डॉ. ज्योती गोडबोले

?जीवनरंग ?

☆ मनाचिये डोही…— ☆ डॉ. ज्योती गोडबोले☆ 

 मानसीचे आईवडील कारच्या अपघातात गेले तेव्हा मानसी चार वर्षाचीच होती. आजीने तिला मामाच्या घरी आणले. मामीला स्वतःची मुलगी होती, मानसीहून  3 वर्षांनी मोठी. मधुरा तिचं नाव. मधुरा खरोखरच अतिशय हुशार होती. मानसीला घरी आणल्यावर मामाच्या जबाबदाऱ्या वाढल्या. तो मध्यमवर्गीय, जरा बेताचीच नोकरी, आणि मामी शाळेत शिक्षिका,आणि त्यात ही जबाबदारी ! मामीला खरंतर हे ओझे नको होते, पण सासूबाईंसमोर बोलायची मामीची टापच नव्हती.  मानसीच्या वडिलांचे विम्याचे पैसे मिळाले. पण ते मामाने, तिच्या शिक्षणासाठी, आणि लग्नासाठी म्हणून गुंतवून टाकले.

मामाने मानसीला शाळेत घातले. मानसी मधुराला नेहेमी म्हणायची, “ ताई, तू किती हुशार आहेस. पण मला खरंच नाही गं जमत तुझ्यासारखा अभ्यास करायला.” 

मुली बघता बघता मोठ्या झाल्या. मधुराने इंजिनिअरिंगला  ऍडमिशन घेतली. दोन वर्षांनी मानसीही चांगल्या  मार्कानी  एसएससी झाली. “ मामी,मी कॉमर्सला घेते ऍडमिशन. लवकरात लवकर माझ्या पायावर उभं रहायचंय मला. “ –  मामीने मान डोलावली. अर्थात तिला मधुराचे जास्त कौतुक होते. पण आताशा  तिचा आढ्यतेखोर बनत चाललेला  स्वभाव मामीच्या नजरेतून सुटला नव्हता. मानसी मात्र नेहमीच आपली पायरी ओळखून वागत असे. ‘आपण या घरात मामामामीच्या आश्रयाने राहतोय’  हे ती कधीही विसरली नाही.

मधुराला बी,ई झाल्यावर चांगली ऑफर आली आणि ती लंडनला गेली. मानसीलाही  एमबीए झाल्यानंतर चांगल्या कंपनीत जॉब मिळाला. मिळणाऱ्या पगारात मानसी खूषच होती. पहिल्यांदा जेव्हा तिला पगार मिळाला तेव्हा सगळा पगार तिने मामीच्या हातात ठेवला. दोघांना वाकून नमस्कार केला आणि म्हणाली, “ मामा, आज मला आजीची उणीव फारच जाणवते आहे. आज  माझे हे यश बघायला ती हवी होती. मामा-मामी तुम्ही दोघे नसतात तर काय झाले असते हो माझे ?”– मामीच्या डोळ्यात पाणी आले. “ वेडे, हा पगार ठेव बँकेत. आम्हाला काय करायचाय तो घेऊन ? तुझ्यासाठीच वापर हे पैसे. “ असं म्हणत मामीने पगाराचे पाकीट तिला परत दिले. दोघींचेही डोळे पाणावले होते. 

मधुराचे लंडनचे  कॉन्ट्रॅक्ट संपले आणि ती भारतात परत आली. मानसीने आनंदाने तिचे स्वागत केले.

मधुराने आता जॉब बदलला. सतत ती ऑनलाईन असे, आणि  घरी असली तरी खोलीचं दार बंद.

“ मधुरा, अग जेवायला येते आहेस ना ? थांबलोय आम्ही तुझ्यासाठी.. “ 

“ आई, मला नाही आवडत तू माझ्यासाठी अशी थांबलेली. जेवून घेत जा ग तू तुझी वेळ झाली की. “ 

मधुरात होत असलेले बदल मामीच्या लक्षात येत होते.

“ मधुरा,आता तुझे लग्न करावे, असे वाटते आम्हाला. तुझ्या मनात कोणी आहे का? नसेल तर मग नाव नोंदवायचे का कुठे? मोकळेपणाने सांग गं बाई आम्हाला. “ 

“ आई, इतक्यात लग्नाचा वगैरे अजिबात विचार नाही हं माझा. “ 

“ इतक्यात नाही तर मग कधी ? मधुरा, अगं आता सत्तावीस वर्षे पुरी होतील तुला. अजून किती थांबायचे आहे ? आणि कशासाठी ? बाबा आता  रिटायर होतील. त्याआधी तुझे आणि मानसीचेही लग्न होऊन जावे असं आम्हाला वाटतं आहे.” 

“ हे बघ आई, स्पष्टच सांगते. तुम्ही माझ्या भानगडीत पडूच नका. माझे मी बघून घेईन. मानसीचे लागा बघायला.

तिला कोणताही अगदी साधासा नवराही चालेल. पण माझे तसे नाही. मला माझ्या अटीत बसणाराच मुलगा हवाय.

तुम्ही मानसीसाठी वरसंशोधनाला लागा. नाहीतरी हल्ली सारखे तिचेच तर गुणगान ऐकतेय मी. बराच बदल झालाय या घरात– मी नसताना.” मधुरा कुत्सितपणे म्हणाली.

“ अगं काय बोलतेस तू हे? ती बिचारी असते का तरी घरी ? आणि असते तेव्हा मला मदतच करते ती. तू सख्खी मुलगी ना माझी? मग किती चौकशी केलीस ग माझी गेल्या दोन वर्षात? मध्यंतरी बाबांना खूप बरे नव्हते, हे तरी माहिती आहे का तुला? तेव्हा मानसीने अगदी जिवाचे रान केले होते. हॉस्पिटलचे सगळे बिल तिने भरले. अहोरात्र बसली होती हॉस्पिटलमध्ये. तुला कळवलं होतं की आम्ही सगळं. पण तुला यायला जमणार नाही असं कळवलं होतंस तू. आम्ही तेही समजू शकत होतो. पण निदान एकदा फोन करून  मानसीला विचारायचेस तरी. मला हल्ली प्रश्न पडतो, की तू माझी पोटची मुलगी आहेस ,का मानसी ? ते अनाथ लेकरू जेव्हा घरात आणले ना तुझ्या वडिलांनी, तेव्हाच त्यांनी मला बजावलं होतं की ‘ माझ्या ताईच्या मुलीशी सावत्रपणाने वागलीस  तर याद राख.

मला ते अजिबात चालणार नाही. ताईच्या आत्म्याला काय वाटेल?’ – त्या पोरीनेही मला जीव लावला. तू बाहेर  उनाडक्या करायचीस. सतत तुझे करिअर आणि मित्र मैत्रिणींबरोबर बाहेर भटकणे. कधी हातभार लावलास का कामाला? तेव्हा मानसी घरात मला मदत करायची. गुपचूप भांडी घासायची, धुणे धुवून टाकायची. तेव्हा होती का आपली ऐपत मशीन घ्यायची? आत्ता हे जे सगळं दिसतेय ना, वॉशिंग मशीन, फ्रीज, नवा रंग, नवीन फर्निचर, हे   सगळं मानसीने हौसेने आणलंय-आपणहून–माझे कष्ट कमी  व्हावेत म्हणून. तू किती वेळा पाठवलेस पैसे मधुरा ?

म्हणजे आम्हाला मुळीच अपेक्षा नाहीये ग मुलींच्या एका रुपयाचीही. पण कृतीतून दिसते ना प्रेम. तू अजिबात बोलूच नकोस तिच्याबद्दल.” –आई तरातरा तिथून निघून गेली.

 मधुराला अतिशय संताप आला. तिने बंगलोरला बदली करून घेतली. त्यानंतर तिने घराशी फारसा संबंध ठेवलाच नाही. मानसीला अतिशय वाईट वाटले.

“ मामी, खरंखरं सांग, माझ्यामुळे ताई घर सोडून गेली ना ? पण माझं इतकं काय चुकलं म्हणून तिला माझा इतका राग यावा ? मी दुसरीकडे फ्लॅट घेऊ का? कंपनी मला भाडे देईल.” 

“ अगं वेडे, तुला वाईट वाटायचे काहीच कारण नाही. हा तिचा स्वभाव आहे म्हणायचे. तुम्हा दोघींना मी सारखेच वाढवले ना. उलट कधीतरी तुलाच मी काही कमी केले असेल– तुझ्यासाठी काही आणण्यात,देण्यात. पण तू मात्र त्यात कधीही वैषम्य मानले नाहीस. तिचा वाढदिवस मी खूप जोरात साजरा करायची. तुझा मात्र कधीही नाही तसा साजरा केला. पण तू मोठ्या मनाने तिच्या समारंभात सामील व्हायचीस- कुठलीही तुलना न करता– कोणावरच न रागावता– मनात अढी न ठेवता. आता मला समजतं आहे गं ,माझेही किती चुकले तेव्हा. किती दुजाभाव केला तुम्हा दोघींच्यात. “ 

“ नाही ग मामी,असे नको म्हणूस. माझ्या वाढदिवसालाही तू मला ओवाळायचीस, आणि पन्नास रुपये द्यायचीस. तेच खूप वाटायचे मला.” 

“ नाही ग मानू, मी कितीकदा वाईट वागले तुझ्याशी. माझ्या हातूनही नक्कीच होत होता भेदभाव. पण मी हेतूपूर्वक खरंच नाही ग वाईट वागले. तू अजिबात जायचे नाहीस हे घर सोडून. आता जाशील ना ती एकदम फक्त सासरीच.”  मानसी लाजली. “ मामी, मला तू आईची आठवणसुद्धा होऊ दिली नाहीस कधी. किती चांगले आहात गं तुम्ही दोघं. आणि अग मधुराताई तुमची सख्खी मुलगी आहे. नक्की येईल बघ घरी परत. ताई खूप चांगली आहे ग स्वभावाने. अग खूप हुशार माणसे असतात अशीच जरा विचित्र.” 

“ काय म्हणायचे ते तूच म्हण बाई. तू कधी कुणाला नावं ठेवतेस का ? आता काय– होईल ते बघत राहायचे इतकेच आहे आमच्या हातात. “ 

मानसी एक दिवस विनयला घेऊन आली.

“ मामी,हा विनय. माझ्याच कंपनीत माझा टीम लीडर आहे. आम्हाला लग्न करायचे आहे, पण ताईचे झाल्याशिवाय नाही. आणि विनयला हे मान्य आहे.” 

मामामामीला विनय अतिशय आवडला. घरबसल्या जावई चालून आला होता. पुन्हा देखणा, घरंदाज, शिकलेला.

पण तरीही मामीच्या मनात कुठेतरी दुखलंच की असं सगळं आधी मधुराच्या बाबतीत व्हायला हवं होतं. आणि ते स्वाभाविकही होतं. पण मामा शांत होते. ते मामीला म्हणाले, “ हे बघ विजू, याबाबत मधुराला खूप वेळा विचारून झालंय आपलं. तिच्याकडून आणखी किती वेळा अपमान करून घ्यायचाय तुला? आणि मुख्य म्हणजे तिच्यासाठी मानसीने का म्हणून थांबायचे? आपण मानसीचे लग्न करून टाकूया. मधुराचा योग आला,की तिचेही होईल.” 

मामाने रीतसर कन्यादान करून, मानसीचे थाटामाटात लग्न करून दिले. मधुरा लग्नापुरती दोन दिवस येऊन गेली.

पण ना तिने आनंदाने कशात सहभाग घेतला, ना ती मानसीशी नीट बोलली. मामा, मामी, मानसी, सगळेजण प्रयत्न करून थकले, अगदी हताश झाले. 

या गोष्टीलाही आता सहा वर्षे झाली. मानसीची दोन गोड मुले या आजी आजोबांना जिवापेक्षा प्रिय आहेत.

पोरांनाही  या आजी आजोबांना भेटल्याशिवाय चैन पडत नाही. मधुराने अजूनही लग्न केलेले नाही. आणि ती आईवडिलांकडेही कधीच  येत नाही.

 माणसाच्या मनाचे अंदाज लागत नाहीत हे तर खरंच आहे . 

आणि मनात बसलेल्या गाठी, ब्रम्हदेवालाही सोडवता येणे कठीण, हे त्याहून खरंय —– 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
4.7 3 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments