जीवनरंग
☆ भूक….भाग ४ ☆ मेहबूब जमादार ☆
(यावर कुठलाच उपाय वा पर्याय शिल्लक राहिला नव्हता.माणूसकी जपण्याला पैसा लागत नाही पण पोट भरायला पैशाशिवाय कांही चालत नाही हे त्रिकाल सत्य होतं.) इथून पुढे वाचा…
आज गावांत बैठक बोलाविली होती. गांवचे प्रमुख बोलणार होते. पण बोलणं ऐकून काय पोट भरणार नव्हतं.तरीही गावक-यानां एखादा आशेचा किरण कदाचित दिसेल या आशेनं सारे गांवकरी देवळासमोर गोळा झाले होते. प्रमुख बोलले.त्याचा आशय असा होता कि आपल्या भोवती असणा-या निसर्गाकडून कांहीही मिळवून आपण जगायला शिकलं पाहिजे.गावांत रेशनच्या दुकानांत धान्य येवून वर्ष झालं होतं. गोरगरीब,आंधळे-पांगळे कसंबसं रेशनवर जगत होते. पण सरकारला हे ही जमत नव्हतं.सर्व योजनां बंद पडल्या होत्या.त्या केंव्हा उभारी घेतील याची सूतराम शक्यता नव्हती. वटलेल्या झाडाला पालवी फुटणार नव्हती.
टेकडीवर पाण्याचे झरे होते. झाडं होती. झाडानां फळ लागत होती. हाच एक मानसिक गारवा तिथल्या राहणाऱ्या तीस एक कुटूंबाकडे होता.यावर्षी ब-यापैकी भात पिकला होता. परंतू त्याला लागणा-या किराणा मालाचा दुष्काळ कांहीकेल्या हटत नव्हता.
दुशाआजीनं गावांत फेरफटका मारला.वास्तविक तिच्या वयांच गावांत कोणीच हयात नव्हतं. तिनं घरोघरी जावून गावांतल्या बायकानां अडगळीत पडलेली चूल पेटवून स्वयंपाक करायला सांगितलं. रानांतली भाजी आणा, भात शिजवा अन मिरच्याचा ठेचा करून खावा.मुलानां भाताची पेज द्या. गावातल्या सगळ्यांना हे पटलं.भूकेपुढं गांववाले सर्व भांडण तंटा विसरून गेले.
कांही बायका तर न सांगता दूशाआजी च्या घरी येवू लागल्या.आपल्याकडे काय असलं ते देवू लागल्या.स्वतःकडे काय नसेल ते मागू लागल्या.गावानं टेकडी सोडली नाय. बाहेरून काय आणायचं नाय उलट कुणाला लागली तर मदत करायची हे सगळ्यानीं जणू ठरवून टाकलं होतं.
दुशाआजीनं रानांत ओहोळ अडवून भाजीपाला केला. तसंच गावांतलं सांडपाणी आडवून बायकानां घराशेजारी खाण्यापूरत्या भाज्या लावायला सांगितल्या.
महिन्यांभरात लावलेल्या बियानां रोपटी उगवून आली. कुठं भाजी तर कुठे मिरची, दोडका, कारलं यानां फुलं येवू लागली. कांही दिसांनी त्यानां फळ लागणार होती. कांही खर्च न करता टेकडीवरल्या लोकांच जीवन चालणार होतं.
तिथल्या वस्तीनं बाहेरची कुठलीही खबरबात येवू दिली नाही. त्याचबरोबर येणा-या कुठल्याच भल्या-बू-या बातमीवर विश्वास ठेवला नाही. ते ऐकून होते की सिलेंडरला आज नंबर लावला तर तो सहा महिन्यानीं मिळणार होता. पेट्रोल पंपावर तर तेल मिळण्याची कुठलीच शाश्वती राहीली नव्हती. मूळांत त्यानां हे काहीच नको होतं.
टेकडीवरील वस्तीतील सर्वानां दुशाआजीचं स्वावलंबनांच गणित पटलं होतं. या सर्व बाबी तरूणांपासून ते म्हाता-यानींही उचलून धरल्या. बायकानींही आपला हातभार यथाशक्ती लावला होता. गावांत पाण्याची कमतरता नसलेने कुठल्या गोष्टीची उणीव भासली नाही. पाणी हेच जीवन आहे हे त्यांना पटलं होतं. प्रसंगीं पाण्यावर तहान भागवून गांवकरी जमेल ती कामे आनंदाने करत होते. गावप्रमुखानीं आजीला साथ दिली. त्यानीं गांवच्या शिपायांमार्फत पिकलेली भाजी प्रत्येक घरांत पोहचविली. कांही कुटूंबाकडे भाकड म्हशी होत्या. त्यांच्या लहान मुलानां त्यामूळे दुध मिळत नव्हतं. त्यानां लहान मुलांसाठी दुध पोहोच केलं.
क्रमशः…
© मेहबूब जमादार
मु- कासमवाडी, पो-पेठ, ता-वाळवा
जि-सांगली.मो-९९७०९००२४३
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈