☆ जीवनरंग ☆ रूखी ☆ सौ. स्मिता माहुलीकर ☆
लघुकथा : रूखी
मी लग्न होऊन सासरघरी जेव्हा आले त्या वेळेस ती मला पहिल्यांदा भेटली, सावळा वर्ण,रेखीव नाक-डोळे आणि चुणचुणीत अंगकाठी अशी ती, ” भाभी, मैं रूखी. ”
असे म्हणत माझ्या समोर येऊन छानस हसली. रूखी, आमच्याकडे घरकामाला असलेली साधारण वीस एक वर्षाची राजस्थानी तरुणी. ” रूखी.. असले कसले नाव आहे तुझे! रूखी म्हणजे तर ओलावा नसलेली असा अर्थ होतो.” मी तिला म्हणाले. ” नाही खर तर माझं नाव रूखमणी (रुक्मिणी) असे आहे, मला पण रूखी म्हटलेले नाही आवडत पण माझी सासू मला आवर्जून ह्याच नावाने हाक मारते कारण मला काही मूलबाळ नाही आहे न… .हो, पण कोणी काही पण म्हणू दे. माझा नवरा शंकर मात्र मला रूखमणीच म्हणतो.” असे म्हणतांना नवर्यावरचे तीचे प्रेम तिच्या डोळ्यात दिसत होते. समवयस्क असल्याने कदाचित ती माझ्याशी मनमोकळेपणाने बोलायची. शंकरचे म्हणजे तिच्या नवर्याचे पण तिच्यावर खूप प्रेम आहे असे तिच्या बोलण्यातून जाणवायचे.
अशीच एके दिवशी कामं करायला आली तेव्हा जरा वैतागलेलीच होती। विचारल्यावर म्हणाली ” मला न शंकरचा रागच आला आहे आज. ऐकायलाच तयार नाही आहे माझं काही॰ मी त्याला दुसरी बायको आण असे सांगते आहे. ”
“ अग..पण असे तू असताना दुसरं लग्न कसे शक्य आहे?” मीम्हणते.
” आमच्यात पंचायत बसते तिकडे आधीच्या बायकोचा होकार असला तर दूसरे लग्न करता येते.” ती म्हणते. मी निरुत्तर होते. ती बोलतच राहिली. “माझी लांबची बहिण आहे. आई-बाप कोणीच नाहीत तिला. दिसायला सुंदर आहे कोणीही तिच्या परिस्थितीचा गैरफायदा घेईल म्हणून मी विचार केला की शंकर सारख्या चांगल्या माणसाशी तीचे लग्न झाले तर बरेच होईल आणि आम्हाला पण तिच्यापासुन मूलं होतील. मी कसेही करून शंकरची समजूत घालेनच. ”
पंधरा दिवसांनी ती गावावरून आली बरोबर एक धप्प गोरी, सुमार नाकनक्षा असलेल्या तरुणीला घेऊन.
” भाभी, ही रूपा.. शंकरने हिच्याशी लग्न केले ..तुम्हाला भेटवायलाच इथे घेऊन आले. दोन दिवसानंतर गावी परत पाठवून देऊ.’
‘तुझ्या मनासारखे झाले न.. तू खुश आहेस न, झालं तर मग..” मी दोघींना चोळी बांगड्यांचे पैसे देत म्हणाले.
चार- पाच महिन्या नंतर रुक्मिणी खुशीतच रूपाला दिवस गेल्याचे मला सांगू लागली. ” येथेच तिचे बाळंतपण करणार आहे, तिला जूळे होणार आहे असे डॉक्टर म्हणाले आहेत, म्हणून आम्ही घरच्यांनी असे ठरवले आहे की पहिले जन्माला येईल ते मूल रूपाचे आणि दूसरे माझे… म्हणजे मी पण आई होणार आहे..”
मी तिला साखर खाऊ घातली. ठराविक वेळी रुपाला दवाखान्यात नेले, तेव्हा रुक्मिणी पण तिच्या बरोबर गेली होती, मी दोन दिवसानंतर कामाला येईन असं म्हणून गेली. ती आज पंधरा दिवस झाले तरी तिचा काही पत्ता नाही..मला काळजी वाटायला लागली तशी मी एक दिवशी जवळच असलेल्या वस्तीत तिचे घर होते तिथे गेले. दारातच तिची सासू बसलेली होती. रुक्मिणी..रूखी आहे का असे विचारले. ” ती आता ईथे नाही रहात ” असे म्हणताच मी रूपा बद्दल, तिच्या मुलांबदल विचारू लागले, तशी रूपा आतून रागातच म्हणाली ” ती अपशकुनी आहे.. माझं बाळ किती गोंडस आहे आणि तिचं असलेल मूलं मेलेलच जन्माला आलं. मला तिची भितीच वाटते माझ्या मुलाला पण खाऊन टाकेल ती म्हणून हाकलून दिले तिला. ” तेवढ्यात शंकर तिथे आला. ” शंकर ! तुझी रूखमणी कुठे आहे..” असे विचारल्यावर तो म्हणाला ” काहे की रूखमणी..वो तो रूखी.. है रूखी..” मी जेमतेम माझे अश्रू थोपवून तिथून परतले.
© सौ. स्मिता माहुलीकर
अहमदाबाद
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
Very nice story. Keep it up