डॉ. ज्योती गोडबोले

?जीवनरंग ?

☆ निश्चयाचे बळ— ☆ डॉ. ज्योती गोडबोले☆ 

“जाड्या,किती वाजता येतो आहेस रे?”  रोहनचा सेल  खणखणला. शेजारी रिद्धी उभी होती. 

“आई बघ बघ. याला नाही तुम्ही कोणी बोलणार. मुलगा आहे ना. मला मात्र कधीही रात्री मैत्रिणीकडेही रहायला जाऊ देऊ नका.” 

“रिद्धी,जलो मत . मॉम, पाचसो रुपये दे तो.आज बाहर खाना खाएंगे… “

आईने कौतुकाने 500 रु रोहन ला दिले.

“आई, अग किती डोक्यावर बसवशील ग. केवढा झालाय लठ्ठया बघ की. अग ११०  किलो क्रॉस केले या गाढवाने.” 

रोहन कॅन्टीनमध्ये मित्रांबरोबर होता… “  जाड्या, आयआयटी entrance दिलीय ना “ काय निघणार score? 

करणार का crack ?” सुहासने चेष्टेने विचारले.

रोहन हुशारच होता. आत्ताही पेपर्स मस्त गेले होतेच. पण काय सांगावे– “ रोहन काहीच बोलला नाही.

शेजारी केतकी बसली होती. केतकीनेही आयआयटी  entrance दिली होती. शाळेपासून ते कॉलेजपर्यंत केतकी रोहनची प्रतिस्पर्धी होती. जी जी परीक्षा रोहनने दिली, त्यात त्याच्यापेक्षाही  जास्त यश मिळवून केतकी  पुढे जात असे.

कुचेष्टेने रोहन म्हणाला, “ काय बाबा, आपल्या कॉलेजमध्ये आहेत की अतिरथी महारथी.” 

केतकी काहीच बोलली नाही. तिला मजा वाटायची. वाटायचं ‘ हा मुलगा शाळेपासूनच आपला हेवा का करतो,

कधीही निखळ मनाने कौतुक तर सोडाच, पण याने कधी अभिनंदनही केले नाही आपले.’ .. 

आयआयटी  entrance  चा result लागला. केतकीची ४००, तर रोहनची ८०० वी रँक आली. 

केतकीचे पवईच्या आयआयटी मध्ये  पहिल्याच लिस्टमध्ये नाव आले आणि तुला तिथे सहज प्रवेश मिळाला. रोहनला मिळाले खरगपूर आयआयटी . 

कुत्सितपणे रोहन म्हणाला, “ आता काय… पवई म्हणजे आकाशाला हात लागले.” 

केतकी म्हणाली,” तुझे मनापासून अभिनंदन रोहन.. खरगपूर iit सुरेखच झालं. “ 

ती आपल्याला खिजवते आहे असेच रोहनला वाटले.

नंतर कितीतरी महिने केतकीला पुण्याला यायला जमलेच नाही. मग एकदा तिला रोहन भेटला.

“ केतकी कॉफी  प्यायला जाऊ या ?” 

“ चल की जाऊ ” –केतकीने आमंत्रण स्वीकारले.

“ कसं काय चाललंय तुझे रोहन ?” तिने विचारलं. 

“ कॉलेज चांगले आहे ग. पण मला फार  ragging होतेय. मला  लठ्ठया,जाड्या,गवा हिप्पो अशी नावे ठेवलीत सगळ्यांनी. मला तर हे सोडूनच द्यावे असे वाटू लागलेय. माझे नाही लक्ष लागत अभ्यासात. मला जबरी इनफीरिओरिटी कॉम्प्लेक्स आलाय. “ आयुष्यात प्रथमच रोहन तिच्याशी इतका  उदास होऊन बोलत होता.

– “ ही सगळी माझीच चूक आहे केतकी. आजी आई आजोबांनी  मुलगा मुलगा म्हणून माझे फाजील लाड केले.कधी पोहायला जाऊ दिले नाही. कधी ग्राउंडवर गेलो नाही. तू बघ ना कशी सडसडीत आहेस. मला आठवतंय तू रोज पोहायला जायचीस. आणखी काय करतेस ग तू ?” 

“ रोहन, मी रोज निदान १ तास जिममध्ये घाम गाळते. मला लठ्ठपणा आवडत नाही. अरे रुप आपल्या हातात नसतं ,

पण  शरीर प्रमाणबद्ध ठेवणं तर असतं नं आपल्या हातात. हे बघ. एवढा निराश नको होऊस. तिकडे एखादी जिम शोध.  इथे आणखी किती दिवस आहेस? “ 

“ आहे की अजून एक महिना.” 

“ अरे वा. मग हे बघ, माझी एक dietician मैत्रीण आहे. घेतोस का तिचा  सल्ला ? बघ हं, म्हणजे माझी तुझ्यावर अजिबात बळजबरी नाही. “ 

रोहन लगेच म्हणाला, “ केतकी, घे तिची अपॉइंटमेंट. मला या दुष्ट चक्रातून बाहेर यायचंय. लाज वाटते ग माझ्या मापाचे टी शर्टस मिळत नाहीत हे सांगायची. “

“ चिल रोहन. मनापासून ठरवले आहेस ना, मग जमेल तुला. करशील तू. आपण एकत्र वाढलोय रोहन. आठवतंय, मी खूप वेळा तुला सांगायचा प्रयत्न केला होता, पण प्रत्येक वेळी तू माझी हेटाळणीच केलीस. अरे, खरे बोलणारे मित्र कमी असतात रोहन. पण असं विचार तू कधी केलाच नाहीस. “ 

“ केतकी खरंच सॉरी. खूपदा मी वाईटच वागलो तुझ्याशी. पण तू ते  मनात नाही ठेवलंस. त्याबद्दल मनापासून थॅंक्स . 

“ चला मग – आता नक्की  मिशन ‘ weight loss ‘ सुरू ?” 

रोहन केतकीच्या मैत्रिणीला भेटला.

“ हे बघ रोहन,मी सांगते तसेच follow करणार असलास तरच मी तुला guide करीन. मी cheat day देणार नाही.

किमान पूर्ण एक वर्ष तुला स्वतःसाठी द्यावे लागेल. मला दर वीकला तुझे वजन, आणि फोटो मिळाला पाहिजे. आणि इथे आलास की न चुकता भेटणार आहेस तू मला. ठीक आहे ?”

रोहनने सगळे मान्य केले, आणि वजन कमी करण्याचे अगदी मनापासून ठरवले. 

हॉस्टेलवर अपेक्षेप्रमाणेच स्वागत झाले— “ आलात का जाडोबा ? आणखीच जाड होऊन आलात की काय ?” 

रोहन काहीच बोलला नाही. नहमीसारख चिडलाही नाही. 

त्याचा रूम पार्टनर सचिन त्याचा सच्चा मित्र होता. “ सचिन,मला एखादी चांगली जिम सांग ना. 

मी खरंच आता मनावर घेतलंय. माझं हे अस्ताव्यस्त वजन आता माझ्याच डोळ्यांना खुपायला लागले रे.. “ 

“ शाब्बास रे दोस्ता. आता सगळं तुझ्या मनासारखंच  होईल बघ. उद्याच जाऊ या आपण जीमला. ‘ 

“ सचिन,पण प्लीज हे कोणालाही सांगू नकोस हं.” 

“ अरे नाही रे दोस्ता. नाही सांगणार. आता तू  करूनच दाखव मेरे यार.” 

रोहनने जिममध्ये वेगळी फी भरून पर्सनल ट्रेनर लावला.

ते ट्रेनर त्याला म्हणाले, “ हे बघ, मी अतिशय वाईट टीचर आहे. माझे ऐकले नाही तर मी चक्क तुला झोडून काढेन.” 

“ चालेल सर. पण मी आता मागे नाही हटणार.”

रोहनची जिम सुरू झाली… 

डायटीशीयन ऋचाने  सांगितलेले क्रॅश डाएटही सुरू झाले. पहिल्याच महिन्यात रोहनचे ५ किलो वजन कमी झाले.

“ हुरळून जाऊ नका. नंतर ते मुळीच  कमी होत नाही बरं “ सर जरा कडक शब्दातच म्हणाले.

ऋचा सतत संपर्कात होतीच.

“ रोहन, तू आता सकाळी किंवा रात्री– जेव्हा वेळ होईल तेव्हा walk करायचा आहे. रोज निदान ६ मैल. कसंही करून हे जमवायचंच.” 

रोहनने रात्री  brisk walk घ्यायला सुरुवात केली. कारण त्याला त्याच्या अतिशय व्यग्र दिनक्रमात सकाळी त्यासाठी वेळ देणे अशक्य होते.  रोहनचे टार्गेट ७५ किलो होते. ६ महिन्यात रोहन ८८ किलो वर आला. 

आता हॉस्टेलची मुले म्हणू लागली–“ आगे बढो ,जाड्या. मस्त चाललंय की. अरे हो, आज रात्री feast आहे बरं का. गुलाबजाम आणि दहिवडे करणार आहे अण्णा. येतो आहेस ना ? “.

रोहन काहीच बोलला नाही. “ नको येऊ रे बाबा.”– टवाळ शब्द त्याला ऐकू आल्याशिवाय राहिले नाहीत. 

एकदा ग्राफिक्सच्या  सरांनी विचारलं, “ रोहन, कसा आहेस. झेपतंय ना सगळं तुला? नाही, जरा अशक्त दिसतो आहेस म्हणून विचारतो आहे.” 

“ हो सर, झेपतंय ना.. मी मस्त आहे.” 

रोहनला खरोखरच व्यायामाची गोडी लागली होती. सुट्टीत घरी गेला तेव्हा तर आजी आजोबा बघतच राहिले–

“अरे काय रे हे? किती  वाळला आहेस…. आता इथे आहेस तर छान भरपूर खा पी. काय हे तुझे शरीर… “ 

“आजी, प्लीज मला भरीला पाडू नकोस. मी अजिबात  काहीही खाणार नाही.” त्याने बजावूनच टाकलं. 

तो लगेच ऋचाला भेटायला गेला. 

“व्वा रे पठ्ठे. मस्त दिसतोय की अगदी. पण तरी अजून १३ किलो कमी व्ह्यायला हवेत. सोडू नको हं  जिम, आणि डाएट प्लॅन.” 

“नाही ग बाई, अजिबात सोडणार नाही. आता मलाच आवडत नाही असंतसं काही खायला. कसा होतो ना गं मी  पूर्वी….. शी….. पण आता मी XL size पर्यंत आलो आहे. पूर्वी मला प्लस size च शोधावा लागायचा. माझी मलाच लाज वाटायची बघ. तुला मनापासून थँक्स ऋचा आणि केतकीलाही.” 

आता बघताबघता रोहनचे वजन २२ किलो कमी झाले. तो खूपच हँडसम आणि फिट दिसायला लागला होता .

– ५`१०” इंच उंची आणि  ७२  किलो वजन… म्हणजे एकदम परफेक्ट शरीरयष्टी….. 

बरोबर एक वर्षानंतर केतकीने  त्याला बघितले, आणि …..”  Oh My my!!! मी नक्की रोहनलाच बघतेय ना !

काय हा सुंदर बदल रे! वावा!! so proud of you यार… “ 

 रोहन छानसं हसला…. “ केतकी,अगं या वजनाने स्वतःबरोबर माझा माज पण उतरवला बघ. मी पूर्वीचा रोहन नाही राहिलोय आता. आणि याचे सगळे श्रेय तुला, ऋचाला, आणि जीमला बरं का… I must accept … चल, कॅफेत  जाऊ या ? आणि आता मला पूर्वीसारखी गोड कॉफी अजिबात नको. मीही तू कायम घेतेस तो ग्रीन टीच घेईन. केतकी…my guide..  गुरू.. आणि फिलॉसॉफर सुद्धा ….खरंच थँक्स ग. “ 

आणि दोघेही हसत हसत कॅफे कडे वळले.

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments