श्री राजीव गजानन पुजारी

? जीवनरंग ?

☆ आर्यनची नौका – एक विज्ञान कथा…भाग 4 ☆ श्री राजीव ग पुजारी 

(या विश्वातील मानवाच्या अस्तित्वाची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. आपल्या देशाला हजारो वर्षांचा वैज्ञानिक वारसा आहे. तोच आपण मंगळावरही पुढे चालवायचा आहे.”) इथून पुढे —-

पुढील दोन वर्षांत डायपोल मॅग्नेट व त्याला प्रस्थापित करणारा डॉ. कलाम उपग्रह, PET फिल्म व ती वाहून नेणारा डॉ. नारळीकर उपग्रह, जनुकांत बदल करून गोठविलेल्या सायनोबॅक्टेरिया जिवाणूंचे सीलबंद केलेले प्रत्येकी दहा किलोंचे चारशे डबे, विक्रम लँडर, प्रग्यान रोव्हर व पुष्पक हेलिकॉप्टर आदिंचे उत्पादन युद्धपातळीवर करण्यात आले. प्रकल्पाला “ मंगळ पुनरुज्जीवन “ असे नाव देण्यात आले.

    २६ जानेवारी २०२५– भारताचा गणतंत्र दिवस. श्रीहरीकोटा येथील लॉन्च पॅड क्रमांक दोन वरून GSLV-mk3 प्रक्षेपकाने पहाटे पाच वाजून तेवीस मिनिटांनी अंतराळात झेप घेतली.२४ ऑगस्ट २०२६ ला डॉ. कलाम उपग्रह मंगळाच्या L1 बिंदूच्या होलो कक्षेत सोडण्यात आला. नंतर यान मंगळाच्या भूस्थिर कक्षेत आले. तेथे डॉ. नारळीकर उपग्रह प्रस्थापित करण्यात आला. त्यानंतर यानाच्या क्रूझ स्टेजपासून डिसेंट स्टेज वेगळी झाली. पॅरेशूट व डिसेंट स्टेजवरील थ्रस्टर्स यांच्या मदतीने रोव्हर मंगळावर उतरला. डिसेंट स्टेज रोव्हरपासून वेगळी झाली व पॅरेशूटच्या सहाय्याने बाजूला जाऊन उतरली. आता रोव्हर वर्षभरानंतर कार्यरत होणार होता. MMRTG (मल्टीमिशन रेडिओआयसोटोप थर्मोइलेक्ट्रिक जनरेटर ) तंत्रज्ञानाने त्याला अव्याहत वीज पुरवठा होत होता. रोव्हरच्या पोटात सायनोबॅक्टेरिया जीवाणूंचे डबे व पोटाखाली हेलिकॉप्टर बांधलेले होते.

    डॉक्टर कलाम उपग्रहावरील डायपोल चुंबकाने त्याचे काम करायला सुरुवात केली. आता सौरवादळे व अंतरिक्ष प्रारणे यापासून मंगळ सुरक्षित झाला होता. डॉक्टर नारळीकर उपग्रहाला जोडलेली PET फिल्म उलगडून हळू हळू १२५ कि. मी. त्रिज्येचा आरसा तयार झाला. सूर्यापासून येणाऱ्या प्रकाशाचे परावर्तन करायला त्याने सुरुवात केली. मंगळाभोवती भ्रमण करणारे मंगळयान मंगळाच्या हवामानाचा वास्तविक (इन रिअल टाइम ) अहवाल इस्रोकडे पाठवीत होते. हळूहळू ध्रुव प्रदेशातील शुष्क कार्बन डाय ऑक्साइडचे वायूत रूपांतर होऊ लागले. सौर वादळे नसल्याने हा वायुरूपातील कार्बन डाय ऑक्साइड वातावरणात साठू लागला. त्याच्या हरितगृह परिणामामुळे मंगळाचे तापमान वाढू लागले. जमिनीखालील व खडकांच्या भेगांतील गोठलेले पाणी द्रवरूपात भूपृष्ठावर येऊन त्याचे ओहोळ वाहू लागले. हळूहळू ओहोळांचे रूपांतर ओढे, नाले, नद्या यांमध्ये झाले. खोलगट ठिकाणे पाण्याने भरून गेली. या सर्वांची छायाचित्रे मंगळयान इस्रोकडे पाठवीत होते. इकडे मंगळावर पाण्याचे ओहोळ वहात होते, तर तिकडे इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या डोळ्यांतून आनंदाश्रूंचे ओघळ वहात होते. एक वर्षानंतर म्हणजे ऑगस्ट २०२७ च्या शेवटच्या आठवड्यात इस्रोकडून सूचना आल्यावर पुष्पक हेलिकॉप्टर प्रज्ञान रोव्हर पासून वेगळे झाले. रोव्हरच्या यांत्रिक हाताने जिवाणूंनी भरलेला दहा किलोचा डबा हेलिकॉप्टरमध्ये ठेवला. हेलिकॉप्टरने उड्डाण केले व इस्रोच्या सूचनेनुसार ठरविलेल्या पाणथळ जागेवर जाऊन डब्यातील जिवाणू त्या जागेवर पसरले. रोज दहा खेपा असे करून चाळीस दिवसांत मंगळावरील सर्व पाणथळ जागांवर जिवाणू पसरण्यात आले. दर महिन्याने हेलिकॉप्टर पूर्ण मंगळावर फेरी मारून विविध ठिकाणांचे तापमान व प्राणवायूचे प्रमाण मोजून ते रोव्हरकडे, रोव्हर मंगळयानाकडे व मंगळयान पृथ्वीकडे पाठवू लागले. असे करता करता दहा वर्षे लोटली. आता मंगळाचे सरासरी तापमान १५° सेंटीग्रेड व हवेतील प्राणवायूचे प्रमाण २१% झाले.

    आता मानवाने मंगळावर जायला हरकत नव्हती. कोणाला निवडायचे हा प्रश्न भास्कराचार्य सुपरकॉंप्युटरने सोडवला. देशातील सर्व नागरिकांचा माहितीसंच त्याच्याकडे होता. त्यामध्ये माणसाचे नाव, जन्मतारीख, उंची, वजन वगैरे बरोबरच त्याच्या शारीरिक व मानसिक आरोग्याविषयी माहिती, त्याचा भूतकाळ, तो कोणकोणत्या संघटनांशी संलग्न आहे, त्याची विचारधारा वगैरे सर्व माहिती त्यात होती. भास्कराचार्याने त्याच्याकडील माहितीसंच बघून देशातील पन्नास सुयोग्य व्यक्तींची निवड केली. त्यामध्ये आर्यन व मधुरा हेदेखील होते. सर्वांना इस्रोमध्ये अंतराळ प्रवासाचे शास्त्रोक्त प्रशिक्षण देण्यात आले.

    १० डिसेंबर २०३७ रोजी ‘नौका ‘ अंतराळयान श्रीहरीकोटा येथील प्रक्षेपण तळावर GSLV-mk3 प्रक्षेपकावर स्थित होते. त्यात आर्यन व मधुरा यांचेसह देशातील सर्व दृष्टीने सुयोग्य असे पन्नास नागरिक होते. त्यांच्याकडे ज्ञानाच्या सर्व शाखांतील माहितीसाठा असलेला सुपरकॉम्पुटर होता, तसेच सर्व प्राणी व वनस्पती यांचे नमुने बीज स्वरूपात होते. त्यांचे फलन मंगळावर करण्यात येणार होते. काउंटडाऊन संपले. प्रक्षेपकाने अंतराळात झेप घेतली. १० जुलै २०३८ रोजी ‘नौका’ अंतराळयान मंगळावर उतरले. त्यावेळी सूर्य नुकताच क्षितिजावरून वर येत होता. एका नव्या युगाची सुरुवात होत होती……. 

— समाप्त —

© श्री राजीव  गजानन पुजारी 

संपर्क – फ्लॅट नं ३, भाग्यश्री अपार्टमेंट, सावरकर मार्ग क्र.१, विश्रामबाग, सांगली. मो. 9527547629 [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments