सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? जीवनरंग ?

☆ पुनर्जन्म –  भाग १ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆

कात्रज घाटातल्या गर्दीतून जमेल तशी वाट काढत स्नेहल तिची टू-व्हिलर दामटत चालली होती.

“अहो ताई जरा हळू जा— फुकट धडपडाल “ असं एकदोघांनी तिला ओरडून सांगितलं सुद्धा. पण तिचं कुठेच लक्ष नव्हतं. आज तिला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोचायचंच होतं. आणि घाट संपल्यानंतर पुढे आणखी १२ कि.मी. वर ते हॉस्पिटल होतं, जिथे ती नुकतीच प्रत्यक्ष प्रॅक्टिस करायला लागली होती.—- हो– ती डॉ. स्नेहल– स्त्री रोग तज्ज्ञ.

कामाचा दांडगा उत्साह आणि सर्वांशीच असणारे आपुलकीचे वागणे, यामुळे त्या हॉस्पिटलमध्ये तिचे नाव आदराने घेतले जाऊ लागले होते. त्यात तिच्या हाताला चांगला गुण  आहे असा लौकिकही मिळायला लागला होता. अगदी खूष होती ती. बाळाला जन्म देईपर्यंत वेदनेने व्याकूळ होऊन अक्षरशः आरडाओरडा करणारी स्त्री, स्वतःचे बाळ पाहताच, सगळे दुःख क्षणात कसे विसरते, आणि  कमालीच्या थकलेल्या तिच्या चेहेऱ्यावर आनंद आणि एक वेगळेच अनामिक समाधान जरा जास्तच ठळकपणाने कसे उठून दिसते, हे खरं तर ती प्रत्येक प्रसूतीच्या वेळी पहात असे. आणि अशा प्रत्येक वेळी तिलाही खूप आनंद आणि समाधान वाटायचं . 

पण आज मात्र तिच्या मनावर एक अनाहूत दडपण आलं होतं. नुकताच सातवा महिना लागलेली एक बाई काल रात्री हॉस्पिटलमध्ये दाखल झाली असल्याचा फोन अगदी पहाटेच आला होता, आणि म्हणून तिला लवकरात लवकर पोहोचायचं होतं. 

स्कुटर पार्क करून जवळजवळ पळतच ती आत गेली. पटकन हात धुवून, ग्लोव्हज आणि एप्रन घालून ती लेबर रूममध्ये गेली— अतिशय कृश आणि अशक्त दिसणारी ती बाई बेडवर अक्षरशः तडफडत होती— बाई कसली– जेमतेम सोळा-सतरा वर्षांची मुलगीच होती ती.  डॉ. स्नेहल तिला तपासायला लागताच त्या मुलीने तिचा हात घट्ट धरून ठेवला— “ आता तुम्ही इथून जाऊ नका डॉक्टर— मला खूप भीती वाटतेय. “– आणि ती एकदम रडायलाच लागली. स्नेहल तिला धीर देत होती.

“ तुझ्याबरोबर कोण आलंय ? ” या प्रश्नाचं ‘ कोणी नाही ‘ असं मानेनेच उत्तर दिलं तिने. आता तिच्या कळाही मंदावल्या होत्या. बाळाचे ठोकेही नीट लागत नव्हते. नॉर्मल प्रसूती होईल अशी कोणतीच चिन्हे दिसत नव्हती. आणि सिझेरिअनसाठी घरच्या कुणाचीतरी लेखी परवानगी घेणे भाग होते. इतक्या वेळात कुणीही तिची चौकशी करायला आले नव्हते. ‘ माझं नाव बेबी ‘ एवढंच ती सांगत होती. आडनाव सांगता येत नव्हतं. दहाबारा मिनिटांनी एक बाई कुठूनतरी आली आणि “ सुटली का नाही बया अजून ?” असं त्रासिकपणे विचारायला लागली. सिझेरियनसाठी सही द्या असं म्हटल्यावर एकदम भडकलीच. “ काही नको. त्याचा खर्च कोण करणार ? मरू दे मेली तर–कायमची पीडा टळेल एकदाची “— असं म्हणत ती बाई झटकन तिथून पसार झाली.

आता त्या मुलीची अवस्था फारच वाईट झाली होती. स्नेहलने क्षणभरच विचार केला– फॉर्मवर स्वतःच सही केली– आणि त्या मुलीला ताबडतोब ऑपरेशन-टेबलवर घेतलं. एक जेमतेम तीन पौंड वजनाची मृतावस्थेतली मुलगी जन्माला आली—’ पण ती जन्माला आली असं तरी कसं म्हणायचं ‘ हा तत्क्षणी मनात आलेला विचार स्नेहलने कसातरी दूर ढकलला. असे जन्मजात मृत मूल तिने पहिल्यांदाच पाहिलं होतं — तिने महत्प्रयासाने स्वतःला सावरलं, आणि ती त्या मुलीकडे वळली. एव्हाना तिची अवस्थाही ‘ मरते की काय ‘ अशी झाली होती. पण स्नेहलने आता त्या मुलीला जगवण्यासाठी आवश्यक ते सर्व उपचार देण्यास सुरुवात केली. संध्याकाळपर्यंत  तिच्या जिवाचा धोका टळला असल्याची खात्री झाली, आणि स्नेहल कितीतरी वेळाने आपल्या खोलीत जाऊन शांतपणे खुर्चीत रेलली.

पण तिचं मन मात्र आता जास्तच अस्वस्थ झालं होतं—‘ कोण असेल ही मुलगी? आणि तिला अशा अवस्थेत सोडून बिनदिक्कत निघून गेलेली ती बाई ? ती हिची आई नक्कीच नसणार — मग कोण असेल ? आणि आपल्याला तिच्या ऑपरेशनची जोखीम स्वीकारावी असं  अचानक का वाटलं ?– याबद्दल  मोठे डॉक्टर नक्कीच रागावणार होते, ते वेगळंच ‘—नियमात बसत नसलं तरीही त्या मुलीशी सविस्तर बोलायचंच असं तिने ठरवूनच टाकलं.

चार-पाच दिवसात त्या मुलीला खूपच बरं वाटायला लागलं. सगळ्याच पेशंटना जेवण-खाण हॉस्पिटलमध्येच दिलं जायचं, ते त्या मुलीसाठी फारच बरं झालं होतं, कारण तिला नुसतं भेटायलाही इतक्या दिवसात कुणीच आलं नव्हतं— आणि कदाचित त्या मुलीला त्यामुळेच लवकर बरं वाटायला लागलं असेल असं स्नेहलला उगीचच वाटून गेलं होतं. संध्याकाळी ड्युटी संपल्यावर स्नेहल  ठरवूनच तिच्या खोलीत गेली, आणि सहज चौकशी करावी तसं तिच्याशी बोलू लागली——

— आणि तिने तिची कहाणीच सांगायला सुरुवात केली—

‘‘ डॉक्टर त्यादिवशी तुम्ही मला माझं नाव विचारत होतात. काय नाव सांगितलं होतं मी?”

‘‘ बेबी… पण फक्त एवढंच सांगितलं होतंस.”

‘‘ हो. कारण तेव्हढंच नाव आहे माझं.”

‘‘ म्हणजे? आडनाव काय ते तरी सांग. ” 

‘‘ म्हणजे मला माझं आडनाव माहितीच नाहीये. कारण माझे वडील कोण आहेत हेच मुळात मला माहिती नाहीये. म्हणजे माझे वडील कोण? हे माझी आईसुध्दा बहुतेक सांगू शकली नसती.”

‘‘अगं…काहीतरीच काय ? ” डॉ. स्नेहल बुचकळ्यात पडली. 

‘‘ हो अहो, खरंच सांगते. कारण माझ्या मोठ्या बहिणीला असं बोलताना ऐकल्याचं मला आठवतंय् ना…”

‘‘ मोठी बहीण? मग कुठे असते ती…?”

‘‘ ढगात…”

‘‘अगं बाई, जरा नीट, मला कळेल असं सांगू शकतेस का काही?”

‘‘ हो सांगू शकते… खूप मोठी स्ष्टोरी आहे ती. पण तुम्हाला जमेल तेवढी थोडक्यात सांगते…”

आता डॉ.स्नेहलही जरा सरसावून बसली…

‘‘डॉ. मी तुम्हाला ताई म्हणू का?”… तिने अगदी अनपेक्षितपणे विचारलं, आणि का कोण जाणे, पण डॉ.स्नेहललाही लगेच ‘हो’ म्हणावंसं वाटलं. 

– क्रमशः भाग पहिला…

© मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments