?जीवनरंग ?

☆ “हयातीचा दाखला…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला

दुपारची वेळ असेल.

साधारण दोन अडीचची वेळ.

बाहेर रणरणतं ऊन.

नीरव का काय ती शांतता.

उभी सोसायटी दुपारच्या झोपेत गुंगून आडवी झालेली..

मी सुद्धा.

जवळ जवळ सगळी मंडळी घरीच.

लाॅकडाऊनची कृपा.

दुसरं काय ?

जरा डुलकी लागतेय तर सेलफोन कोकलला.

फोन घेऊन मी बाल्कनीत गेलेलो.

गॅलरीच्या एका कोपर्यात रेंज जरा व्यवस्थित येते.

ठण्णकन् आवाज झाला.

पहिल्या मजल्यावरच्या एका बाल्कनीच्या दारावर,

एक दगड जोरात आदळला.

तसा फार काही मोठा दगड नव्हता.

असेल लिंबाएवढा.

अरे पण काय हे ?

आवाजानं बाल्कनीचा दरवाजा ऊघडला गेला.

तणतणत एक म्हातारा बाहेर आला.

खाली वाकून ओरडू लागला.

एक दहा बारा वर्षाचा पोरगा असेल.

सायकलवर टांग टाकून रफू चक्कर झाला.

म्हातारा आपला हवेतल्या हवेत बोंबलतोय.

त्याला कळतच नाहीये कुणी दगड मारलाय ते ?

बाकी सोसायटीला याच्याशी काहीही घेणंदेणं नाहीये.

एक तर कंपाऊडबाहेरून दगड आलाय.

आपल्या बाल्कनीत तर नाही ना पडला ?

छोड्डो यार..

सोसायटी फक्त या कुशीवरनं त्या कुशीवर.

ढारफूस….

मीही फारसं लक्ष दिलं नाही.

द्वाड पोरगं असेल एखादं.

दोन दिवसांनंतरची गोष्ट.

डिट्टो तसाच फोन आलेला.

डिट्टो तीच वेळ.

मी डिट्टो तसाच गॅलरीत ऊभाय..

अन् रिपीट टेलीकास्ट.

सायकलवालं तेच द्वाड पोरगं.

नेम धरून दगड मारलेला.

म्हातारा तणतणत बाल्कनीत आलेला.

पोरगं छू मंतर.

च्यामारी…

हे रोज होतंय की काय ?

पुढल्या दिवशी मी मुद्दामहून गॅलरीत उभा.

बरोब्बर त्याच वेळी.

ठरवल्यासारखं सगळं तसंच घडतंय.

मला म्हातार्याची कीव आली.

सहन करण्याच्या पलीकडे आहे हे सगळं.

आज मी तयारीतच होतो.

धडाधड पायर्या खात जिना ऊतरलो.

गाडीला किक् मारून सोसायटीच्या गेटबाहेर..

फार लांब जाणं शक्यच नव्हतं.

लाॅकडाऊन चालूय.

दोन तीन सोसायटी मागे टाकल्या.

किधर कू गया वो ?

एका सोसायटीच्या आत शिरणारं ते पोरगं दिसलं.

मी तिकडे गाडी दामटली.

सोसायटीत शिरेपर्यंत पोरगं गायब.

लगोलग वाॅचमनला गाठला.

ए -202.

तिथं पोचलो आणि बेल दाबली.

दरवाजा ऊघडला गेला.

पोराच्या बापानं दरवाजा ऊघडला.

पोरगं पॅसेजच्या पडद्यामागे लपलं.

बाप चांगला माणूस वाटला.

त्याला सगळा किस्सा सांगितला.

त्याला खरंच काही माहिती नव्हतं.

तो पेटलाच एकदम.

पडद्यामागनं पोराला खेचला त्यानं.

तो त्याला तुडवणार…

एवढ्यात,

त्या पोराची आई मधे पडली.

“थांबा.

सलीलची काहीही चूक नाहीये यात.

मीच सांगितलं होतं त्याला तसं करायला.

तो म्हातारा बाप आहे माझा.

मागच्या वर्षी आई गेली.

तेव्हापासून एकटेच राहतात ते.

माझं तोंड सुद्धा बघायचं नाहीये त्यांना.

एकुलती एक मुलगी मी त्यांची.

पळून जाऊन लग्न केलं होतं मी.

राग अजूनही गेला नाहीये त्यांचा…”

पोरग्याची आई डोळे पुसत बोलतच होती.

“इतके दिवस मेरठला होतो आम्ही.

आत्ता सहा महिन्यापूर्वीच आलो इथं.

मुद्दामहून त्यांच्या घराजवळ जागा बघितली.

माझा आवाज ऐकला की फोन बंद करतात.

मी फोन करेन की काय भिती वाटते त्यांना.

आता तर फोन वापरणंच बंद केलंय.

जीव तुटतो माझा..

दगड मारणं चुकीचंच आहे मान्य.

ते तणतणत बाहेर आले की बरं वाटतं.

सगळं ठीकेय म्हणायचं.

हयातीचा दाखला मिळतो मला.

कोरोनाच्या राक्षसाची भिती वाटते हो फार.

मी तरी काय करू सांगा हो ?”

मला काही बोलताच येईना.

“ताई, ती दगडफेक बंद करायला सांगा आधी.

नसतं काही प्रकरण व्हायचं.

तुम्ही काळजी करू नका.

मी लक्ष ठेवीन त्यांच्याकडे.

तसं काही वाटलं तर लगेच कळवीन तुम्हाला.”

बापाची लाडाची (?) लेक.

ओल्या डोळ्यांनी हसली.

मी बाहेर पडलो.

काल संध्याकाळी म्हातार्याला गाठला.

खाजवून खरूज काढल्यासारखा तोच विषय काढला.

म्हातारा चवताळला.

शिव्या घातल्यानी पोरीच्या नावाने.

ती मेलीय माझ्यासाठी.

शेवटी…

ढसाढसा रडला.

त्याला म्हणलं.

“दोन्ही मुलगेच मला.

लेकीसाठी जीव तडफडतो.

देवानं दिलेलं दान का आथाडताय ?

विसरून जा सगळं.

जावई भला माणूस आहे तुझा..”

म्हातारा खांदेओल रडला.

“मला घेऊन जातोस तिच्याकडे ?”

आजच सकाळी आठ वाजता.

तिच्या घराची बेल वाजवली.

म्हातारा लपाछपी खेळत असल्यासारखा,

दरवाज्याच्या अलीकडेच लपलेला.

ती दार ऊघडते.

मी एवढंच म्हणतो…

“तुझा हयातीचा दाखला घेऊन आलोय.”

पुढचा धपांडी ईष्टाॅपचा कार्यक्रम बघायला ,

मी तिथे थांबतच नाही.

मन वढाय वढाय !

* माझी पोस्ट नावासकट शेअर करायला माझी ना नाही *

© कौस्तुभ केळकर नगरवाला

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments