जीवनरंग
☆ अ.ल.क. … ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) ☆
०६.
अलक
“तू नाही निघालास का?
कार्यक्रम तर संपला की.”
त्याने गाडी चालू करता करता
मित्राला विचारले.
“मागचे आवरायला
कोणीतरी थांबले पाहिजे की.”
०७.
अलक
गेले कित्येक दिवस
‘आझादी का अमृत महोत्सव’
साजरा करण्यात व्यग्र असलेला
तिची पंच्च्याहत्तरी
साजरी करायचीच विसरला.
एके दिवशी उपक्रम म्हणून
पंच्च्याहत्तरच्या वरील
ज्येष्ठ नागरीकांचा
सत्कार करायचे ठरवले
आणि तिची आठवण आली.
०८.
अलक
आयुष्याच्या उत्तरार्धात
एकदा सहज म्हणून
तिने ज्योतिषाला हात दाखवला.
ज्योतिषी तिला तिचाच
संघर्ष सांगत होता
आणि तिचे लक्ष मात्र
हातावर पडलेल्या
सुरकुत्यांकडे होते.
०९.
अलक
“अहो, येताय ना घरला?
किती उशीर झालाय.”
“अगं येवढ्या वर्षांनी
सणासुदीला दुकानात
येवढी गर्दी झालीया.”
एवढयात गडगडाटासह
जोरदार पाऊस सुरू झाला.
१०.
अलक
त्याने आडोसा पाहून
ट्रक रस्त्याच्याकडेला उभा केला.
तिने दगडांची चूल बांधत
त्यावर भांडे चढवले.
“माय, आपण असे
रस्त्यात का थांबले आहोत?”
“तुझाच हट्ट होताना,
एकदा बापाचा प्रवास
पाहायचा म्हणून.”
☆
लेखक : म. ना. दे.
(होरापंडीत मयुरेश देशपांडे)
C\O श्री मंदार पुरी, पहिला मजला, दत्तप्रेरणा बिल्डिंग, शिंदे नगर जुनी सांगवी, पुणे ४११०२७
+९१ ८९७५३ १२०५९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈