सौ. उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ मला नाही मोठं व्हायचं… भाग १ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆
परी आता आठ वर्षाची आहे. तिला लवकर लवकर मोठं व्हावं, असं वाटतय. आत्ता आत्ताच तिचा दुधाचा एक दात तुटलाय. तिने तो अगदी संभाळून एका डबीत ठेवलाय. छोट्या छोट्या आतून येणार्याु दाताकडे बघत ती आता स्वत:ला मोठ्यांच्यामध्ये सामील करते. शाळा सुटल्यानंतर ती रोज असं काही तरी काम करू इच्छिते, जे तिला मोठं बनवेल. ज्या गोष्टी ती बघते आणि तिला जे आवडतं, त्याच गोष्टी ती करू इच्छिते.
तिला तिच्या टीचर खूप आवडतात. त्या एखाद्या जपानी बाहुलीसारख्या दिसतात. त्या सगळ्याच मुलांना आवडतात. त्यामुळे तिची पहिली पसंती आहे, मिस वांग बनणं. तिच्यासारखंच शिकवायचं, तसेच कपडे घालायचे आणि तसंच हसायचं. हातात पट्टी घेऊन फळ्यावर लिहिलेले शब्द समजावून सांगायचे. सायन्सबद्दल सांगायचं. त्यांना सगळं येतं. जेव्हा त्यांनी ढगातून पाणी कसं पडतं, हे सांगितलं, तेव्हा सगळा वर्ग त्यांच्या बोलण्यात गुंगून गेला होता.
ती गोष्ट तिने घरी येऊन आपल्या छोट्या भावाला, निकला म्हणजे छोटूला सांगितली, तेव्हा त्याने लक्षच दिले नाही. परीला कळलंच नाही, ही गोष्ट जेव्हा मिस वांग यांनी वर्गात सांगितली होती, तेव्हा सगळा वर्ग, ‘अरे वा!’ असं म्हणत होता. पण छोटूने तर इतक्या चांगल्या गोष्टीकडे लक्षच दिले नाही. खरं म्हणजे छोटू अगदी बुद्दू आहे. त्याचं सगळं लक्ष नेहमी खेळात असतं.
परीने मग मोठ्या उत्साहाने तीच गोष्ट तिच्या मम्मी-पप्पांना सांगितली, तेव्हा तेही फक्त, ’हं… हं…’ करत राहिले. त्यामुळे परीला वाटलं, तिला मिस वांगसारखं नीट समजावून सांगता आलं नाही. ती खूप छान समजावून देते. म्हणून तर सगळे ‘वा! वा!’ म्हणतात. मग तिने आपल्या मम्मीला सांगितलं, ती आता खूप वाचेल, लिहील आणि मुख्य म्हणजे समजावून सांगण्याची खूप प्रॅक्टीस करेल , कारण तिला मिस वांगसारखं, इयत्ता दुसरीची टीचर व्हायचं आहे. तिच्या मम्मीला हे का आवडलं नाही, कुणास ठाऊक? म्हणाली, ‘तू प्रायमरी टीचर कशी बनशील? तुला तर डॉक्टर बनायचय.’
‘नाही मम्मी, मला डॉक्टर बनायचं नाही. मला कुणाला सुई टोचणं आवडणार नाही आणि कडू कडू औषध देणं तर मुळीच आवडणार नाही. डॉक्टर वाईट असतात. सगळी मुले त्यांच्याकडे बघून रडतात’. तिला माहीत होतं, जेव्हा जेव्हा शॉट्ससाठी ती डॉक्टरांकडे जायची, तेव्हा तेव्हा खूप वेळ बाहेर बसावं लागायचं. त्यानंतर जेव्हा तिचा नंबर यायचा, तेव्हा डॉक्टर येऊन धस्सकन तिच्या दंडात सुई खुपसायचे. इतकं दुखायचं तेव्हा. असं कुणी लहान मुलांना सुई कशी टोचू शकतं? असलं काम ती कधीच करणार नाही.
परी किंवा छोटू दोघांपैकी कुणाला ताप आला, तर ते डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये जात. बिचारा छोटू खोलीत जाताक्षणीच रडू लागतो आणि जोपर्यंत तिथून बाहेर पडत नाही, तोपर्यंत रडतच राहतो. जे लहान मुलांना रडवतात, असे लोक तिला मुळीच आवडत नाहीत म्हणून ती डॉक्टर नाही बनणार. कधीच नाही.
डॉक्टर नाहीं, टीचर नाहीं, मग तिने सलूनचं काम करण्याचा विचार का करू नये? सगळे लोक सलूनमध्ये जातात. तिलादेखील केस कापून घेण्यासाठी जावं लागतं. पप्पा तर दर आठवड्याला जातात. मम्मीदेखील आयब्रो करण्यासाठी जाते. मग तिने सलून उघडलं आणि आजी, आई दोघींना आपल्या सलूनमध्ये बोलावलं. दोघी मॅमना चहा-कॉफीबद्दल विचारलं. दोघींचे केस सेट करण्याचा प्रयत्न केला. खोटं खोटं नेलपॉलीश लावलं. दोरा घेऊन आयब्रो करण्याचा प्रयत्न केला. दोरा घेतला. त्याने भुवईला स्पर्श केला आणि काढून घेतला. तेवढ्यातही मम्मी ’ऊं आं’ करायला लागली. तिचं खरं क्रेडिट कार्ड घेऊन खोटं खोटं स्वाईप केलं. अगदी खूश होती ती आज.
एवढ्यात पप्पा आले. तिने त्यांनाही केसांना जेल लावून केस नीट करण्याविषयी सांगितलं. पण ते नाही म्हणाले. ते म्हणाले, ‘काय परी तू पण नं…. तू हे काम नाही करायचं. माझी राजकुमारी काय इतरांच्या केसांची कापाकापी करेल? मुळीच नाही. कधीच नाही.’
तिने विचार केला, आता हे कामसुद्धा माझ्या यादीतून बाद झालं. मग आता करायचं म्हंटलं, तर कारायचं तरी काय? मग तिला वाटलं, एखादं चंगलसं दुकान सुरू करावं. घरात इतकी खेळणी पडलीयत, कित्येक खेळण्यांना कुणी हातसुद्धा लावत नाही. मग तिने आपल्या जुन्या खेळण्यांचं दुकान सुरू केलं आणि खेळणी विकू लागली. तिचा छोटा भाऊ देखील यात तिला मदत करू लागला. कुणीही यावं आणि आपल्याला हवं ते खेळणं घ्यावं. प्रत्येक खेळणं डॉलर शॉपप्रमाणे एका डॉलरला विकलं तर चांगली कमाई होईल. बाजारात कुठेही इतकं स्वस्त खेळणं मिळणार नाही. पण हे काम तिच्या आजीला पसंत पडलं नाही. ती म्हणाली, ‘दुकान उघडायचच असेल, तर ब्रॅंड नेम असलेलं उघड. सेकंड हँड, वापरलेल्या गोष्टींचं नको. ‘
आता तिने करायचं तरी काय? मग तिच्या डोक्यात एक नामी कल्पना आली. हे काम आजीला नक्की आवडेल, असं तिला वाटलं. उन्हाळ्याचे दिवस आहेत. बाहेर टेबल ठेवून ती लिंबाचं सरबत तयार करून विकेल. एका डॉलरला एक ग्लास सरबत विकलं, तर या बाजूने जाणारे नक्कीच सरबत विकत घेतील. लिंबू घ्या. ते पिळा. त्यात खूप पाणी घाला. साखर घाला, की झालं सरबत तयार. एकदम सोप्पं. हे तर आमच्या वर्गाने शाळेतही केलं होतं. त्यावेळी सगळ्यात जास्त आमच्याच वर्गाचे पैसे एकत्र झाले होते.
ती टेबल, ग्लास वगैरे सामान एकत्र करतच होती. एवढ्यात आजोबांनी टोकलं. बहुतेक यावेळी आता नाही म्हणायचा त्यांचा नंबर होता. ‘तू इतकं छोटं काम करण्याचा विचार करू नकोस बेटा! आपलं तर फाईव्ह स्टार हॉटेल आहे. सगळ्या शहरात नंबर वन! म्हणून मोठ्या कामाबद्दल विचार कर! ‘
परीला माहीत होतं, आजोबा घरात सगळ्यात मोठे आहेत. त्यांना मोठी मोठीच कामं आवडतात. पण त्यांच्या हे कसं लक्षात येत नाही, की प्रत्यक्षात अनेक लोक हे काम करतात. त्यांचे मम्मी-पप्पा, किंवा आजी-आजोबा कधी त्यांना नको म्हणत नाहीत. मी कुठलंही काम करायचं ठरवलं, तरी ते कुणालाच आवडत नाही. हा माझ्यावर अन्याय आहे. शी:! सगळंच कसं वैतागवाणं. सगळंच कसं निराशाजनक!
क्रमश:…
मूळ हिंदी कथा 👉 ‘बडों की दुनिया में’ भाग – १ – मूळ लेखक – डॉ हंसा दीप
अङ्ग्रेज़ी भावानुवाद 👉 In the world of Elders Part – 1 – Translated by – Mrs. Rajni Mishra
अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈