सौ. उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ अरूंद वाट प्रेमाची… भाग २ (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆
(मागील भागात आपण पहिले – ‘कोणत्या पोझमध्ये युवतीने उभं राह्यला हवं होतं?’ मधुचा हा प्रश्न, मधुलिकासाठी प्रश्न नसून एक प्रकारे आव्हानच होतं तिला. आता इथून पुढे -)
‘या पोझमध्ये …’ असं म्हणत, काही अंतरावर मधुलिका एक जीवंत कलाकृती होऊन झटकन उभी राहिली. डोळे अर्धवट मिटलेले. पापण्या, भुवया, हनुवटी, हाताचा सगळा दृश्यभाग, पायांची बोटे, पिंढरीपर्यंतचा सगळा भाग पांढर्या-करड्या मातीने माखलेला. मधु विस्मित होऊन बघत राहिला. त्याला वाटलं, मेनकेने उर्वशीला, स्वत:चा सगळा साज-श्रुंगार सोपवून स्वत: आपल्या हाताने तिला सजवलीय आणि खजुराहोच्या अप्रतिम शिल्प-सुंदरींच्या मध्ये आणून उभी केलीय. त्याने आत्तापर्यंत बनवलेल्या सगळ्या मूर्ती त्याला व्यर्थ वाटू लागल्या. त्याची दृष्टी तिचं एकेक अंग सावकाशीने न्याहाळू लागली, त्याचवेळी तिचा पदर आपल्या जागेवरून जरा सरकत मधुला जसं काही निमंत्रण देऊ लागला. तो सहजच पुढे आला आणि मधुलिकाच्या अगदी जवळ पोचला. मधुलिकाने आपले डोळे मिटले. मधुने मधुलिकाच्या नाभी-सरोवराला आपल्या उजव्या हाताच्या तर्जनीने स्पर्श केला. तिथली ओली माती काढली आणि आंगठ्यावर घेऊन मधुलिकेची भांग भरली. मधुलिकाचे ओठ कापले. मधुने आपल्या ओठांनी त्याला स्पर्श करत तिला आश्वस्त केले. वास्तविक मधुलिकाच्या मातीने माखलेल्या देहाचा, ओठ हा एवढा एकच हिस्सा असा होता, जो राखेमध्ये पेटलेल्या निखार्यासारखा भासत होता. मधुलिकाने त्या क्षणी आपलं सारं शरीर मधुच्या बाहूत झोकून दिलं. मगनभाई या दरम्यान केव्हा तरी आले. त्यांनी निर्जीव मूर्तींमध्ये गरम श्वास भरणार्या युगलमूर्तीला पहिलं, तेव्हा ते गुपचुप निघून गेले.
मधूने बनवलेल्या मूर्ती आता शिल्प आणि सौंदर्याची नवनवीन परिमाणं प्रस्थापित करू लागल्या. त्याची कीर्ती वाढली, तसाच त्याला पैसाही चांगला मिळू लागला. मूर्ती चांगल्या किमतीत विकल्या जाऊ लागल्या. आता तो, गणपती, सरस्वती, दुर्गा, काली यासारख्या उत्सवी मूर्तींकडे कमी लक्ष देऊ लागला कारण त्याच्याकडच्या कलात्मक मूर्तींना अधिकाधिक मागणी येऊ लागली. चांगल्यापैकी पैसा खर्च करून त्याने आपल्या वडीलोपार्जित घराचे नूतनीकरण केले. घरात दोन दोन दुचाकी वाहनांबरोबरच एक कारदेखील आली. मधुलिका आता कारखान्यात क्वचितच कधी येऊ शकत होती. तिच्याकडे मधूच्या संसाराबरोबरच मधूने बनवलेल्या मूर्तींची प्रदर्शने भरवणे, जाहिराती, चर्चा, विक्री या सार्याची जबाबदारीदेखील होती.
त्यांच्या विवाहाला आता सात वर्षे झाली होती, पण दोघांच्यातील प्रेम, अनुराग पाहून असं वाटत होतं की दोघांचा जसा काही कालच विवाह झालाय. मधूला कारखान्यातून यायला कधी उशीर झालाच, तर मधुलिका फोन करकरून त्याला नुसती हैराण करायची. आणि मधु… त्याच्या प्रत्येक कलाकृतीत कुठल्या ना कुठल्या कोनातून मधुलिकाच झळकायची.
‘मधुजी, आपण बनवलेल्या कलाकृती इतक्या जीवंत कशा दिसतात?’
‘नुसत्या दिसतातच नाही, तर त्या धडकतातसुद्धा श्रीमान! आपण कान लावून पहा. आपल्याला माझ्या कलाकृतीचं धडधडणं स्पष्ट ऐकू येईल.’
‘ कुणाच्या हृदयाची ही धडधड आहे, जी आपल्या कलाकृतीत धडधडते?’
‘हिची… ही मधुलिका. माझं जीवन, माझी प्रेमिका, माझी प्रेरणा, पत्नी… माझं सगळं काही….’ आणि मधूने शेकडो प्रेक्षकांसमोर मधुलिकाच्या गळ्यात हात टाकून तिला जवळ ओढले.
मधु आणि मधुलिकाचे दिवस, महीने, वर्षे पंख लावून प्रणयाकाशामध्ये मुक्त विहार करत होते, पण एक दिवस असा आला की समोर एक शून्य येऊन उभं राहिलं. ते वेळी-अवेळी दोघांमध्ये प्रगाढ मौनाचं रूप धरण करू लागलं. दिवसेंदिवस बिछान्याकडे जाताना विस्तारत जाणार्या या मौनाला तोडण्याचा प्रयत्न करत एक दिवस मधुलिका म्हणाली,
‘माझे सगळे रिपोर्टस आले आहेत. म्हणून म्हणते, तुम्ही दुसरं लग्नं करा…. आपल्याला मूल मिळेल.’
‘आपल्याला?’
‘हो. तुझं मूल माझंही असेलच.’
‘आणखीही दुसरा एखादा मार्ग असू शकतो. एखादं मूल अॅडॉप्ट करू या.’
‘नाही. माझी अशी इच्छा आहे की तुझ्या रक्ताचं असं मूल जन्माला यावं, की जे पुढच्या काळात जगातला एकमेवद्वितीय कलाकार असेल.’
‘तुला सहन होईल माझं दुसरं लग्नं?’
‘हो. एका कलाकाराच्या जन्माच्या तीव्र इच्छेसाठी मी काहीही सहन करीन!’
मधुच्या मनात आलं की तिला सांगावं, ‘नाही. तू नाही सहन करू शकणार!’ पण तो काहीच बोलला नाही. तो म्हणाला, ‘ठीक आहे. हे अखिल भारतीय प्रदर्शन होऊन जाऊ दे. मग कुणाला तरी पकडून आणीन या घरात. किंवा तू स्वत:च निवडून आण आपली सवत.’
अखिल भारतीय मूर्तीकला प्रदर्शनाला अद्याप दोन महीने अवकाश होता. त्याच्या तयारीसाठी मधु दिवस-रात्र एक करत होता. त्याने एक मानवी आकाराची स्त्री-मूर्ती घडवायला सुरुवात केली. तिला पृष्ठभाग नव्हता. दोन्हीकडे चेहराच होता. कुठूनही बघितलं, तरी ती सुंदर दिसायची. हळू हळू मूर्तीचं अद्भुत सौंदर्य झळकू लागलं. टायटल मधुलिकानंच दिलं, ‘मोहिनी’. प्रदर्शनाचा दिवस जसजसा जवळ येऊ लागला, तसतशी मधुची व्यग्रता वाढली. तिचं रंग-रूप, साज-शृंगार यासाठी अधिकाधिक वेळ देता यावा, म्हणून मधुने मूर्ती कारखान्यातून आणून घरीच एका खोलीत ठेवली.
एका रात्री मधुची वाट बघता बघता मधुलिकाला डुलकी लागली. झोप उघडली, तेव्हा तिने पहिलं, रात्रीचे दोन वाजलेत. मधु बिछान्यावर नाही असं पाहून, मधुलिका ‘मोहिनी’ला ठेवलेल्या खोलीकडे वळली. मधु नाकाचं नक्षीकाम करत कधी एका ब्रशने, तर कधी दुसर्या ब्रशने रंग भरत होता. त्या रात्रीनंतर तर जसं काही रूटीनच झालं. मधू रात्रीचा बराचसा वेळ मोहिनीच्या खोलीत काढू लागला. मधुलिकालाही रात्री मधु जवळ नसण्याची सवय होऊ लागली. खरं तर अखिल भारतीय मूर्तीकला स्पर्धेत भाग घेण्यासाठी मधुलिकानेच मधुला भाग पाडलं होतं.
‘मोहिनी’ जवळ जवळ पूर्ण झाली होती. मधुने त्या दिवशी मधुलिकाला म्हंटलं,’ तुझ्या पारखी नजरेने एकदा आपल्या ‘मोहिनी’कडे बघ.’
मधुलिकाने खोलीत जाऊन ‘मोहिनी’कडे बघितलं, तेव्हा ती चकीतच झाली आणि तिच्या गळ्यातून सहाजोद्गार बाहेर पडले, ‘वा: काय सौंदर्य आहे. जो कुणी एकदा हिला बघेल, आपलं सारं राज्य तिच्यावर उधळून देईल.’ असं बोलता बोलता तिने आपल्या गळ्यातली मोत्यांची सुंदर माळ काढली आणि मोहिनीच्या गळ्यात घातली. अन्य स्त्री-रूपावर मोहित होऊन तिचा गौरव स्त्रीनेच करावा, अशी ही पहिलीच वेळ असेल आणि इथे तर गौरव करणारी खुद्द मधुलिकाच होती.
मूळ हिंदी कथा – ‘गली अति सॉँकरी’ मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’
अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈