सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ रिसायकल- बिनमध्ये मल्लिका… भाग ४ (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ सौ. उज्ज्वला केळकर

(मागील भागात आपण पहिले – . ग्रीन-व्हॅली हॉटेलमधली ती रात्र सरता सरेना. रात्रभर मी माझ्या स्वनांचे तुकडे गोळा करत राहिलो. आता इथून पुढे )

आई काय घडलं, हे जाणून घेण्यासाठी अतिशय उत्सुक होती. संधी मिळताच तिने विचारलं, ‘मल्लिका भेटली होती?’

‘कशी आहे?’

‘ठीक आहे.’

‘तिची मुलगी कशी आहे?’

‘चांगली असेल. मी विचारलं नाही. वेळच झाला नाही.’

‘मी जेवढं विचारीन तेवढंच सांगणार का?’ तिचा धीर आता सुटला होता.

‘तुला काय जाणून घ्यायचय, हे मला माहीत आहे. पण आपण मल्लिकाला विसरून जाणंच चांगलं.’

‘का? असा काय म्हणाली ती?’

‘ती काहीच म्हणाली नाही, ना मी तिला काही विचारलं. पण तिला पाहून मी या निर्यावर पोचलो, की…. म्हणजे मला असं म्हणायचय, की ही ती मल्लिका नाही, जिच्यावर मी मनापासून जीव जडवला होता आणि जिच्याबाद्दल मी तुझ्याशी बोललो होतो.‘

‘नीट एकदा व्यवस्थित सांग बरं, काय झालय मल्लिकाला?’

‘मल्लिकाच्या अंगावर कोड उठलय. तिच्या शरीरावर जिथे तिथे पांढरे डाग उठलेत. आई, तिचे इतके फोन आणि एसएमएस, येत राहिले, पण तिने कधी संगितले नाही की आपल्याला हा आजार आहे. तिने मार्केटिंग साईड सोडून अॅीडमिनिस्ट्रेशन साईडला बदली करून घेतली, त्याचं कारणंही हेच असणार. बाहेर उन्हात जाण्याने तिला त्रास होत असणार. आता तिच्यात ती गोष्ट राहिली नाही, जिच्यामुळे मी… कशी तरीच दिसतेय आता ती. ‘

हे ऐकून आई थोडा वेळ गप्प राहिली. मग अतिशय शालीन आणि संयमित स्वरात बोलू लागली, ‘याशिवाय आणखी काही कारण आहे, की ज्यामुळे तू आपलं मत बदलण्याचा विचार करतोयस?’

‘नाही. यापेक्षा वेगळं असं काही कारण नाही, पण जे आहे, ते पुरेसं नाही का? मी तिची फाईल डी-लिट केलीय.’

‘मला एक सांग, हा आजार फक्त बायकांनाच होतो का?’ आईने जसं काही विरोधी पक्षाचं वकीलपत्र घेतलं होतं.

‘नाही. तसं काही नाही. कुणालाही हा आजार होऊ शकतो.’

‘मग क्षणभर असं धरून चल, की मल्लिकाबरोबर तुलाही हा आजार झालाय. तेव्हाही आत्ता तुझा पवित्रा जसा आहे, तसाच असेल का? तुझे विचार तेव्हाही असेच असतील का? आणखीही एक….’

‘काय?’

‘समजा, तुमचं लग्नं झाल्यावर तिला हा आजार झाला असता तर…’

आईचे हे प्रश्न माझ्यासाठी अनपेक्षित होते. मी शहारलो.

थोड्याशा विचारानंतर  माझ्या एकदम लक्षात आलं, कॉंम्पुटर शिकताना विथी मला एकदा मजेत म्हणाली होती, ‘तुम्हाला माहीत आहे डॅडी, की डी-लीट केलेली फाईल कॉंम्पुटरच्या रिसायकल- बिनमधून बाहेर काढून पुन्हा ओपन करता येते?’

माझी बेचैनी वाढत गेली. मी सेल-फोन उचलला आणि त्यात मल्लिकाचा नंबर शोधू लागलो.

– समाप्त –

मूळ हिंदी  कथा – ‘रिसायकल-बिन में मल्लिका’  मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’

अनुवाद –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments