सुश्री मंजुषा सुनीत मुळे
जीवनरंग
☆ अनपेक्षित – भाग 1 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆
त्या दोघांना तिथे बसून एव्हाना दोन तास होत आले होते. समोरचं ते दार अजूनही उघडलं नव्हतं. दोघांचीही अस्वस्थता शिगेला पोहोचली होती. गेले काही महिने ते या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते… आणि त्याचं कारणही तसंच होतं— त्यामुळे दोघांचंही एक नवं आयुष्य सुरु होणार होतं —– भूमिका बदलणार होत्या — त्यासाठीच तर ते अमेरिकेहून मुद्दाम इथे आले होते.
आत्ता तिथे अशी वाट पहात बसलेल्या त्या दोघांच्याही मनातल्या आठवणी आणि अस्वस्थता दोन्ही बहुतेक अगदी सारख्याच होत्या…. अगदी तेव्हापासूनच्या, जेव्हापासून त्यांना आई-बाबा होण्याची कमालीची आस लागली होती.
—– लग्नाला चार वर्षं होऊन गेली तरी तशी कोणतीच चाहूल लागली नव्हती. डॉक्टरांच्या सल्ल्याने कितीतरी प्रकारच्या टेस्ट्स करून झाल्यावर अगदीच नकोसे सत्य कळले होते — तो सक्षम असला तरी ती मात्र कधीच आई होऊ शकणार नव्हती—- दोघेही मनाने काही काळ पार कोसळून जाणं स्वाभाविकच होतं. दोघेही कमावते होते. अमेरिकेत स्थायिक होण्याचा निर्णयही एकमताने घेतलेला होता.. आता एवढी एकच उणीव राहणार होती, आणि हे शल्य इतर कुठलाच आनंद घेऊ देत नव्हतं त्यांना .—- “ मला काय वाटतं राणी, आपण एखादं गोंडस बाळ दत्तक घेऊयात का ? “ अखेर एक दिवस त्याने तिला विचारलं. क्षणभर त्या विचाराने ती हुरळूनच गेली. पण— त्याच्यावरचं तिचं उत्कट प्रेम तिला जागं करत म्हणालं की ‘ अगं दोष तुझ्यात आहे, पण तो तर यासाठी सक्षम आहे ना ?– मग दुसऱ्या कुणाच्या बाळाला त्याने आपलं का मानायचं —’ आणि इथे तिच्या विचारांची नौका एकदम त्या नुकत्याच वाचलेल्या माहितीपर्यंत येऊन थांबली. तिचा पक्का निर्णय झाला…. सरोगसी — येस– पण त्याला बाप होण्याची कितीही तीव्र इच्छा असली तरी त्याचंही तिच्यावर इतकं प्रेम होतं की यामुळे तिच्या मनातलं शल्य आणखी गडद होईल– कायमचं — असाच विचार तो करणार, आणि या उपायाला नकार देणार याची तिला खात्री होती. मग कसंही करून त्याला यासाठी तयार करायचंच असा तिने चंगच बांधला—
“ अरे दुसऱ्या एका अनोळखी स्त्रीच्या पोटात जरी वाढवलं तरी होणारं बाळ शेवटी आपल्या दोघांचंच असणार आहे ना— त्याचं रंग-रूप, स्वभाव, सगळं काही आपल्या दोघांसारखंच तर असणार आहे – आणि जन्माला आल्या क्षणापासून ते आपलंच असणार आहे —सगळी माहिती आणि प्रोसिजर नीट वाचलीयेस ना तू – मग तरी का नाही म्हणतो आहेस ? –” आणि खूप वेळा खूप सारं समजावल्यावर एकदाचा तो तयार झाला होता— अमेरिकेपेक्षा भारतात यासाठीचा खर्च कमी असेल या विचाराने मग ते मुद्दाम भारतात आले होते. अशा उपचारांसाठी ख्यातनाम असणाऱ्या मुंबईतल्या डॉक्टरांशी खूप चर्चा करून , असंख्य शंकांचं निराकरण करून घेऊन अखेर हा सरोगसीचा उपाय त्यांनी निश्चित केला होता .
डॉक्टरांनी आवश्यक ती सगळी वैद्यकीय माहिती तर दिली , पण त्यानंतरही असंख्य प्रॉब्लेम्स समोर येणार आहेत याचा त्यांनी विचारच केला नव्हता — पहिला प्रश्न होता तो अशी भाडोत्री आई व्हायला तयार असणारी बाई शोधण्याचा. आणि गम्मत बघा— त्यांच्या चेहेऱ्यावरची प्रश्नचिन्हे पाहून डॉक्टर खूश झाले – लगेच म्हणाले– “ आता तुम्ही कसलीच चिंता करू नका– इथे या एकाच छताखाली तुमचे सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व होतील बघा . — म्हणजे अगदी नव्याने यासाठी तयार झालेली बाई शोधून देणारे एजंटच आहेत आमच्याकडे “—- हे ऐकताच दोघेही एकदम दचकले — आपण अजून जगाच्या खूप मागे आहोत हे त्यांच्या पूर्णपणे लक्षात आलं,आणि आता पुढे काहीही ऐकायची त्यांच्या मनाची नकळतच तयारी व्हायला लागली—- कारण आता बाळ हवं –एवढाच ध्यास लागला होता त्यांना. मग बाळाला अमेरिकेत नेण्यात अडचण येऊ नये म्हणून इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी मंजूर केलेल्या स्टॅंडर्ड मसुद्यानुसार कॉन्ट्रॅक्ट करणे… त्या भाडोत्री आईबरोबर — हा पहिला धक्का —- मग त्या बाईबरोबर टप्प्याटप्प्याने करावे लागणारे आर्थिक व्यवहार– म्हणजे करार करतांना इतके— गर्भधारणा झाल्यावर इतके– डिलिव्हरीच्या वेळी उरलेले इतके—- या पेमेन्टच्या स्लॅब्स ऐकून, आपल्याला बाळ मिळणार आहे की एखादे नवे घर ? हा विचार तिच्या मनात आला होता आणि क्षणभर तिला खुद्कन हसूही आलं होतं —- पण त्याचा चेहरा मात्र जास्तच गंभीर झाला होता. या सगळ्याचा त्याच्या मनाला खूप त्रास होतोय हे तिच्या लक्षात आलं आणि मग कितीतरी वेळ ती त्याच्या खांद्यावर हळुवारपणे थोपटत राहिली होती. नंतर खर्चाची आणखीही कितीतरी मोठी यादी डॉक्टरांनी वाचून दाखवली होती — एजंटचे कमिशन, डॉक्टरांची अथपासून इतिपर्यंतची प्रचंड फी, कायदेशीर कागदपत्रांचा खर्च, त्या निराधार बाईला यासाठी तयार करणाऱ्या “ एक्स्पर्ट ब्रोकर “ ची फी, — आणि त्याच्या लक्षात आलं की हा उपाय करण्याचा खर्च अमेरिकेपेक्षा भारतात नक्कीच कमी असेल हा त्याचा भ्रम होता, आणि त्यामुळेच त्याला मोठाच धक्का बसला होता.
एजंटने लवकरच एका बाईची माहिती मिळवून डॉक्टरांना आणि त्या दोघांनाही सांगितली ..“ वावा अगदी छान. हिला स्वतःला तीन मुलं आहेत. त्यामुळे ती सरोगेट मदर व्हायला अगदी सक्षम आहे. मला वाटतं ही बाई यासाठीची अगदी योग्य कॅन्डीडेट आहे “ डॉक्टर लगेच म्हणाले होते. आणि त्या बाईला असलेली आधीची तीन मुलं हा डॉक्टरांना वाटत नसला तरी त्या दोघांना एक फार गंभीर मुद्दा वाटत होता. पण आता ते बाळासाठी काहीही मान्य करायला तयार होते—- त्या बाईचे फक्त गर्भाशयच नाही, तर तिचे आईपणच आपण भाड्याने घेतलंय असा एक नकोसा विचित्र विचार तिच्या मनात झर्र्कन येऊन गेला —
क्रमशः…
© मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२