श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ जीवनरंग ☆ समर्पण  (अनुवादीत कथा) –  क्रमश: भाग 3 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

डॉक्टर, नर्सेस यांच्या सुरक्षिततेबरोबरच, घाबरलेल्या, निराश झालेल्या रुग्णांचा आक्रोश तत्परतेने हुशारीने थांबवणं हेही एक जरुरीचं काम होऊन बसलं होतं. जीव वाचवणार्‍या त्या देवदूतांनाही शिव्या दिल्या जात होत्या. एकीकडे मानव आपलं क्रूरतम रूप दाखवत होता, तर दुसरीकडे उदात्तता आणि मानवता यांची परीक्षा होती. प्रेतं उचलायलाही लोक मिळत नव्हते. जिवंत लोक उपचाराची प्रतीक्षा करत होते, तर हॉस्पिटलच्या प्रांगणात पडलेला प्रेतांचा ढीग आपल्या गंतव्याकडे जाण्याची प्रतीक्षा करत होता. पहिल्या दिवसाच्या प्रकोपानांतर व्हॅनमधून प्रेतं जात होती. आता व्हॅन छोट्या पडू लागल्या होत्या. मोठे कार्गो ट्रक बोलावले गेले. आता प्रेतं ट्रकपर्यन्त नेणं हेही मुश्किल होऊ लागलं होतं. हॉस्पिटलच्या इमारतीच्या प्रत्येक मजल्यावरून  ट्रकमध्ये पोचणार्‍या प्रेतांना हॉस्पिटलच्या अनेक दरवाजातून बाहेर पडावं लागत होतं. यामुळे प्रेतं घेऊन जाणार्‍यांसाठी, रस्त्यात येणार्‍या रुग्णांसाठी, सगळ्यांसाठी धोका होता. आता उघडे कार्गो ट्रक अशा तर्‍हेने उभे केले गेले की प्लास्टिकमध्ये गुंडाळलेली प्रेतं वरच्या मजल्यांवरून थेट ट्रकमध्ये टाकता येतील. हा कुठल्याही प्रकारे मानवतेचा तिरस्कार नव्हता. हे म्हणजे जिवंत असलेल्या उरलेल्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न होता.  जिवंत लोकांना सन्मान देण्याचा एक प्रकारचा प्रयत्न होता.

तास न तास इकडून तिकडे ढकललं गेल्यानंतर रोझाला कॅरिडॉरमध्ये ठेवलं गेलं. खोल्यांची कमतरता, बिछान्यांची कमतरता, मास्कची कमतरता, संसाधनांची कमतरता,  सगळ्यात जास्त म्हणजे व्हेंटिलेटर्सची कमतरता, अशा प्रकारे अनेक गोष्टींच्या कामातरतेमुळे प्रत्येक जण वैतागलेला होता. कामाच्या बोजामुळे, मृत्यूच्या भीतीमुळे आणि दु:खित मन:स्थितीमुळे सगळे त्रासलेले होते. सर्वसंपन्न माणसाची सारी ताकद या वायरसने खोटी पाडली होती. असं वाटत होतं, माणसाच्या विवशतेची टर उडवत कोरोंना व्हायरस खदाखदा हसतोय.

रोझाचा नंबर आला. पलंग आणि त्याचबरोबर कॅरिडॉरमध्ये जागा मिळाली, याचा अर्थ असा होता की आता उपचारांना लवकरच सुरुवात होईल. तिचा बेड आरामदायी होता. प्रत्येक बेडमध्ये आवश्यक तेवढं अंतर होतं. समोरची कॅरिडॉरची लाईनही पूर्ण भरलेली होती. रोझाच्या बरोबर समोर एक रुग्ण आपली वेळ येण्याची वाट पाहत होता. मधल्या रस्त्यातून जाणारे – येणारे डॉक्टर्स, नर्सेस जसा काही संकेत देत होते, की तिथे खूप काही चालू आहे.

या महामारीत कुणालाही आपल्या परिवारातील कुणालाही जवळ ठेवण्याची परवानगी नव्हती. रुग्णांनी घेरलेले स्वास्थ्यकर्मी जसे काही मृत्यूला आपल्या शरिरात घुसण्याचं निमंत्रण देत होते. अंतर ठेवून काम करायचं असलं, तरी जवळीक साधावी लागतच होती. ब्लड प्रेशर घेणं, रक्ताची तपासणी, व्हेंटिलेटर लावणं, ही सारी कामं स्पर्श केल्याशिवाय करणं शक्य नव्हतं. कुठे जाणार बिचारे? जीवन-भराच्या आपल्या कठोर परिश्रमाच्या बदल्यात त्यांना डॉक्टरचा सन्माननीय पेशा मिळाला होता. आज ते त्यापासून पळून जाऊ इच्छित होते. आपल्या निर्णयाबद्दल त्यांना पश्चात्तापही होत असेल कदाचित. त्यांच्या सगळ्या योग्यतेला, लायकीला नाकारत त्यांच्या पेशामुळे मृत्यू जसा त्यांच्या मागे लागला होता॰

रोझाच्या समोरच्या पलंगासमोर एक तरुण गंभीर परिस्थितीत होता. आत्तापर्यंत तिला वाटत होतं की साठ वर्षावरील लोकच या आजाराने त्रस्त आहेत.  हा तरुण तर पंचवीस – सव्वीस वर्षाचाच असेल. रोझाला पाहणारी नर्स त्याचीही देखभाल करत होती. त्याची परिस्थिती गंभीर होती. व्हेंटिलेटर रिकामे नव्हते. डॉक्टरांच्या कुजबुजीनंतर ठरवण्यात आलं की या दोघांना क्रमाक्रमाने व्हेंटिलेटरवर ठेवावं. गरजेप्रमाणे कधी रोझाला, कधी डिरांगला.

दिवसभर ती नर्स हेच करत राहिली. तिची ड्यूटी बदलल्यावर दुसरी नर्स आली. ती संगत होती, की डिरांगची परिस्थिती वाईट होत चाललीय. डॉक्टरांना बोलावलं गेलं दोघांच्या कुजबुजीतून स्पष्ट झालं की त्याला व्हेंटिलेटरची जास्त वेळ गरज आहे, नाही तर तो वाचू शकणार नाही. वस्तुस्थिती अशी होती की वारंवार व्हेंटिलेटर बदलल्याने कुणालाच फायदा होत नव्हता. रोझा आणि डिरांग व्हेंटिलेटर लावला की ठीक होत आणि काढताच त्यांना श्वास घेणं मुश्कील होत असे. डोक्टरांची अडचण रोझाच्या लक्षात येत होती. आपल्या बिछान्यावरून ती डिरांगचा चेहरा नीटपणे बघू शकत होती. मोठा मनमोहक युवक होता तो. डोक्यावरचे दाट काळे केस, हलकीशी दाढी, चेहरा कोमेजलेला असूनही आकर्षक होता.

मूळ लेखिका – सुश्री हंसा दीप

भावानुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments