरविंद लिमये

अनुभूति म्हणजे अनुभवच पण अलौकिक वाटावा  असा अनुभव. सुखद आश्चर्याचा स्पर्श जाणवणारा आणि असह्य दु:खावर अनपेक्षितपणे फुंकर घालावी तशी वेदना शमवणारा ! अनुभूतीचे असे स्पर्श त्या अनुभवात लपलेल्या अनुभूतीच्या चैतन्यदायी प्रकाशाचेच स्पर्श असतात. असा अनपेक्षित स्पर्श जाणवताच मनोमन होणारे विश्लेषण अनुभूतीची साक्ष पटवणारे असते.

क्वचितच कधीतरी अकल्पितपणे एखादा क्षण जणू आपली परीक्षा पहायला आल्यासारखा समोर येऊन जेव्हा उभा रहातो तेव्हा त्या नेमक्या क्षणी आपल्या नैसर्गिक प्रतिक्रियेला आणि कृतीला  अनन्यसाधारण महत्त्व असते. हे असे प्रसंग मोजकेच असले तरी ते आपला कस पहाणारे असतात. त्या कसोटीला उतरणारे अर्थातच अनुभूतीत लपलेल्या अलौकिक आनंदाचे धनी होतात!

मी स्वतःला असा भाग्यवान समजतो कारण अशा अलौकिक आनंदाचे दान अनेक प्रसंगात माझ्या वाट्यास आलेले आहे. त्या अनुभूतीच्या आनंदाचे ठसे मी मनोमन जपून ठेवलेले आहेत!

मी युनियन बँकेच्या सोलापूर (कॅंप) ब्रॅंचचा मॅनेजर म्हणून नुकताच चार्ज घेतला होता तो १९८८ मधला हा प्रसंग. मला अतिशय गूढ, अकल्पित,अतर्क्य अशी अनुभूती देणारा !

त्याचीच ही अनुभव कथा!

‘आनंदाचे ठसे…’ – भाग – ३ 

( पूर्वसूत्र- प्रत्येकाच्याच विचारांचा आणि मनोभूमिकांचा कस पहाणाऱ्या या प्रसंगांचे धागेदोरे भविष्यात घडू पहाणाऱ्या एका अतर्क्याशी जोडले गेलेले आहेत हे त्या क्षणी मला तरी कुठे ज्ञात होते?)

सुजाताची समजूत घालून मी तिला परत पाठवलं आणि टेबलवरचा कामाचा ढीग उपसायला सुरुवात केली. घडलेलं सगळं पूर्णतः विस्मरणात जाणं शक्य नव्हतंच तरीही कामांच्या वाढत्या व्यापात हे सगळे प्रसंग, त्यांची जाणीव, आणि आठवण सगळंच थोडं मागं पडलं. पण त्यांची पुन्हा आठवण व्हायला माझ्या आईचं अचानक माझ्याकडे रहायला येणं निमित्त झालं.

माझ्या क्वाॅर्टर्स सर्व सोयींनी युक्त होत्या. तरीही फॅमिली शिफ्ट करणं शक्यच नव्हतं. मग वेकेशन्समधे बायको-मुलगा येऊन सलग रहायचे. तशीच अधून मधून कधीतरी बदल म्हणून आई यायची. आताही आई आली तेव्हा या सर्व घटना प्रसंगांना तीन आठवडे होऊन गेले होते. आई आली तेव्हा माझ्या खिशात फक्त शंभर-दीडशे रुपये होते आणि सेविंग्ज खात्यावर फक्त पाच रुपये! हे लक्षात आलं आणि तेच ‘लिटिल फ्लॉवर’चा प्रसंग आठवायला निमित्त झालं. आई दोन्ही वेळचा स्वैपाक घरीच करणार म्हणजे आवश्यक ते सगळं सामान तातडीने आणणं आलंच. माझी अडचण तिला मोकळेपणाने सांगायची म्हटलं तर घडलेलं सगळं रामायण सविस्तर सांगायला हवं. त्यामुळे पाच-सहा दिवसांनी पगार होणार असल्याने तोवर अत्यावश्यक तेवढ्याच वस्तू मी आणून दिल्यानंतर खिशात शिल्लक राहिली फक्त शंभर रुपयांची एक नोट!

“हे काय? एवढंच सामान?” रात्री जेवणाची तयारी करून ठेवल्यानंतर मी आणलेलं सामान आवरताना आई म्हणालीच.

“अगं,निकडीचं तेवढंच आणलंय. नंतर चांगल्या दुकानातून सवडीने महिन्याचं सगळं सामान आणून देईन”

“हो पण  चहाची पावडर नाही आणलीस ती?”

“अगदीच संपली नाहीये ना?”

“आज अरे घर मालकीणबाई येऊन भेटून गेल्या. संध्याकाळी पलीकडच्या कुलकर्णी आजी आणि वहिनी आल्या होत्या. त्या सगळ्यांना चहा केला ना त्यामुळे आता जेमतेम सकाळच्या दोघांच्या चहापूरतीच असेल.”

ही कुलकर्णी मंडळी पलीकडच्या पोस्टल-कॉलनीतच रहायची.त्यांचा मुलगा प्रमोद कुलकर्णी आमच्या बँकेच्या चाटी गल्ली ब्रँचमधे हेड-कॅशिअर होता. त्यामुळे ओळख झाली, विचार जुळले.आमचं रोज दिवसभर भेटणं व्हायचंच नाही म्हणून मग रात्री जेवणं झाल्यावर आम्ही दोघे कोपऱ्यापर्यंत पाय मोकळे करायला मात्र नियमित जायचो.

“आज प्रमोद आणि मी रात्री फिरायला जाऊ तेव्हा दुकान उघडं असलं तर मी घेऊन येईन. नाहीतर मग उद्या सकाळी नक्की आणेन” मी सांगून टाकलं.खरंतर प्रमोद बरोबर असताना फक्त शंभर ग्रॅम चहापूड कशी मागायची म्हणून मी ते टाळणारच होतो.

पण झालं भलतच.रात्री जेवण  आवरून मी हात धुतले तेवढ्यात प्रमोदची हांक आलीच. मी आईला सांगून निघालो.

“येताना चहा पावडर विसरू नको रेs आण आठवणीनं.” प्रमोदसमोरच आईने सांगितलं. मी ‘हो’ म्हणून वेळ मारून नेली.

कोपऱ्यापर्यंत निवांत फिरुन नेहमीप्रमाणे परत यायला वळणार तोच प्रमोदने मला थांबवलं.

“सर, चहाची पावडर घ्यायची होती ना? ते बघा दुकान उघड आहे. चला..” म्हणत तो जाऊ लागला. त्याच्या मागे मी.

“किती? पाव किलो?” त्यानेच विचारलं. नाईलाजाने मी चालेल म्हणालो आणि खिशातली एकमेव शंभर रुपयांची नोट दुकानदारापुढे केली.

“मोड नाहीये दादा.२५ रुपये सुट्टे द्या ना” दुकानदार म्हणाला. माझ्या ते पथ्यावरच पडलं.

“हो का?सुटे नाहीयेत. राहू दे” मी विषय संपवणार तेवढ्यात प्रमोदने माझ्या हातातली शंभर रुपयांची नोट वरच्यावर काढून घेतली.

” त्या समोरच्या टपरीवर मोड मिळेल सर. तो माझा मित्रच आहे. आलोच मी ” मला कांही बोलताच येईना.आता तिथे त्याला मोड मिळूच नये असा विचार मनात डोकावून गेला तेवढ्यात प्रमोद आलाच.२५ रुपये परस्पर दुकानदाराला देऊन त्यांनी चहाचा पुडा घेतला आणि त्याबरोबर राहिलेल्या नोटाही घडी करून माझ्याकडे सुपूर्द केल्या.

हा वरवर दिसायला किती साधा प्रसंग. पण तोच पुढे स्पर्शून जाणाऱ्या अनुभूतीचे पूर्व नियोजन होते हा विचार आता हे सगळं लिहिताना मनात डोकावतोय आणि त्या विचाराच्या स्पर्शानेच मी भारावून गेलोय.. तसं पाहिलं तर काही दिवसांपूर्वी घडून गेलेल्या ‘लिटिल फ्लाॅवर’ एपिसोडशी या प्रसंगाचा अर्थाअर्थी कांही संबंध असणं शक्य तरी वाटतं का? पण तसा तो होताच एवढं खरं.

यानंतर चारच दिवसांनी पुढची पौर्णिमा होती.शनिवारी कामावरून मी निघणार होतो. शुक्रवारी रात्री झोपण्यापूर्वीच बॅग भरून ठेवली होती.

“पहाटे किती वाजता उठवायचं रे?” आईने विचारलं

“पाच वाजता”

सकाळी लवकर जाऊन पेंडिंग कामं पूर्ण करायची तर पाचला उठणं आवश्यकच होतं. अंथरुणाला पाठ टेकताच गाढ झोप लागली.

अचानक कोणाची तरी चाहूल लागल्यासारखं वाटलं आणि मी जागा झालो.

“कोण आहे?”

“पेपर आलाय रे. इथे टीपाॅयवर ठेवतेय. पाच वाजलेत. ऊठ.”आई म्हणाली.

“पेपर?इतक्या पहाटे?” स्वतःशीच आश्चर्य करीत मी पेपर घेतला. सहज चाळू लागलो. माझी नजर एका पानावर अचानक स्थिरावली.पटकन् उठून मी पॅंटच्या खिशातून लॉटरीचं तिकीट बाहेर काढलं. त्या पेपरमधल्या मिनी-लॉटरीच्या रिझल्टनेच माझं लक्ष वेधून घेतलं होतं. हातातल्या तिकिटावरचा नंबर मी पडताळून पाहू लागलो.माझ्या तिकिटावरील शेवटचे तीन आकडे ४७५ असे होते आणि त्याला १००० रुपयांचं बक्षिस लागलं होतं ! माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. अनपेक्षित आनंदाच्या लहरींनी मी उत्तेजित झालो. कधी एकदा हे आईला सांगतो असे झालं आणि मी तिला हाका मारू लागलो. पण…? माझा तो हाका मारणारा आवाज आईपर्यंत पोचतच नाहीय असं मला वाटत राहिलं. दूरवर जाऊन प्रतिध्वनींमधे परावर्तित झाल्यासारख्या माझ्याच आवाजातल्या हांका मलाच ऐकू येत राहिल्या आणि मी अस्वस्थ झालो. मला कुणीतरी हलवून उठवतंय असा भास झाला न् मी दचकून जागा झालो.

“पाच वाजले.उठतोयस ना?” असं म्हणत आईच मला उठवत होती. मघाशी मी पाहिलं ते एक स्वप्नच होतं तर.खरंतर पहाटे पडलेले स्वप्न म्हणजे  शुभशकूनच.पण त्याचा आनंद क्षणभरच टिकला.’ मी कधी लाॅटरीचं तिकीट घेतलेलंच नाहीय तर बक्षीस लागेलच कसं?’ या मनात उमटलेल्या प्रश्नाचं माझं मलाच हसू आलं. ‘मनी वसे ते स्वप्न दिसे’ म्हणावं तर झोपताना मी लवकर उठून आवरायच्याच विचारात तर होतो. हे असलं सगळं मनात कुठं काय होतं?आणि तरीही? या अशा स्वप्नांना काही अर्थ नसतो असं वाटलं पण अर्थ होता.ते एक ‘सूचक’ स्वप्न होतं आणि त्याचा नेमका अर्थ अधिकच गूढ होत लवकरच माझ्यापुढे उलगडणारही होता !

त्यादिवशी कामं आवरून घरी जेवायला यायला दोन वाजून गेले.नशीब काल रात्रीच बॅग भरून ठेवली होती. समोरच्या हाताला येईल तो हॅंगर ओढला. घाईघाईने कपडे बदलले आणि बॅग घेऊन बाहेर पडलो. बस सुटता सुटताच कसाबसा आत चढलो. बसायला जागा नव्हतीच. हातातली बॅग वरच्या रॅकवर ठेवणार त्याआधीच कंडक्टर तिकिटासाठी गडबड करू लागला. मी खिशातून पैसे बाहेर काढले. पन्नास रुपयांची नोट कण्डक्टरच्या हातात ठेवली. तिकीट घ्यायच्या गडबडीत हातातल्या बाकी नोटा खाली पडल्या. त्या उचलायला खाली वाकलो तेव्हा लक्षात आलं, त्या नोटांच्या घडीत कसला तरी कागदही दिसतोय. नोटांबरोबर तो कागदही खिशात सरकवला आणि तोल सावरत उभा राहिलो.

नृसिंहवाडीला गेल्यावर प्रसादाच्या नारळाचे पैसे देताना लक्षात आलं तो साधासुधा कागद नव्हता. ते मिनी लाॅटरीचं ५० पैशांचं तिकीट होतं आणि आश्चर्य म्हणजे त्यावरच्या नंबरातले शेवटचे तीन आकडे ४७५च होते ! हे सगळं कसं घडलं याचा थांगच लागेना. मनात आश्चर्य होतं..हुरहूर होती.. उत्सुकता होती आणि अनामिक असा आनंदही! मनाच्या त्याच तरंगत्या  अवस्थेत नतमस्तक होऊन मी दत्तदर्शन घेतलं आणि पायऱ्या चढून वर आलो. बाहेर पडताना वाटेतल्या लॉटरी स्टॉलवर ते तिकीट दाखवलं.

“एक हजार रुपयांचं बक्षीस लागलंय बघा” स्टॉलवाला म्हणाला. ते ऐकताच मनातल्या मनात झिरपू लागलेला आनंद मला लपवताच येईना.

“तिकिटे देऊना?”

“नको.पैसेच द्या “मी म्हंटलं.

” दीडशे रुपये कमिशन कापावं लागेल”

” चालेल”

कमिशन वजा जाता राहिलेले ८५० रुपये त्याने माझ्या हातावर ठेवले आणि मी शहारलो. नेमके ८५० रुपयेच. माझा विश्वासच बसेना. तसाच तरंगत स्टॅंडवर आलो. कितीतरी वेळ हे सगळं स्वप्नच असेल असंच वाटत राहिलं.

पुढे खूप वेळानंतर मन थोडं स्थिर झालं तेव्हा ‘मी कधीच न काढलेलं ते लॉटरीचे तिकीट माझ्या खिशात आलंच कसं?’ हा प्रश्न मनात प्रथमच उभा राहिला. हे सगळं इतकं सविस्तर सांगायचं कुणाला?माझ्या मनातल्या प्रश्नाचं नेमकं उत्तर देऊ शकेल असं होतंच कुठं कोण? शेवटी प्रमोद कुलकर्णी आमच्याच बँकेचा स्टाफ म्हणून मनातली अस्वस्थता कमी करण्यासाठी मी हे सगळं त्यालाच सांगितलं आणि तो थक्क होऊन माझ्याकडेच पहात राहिला क्षणभर.त्याने जे सांगितलं ते ऐकलं तेव्हा मनाला स्पर्शून गेलेला थरार मला आजही लख्ख आठवतोय!

त्यादिवशी माझ्या हातातली शंभर रुपयांची नोट घेऊन प्रमोद मोड आणायला समोरच्या टपरीवाल्या मित्राकडे धावला होता तेव्हा त्याला मोड मिळालीही होती. पण ते पैसे देताना त्याचा टपरीवाला मित्र त्याला सहज चेष्टेने “काहीतरी घेतल्याशिवाय मोड मिळणार नाही” असं म्हणाला होता आणि त्यावेळी प्रमोदने त्याची चेष्टा करायची म्हणून त्याच्या स्टॉलवरचं फक्त पन्नास पैशांचं एक मिनी लाॅटरीचं तिकीट घेतलं होतं. चहा पावडरचे पंचवीस रुपये देऊन राहिलेल्या नोटांच्या घडीत त्याने तेच तिकीट ठेवलेलं होतं!

हे सगळं असं आणि याच क्रमाने कसं घडलं? याचं तर्काला पटणारं उत्तर माझ्याजवळ नाहीय. पण या सगळ्याच प्रसंगांमध्ये एकमेकात गुंतलेले धागेदोरे आणि त्यांची वीण एवढी घट्ट होती की त्यात लपलेलं एक कालातीत सत्य मला लख्ख जाणवलं. दैनंदिन आयुष्यात सहज घडणाऱ्या साध्या घटना, प्रसंग आणि त्यांच्या क्रमांमधेही  कुणीतरी पेरून ठेवलेला कार्यकारणभाग असतोच. तो समजून घेणं आणि त्या ‘कुणीतरी’ पुढं मनोमन नतमस्तक होणं एवढंच आपण करायचं! चहा पावडर आणायची आठवण आईने नेमकी प्रमोद समोरच करणं, माझ्या मनात नसतानाही पुढाकार घेऊन त्यानेच मला त्या दुकानात घेऊन जाणं, तिथे मोड नाहीये हे समजताच त्याने समोरच्या टपरीवरून सुटे पैसे आणायला प्रवृत्त होणं, तिथे सहजपणे ते लॉटरीचं तिकिट विकत घेणं, नोटांच्या घड्यांत ठेवलेलं ते तिकिट अलगद माझ्या खिशात सुरक्षित रहाणं आणि हे काहीच ध्यानीमनी नसणाऱ्या मला ते सूचक स्वप्न पडणं आणि ते खरं होणं या सगळ्यामागे विशिष्ट असा कार्यकारण भाव नक्कीच होता!

” माय गॉड वील ऑल्सो  रिइम्बर्स माय लाॅस इन वन वे आॅर अदर’ हे अंत:स्फूर्तीने बोलले गेलेले माझे शब्द शब्दशः खरे करण्याची जबाबदारी ‘त्या’चीच होती आणि ती ‘त्या’ने  योग्य रितीने अशी पारही पाडली होती! एरवी हा निव्वळ योगायोग आहे असं म्हणेलही कुणी पण हे असंच घडणार असल्याची सूचक कल्पना अकल्पितपणे माझ्या मनात त्या पहाटेच्या स्वप्नाद्वारे ध्वनित होणं मला खूप महत्त्वाचं वाटतं आणि तेवढंच अतर्क्यही. माझ्या अंतर्मनाचा कण न् कण शूचिर्भूत झाला असल्याची भावना त्या क्षणी त्या अलौकिक अशा अनुभूतीने माझ्या मनात अलगद पेरली होती जी मला अतीव आनंद देऊन गेली होती! त्या आनंदाचा ठसा आजही माझ्या मनावर आपल्या हळुवार स्पर्शाचं मोरपीस अलगद फिरवतो आहे  !!

– पूर्णविराम –

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments