सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? जीवनरंग ?

☆ वाटणी… (भावानुवाद) – श्री सुशांत सुप्रिय ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

माझं शरीर रस्त्यात पडलेलं आहे. माझ्या कपाळावर जखमेच्या खुणा आहेत—

— माझा शर्ट रक्ताने माखलेला होता. माझ्याभोवती खूप गर्दी जमलेली होती—- अतिशय उत्सुक झालेली, उत्साहित गर्दी. अगदी काहीच मिनिटात गर्दी दोन गटात विभागली गेली. एक गट असा दावा करत होता की मी हिन्दू होतो, आणि असं सांगतांना त्या गटातले लोक केशरी झेंडे फडकवत होते. दुस-या गटाचं असं म्हणणं होतं की मी मुस्लीम होतो, आणि ते हिरवे झेंडे फडकवत होते. एक गट गर्जना केल्यासारखा ओरडत होता… ‘‘ या मुस्लीमांनी याला मारलंय. हा हिंदू आहे. याचे दहन केले जाईल. याच्या या मृतदेहाचा ताबा घेण्याचा हक्क आम्हाला आहे.”—- यावर दुस-या गटाने मोठ्याने ओरडत म्हटलं, —- ‘‘ मुळीच नाही. या अविश्वासू नास्तिक माणसांनीच याला मारलंय्.  हा आमचा मुस्लिम बांधव आहे. याचे दफनच केले जाईल. याच्या शरीरावर आमचा कायदेशीर हक्क आहे.”—- आणि मग—- ‘अल्ला हो अकबर’, आणि ‘जय श्रीराम’  या दोन्ही आरोळ्या हवेत घुमायला लागल्या. 

मी तिथे जवळपासच शांतपणे उभा होतो. मी मेलो होतो का ? आरडाओरडा करणारे ते दोन्ही गट तर तसाच दावा करत होते. 

मी म्हटलं—- ‘‘ भावांनो, जरी मी मेलो असलो, तरी तुम्ही आधी मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. निदान माझं पोस्टमॉर्टेम तरी करून घ्या. माझा अंत कसा झाला, एवढं तरी समजायला हवं. ”—–जमावाने लगेच उत्तर दिलं.—– ‘‘ अजिबात नाही. आम्ही तुला हॉस्पिटलमध्ये नेऊ शकत नाही. ही पोलीस केस आहे. आम्हाला कोर्टात उगीचच असंख्य फे-या माराव्या लागतील.”

पुन्हा ‘जय श्रीराम’ आणि ‘अल्ला हो अकबर’ या आरोळ्या सुरू झाल्या. आता तो जमाव हिंसक व्हायला लागला होता. घाबरून मी जवळच्याच एका झाडावर चढून बसलो. आता त्या गर्दीचा स्वत:वरचा ताबा सुटत चालला होता. या ठिकाणी ते का जमले होते, हेच बहुधा सगळे विसरले होते. आता त्यातल्या कुणावरच विश्वास ठेवण्यात अर्थ नव्हता. मेलेल्या माणसाला पुन्हा मारण्यापासून त्यांना कोण थांबवू शकणार होतं ? 

मी एका विचित्र पेचात सापडलो होतो. रस्त्यात पडलेला तो मृतदेह नि:संशय माझाच होता. तो देह जाळायचा की पुरायचा, हे ठरवण्याआधी, त्यांनी मला एकदा तरी विचारायला हवं होतं. पण तो जमाव माझं काहीच  ऐकायला तयार नव्हता. 

मी अगदी मनापासून त्यांच्याकडे अक्षरश: याचना केली की, ‘‘ भावांनो, माझ्यासारख्या क्षुल्लक माणसावरून, तुम्ही तुमच्या सांप्रदायिक सद्भावनांमध्ये तेढ का निर्माण करताय? त्या भावनांना धक्का लागू देऊ नका. त्या सद्भावना सांभाळा ना… सगळे एकत्र बसून चर्चा करा, आणि मला जाळायचं की पुरायचं याचा शांतपणे आणि समजूतदारपणे निर्णय घ्या. तुम्ही जर याबाबत कुठलाच निर्णय घेऊ शकला  नाहीत, तर मग हा प्रश्न सोडवण्यासाठी कोर्टात जा.”

यावर जमाव म्हणाला— ‘‘ कोर्ट न्याय देण्यासाठी फार वेळ लावतं. काही केसेस तर कधीकधी पन्नास वर्षांहूनही जास्त काळ रखडतात. खालच्या कोर्टाने दिलेल्या निकालाला आधी हायकोर्टात आव्हान दिलं जातं . मग त्यानंतर ती केस सुप्रीम कोर्टात दाखल केली जाते. तोपर्यंत तुझ्या या मृतदेहाची काय अवस्था होईल? ”

मी म्हणालो, ‘‘ भावांनो, तुमच्यातली कटुता आणि रक्तपात, हे सगळं टाळण्यासाठी, तुमचा अंतिम निर्णय होईपर्यंत मी  ‘ममी’  बनायला तयार आहे.”

—पण त्या जमावाला बहुतेक रक्ताची तहान लागली होती. इतक्या जास्त वेळ थांबायला कुणीच तयार नव्हतं. 

मग मी पुन्हा हिम्मत करून म्हटलं, ‘‘ नाहीतर तुम्ही असं करा ना –नाणं उडवून ठरवा काय करायचं ते— जे जिंकतील, ते त्यांच्या धार्मिक विचारधारेनुसार, मला जाळतील किंवा पुरतील.”

— लोकांनी ताबडतोब प्रत्युत्तर दिलं—- ‘‘आम्ही सर्वांनी ‘शोले’ सिनेमा पाहिलेला आहे. तशी खोडसाळपणाने केलेली चलाखी आम्हाला मान्य नाही. ”

केवढी मोठी समस्या निर्माण झाली होती ही — ‘ माझा देह असा रस्त्यात पडलेला आहे— त्याच्याभोवती धर्मांध लोकांची गर्दी जमा झालेली आहे— मी स्वत: झाडावर चढून बसलो आहे—- आयुष्यात पहिल्यांदाच, मी माझा अशा अवस्थेतला देह बघतो आहे ’— माझ्या स्वत:च्याच देहाची मला कीव वाटत असल्याचं माझ्या लक्षात आलं होतं—-पण त्याहीपेक्षा जास्त कीव मला या गर्दीची वाटते आहे. माझ्या मृतदेहाचा ताबा मिळवण्यासाठी हे बिचारे लोक इतरांना मारायला, किंवा अगदी स्वत: मरायलाही तयार झाले होते. 

इतक्यात, थोडासा शिक्षित वाटणा-या एका दंगेखोराने, मी बसलो होतो त्या झाडाकडे बोट दाखवले, आणि तो इंग्लिशमध्ये ओरडायला लागला— ‘‘अरे तो पहा— मूर्ख कुठला— धरा धरा— मारून टाका त्याला—” आणि त्याचं ओरडणं ऐकून इतर कितीतरी जण, माझा मृतदेह तसाच ठेवून त्या झाडाखाली गोळा झाले.  भीती वाटून मी आणखी वरच्या फांदीवर चढून बसलो.

ते दंगेखोर माझ्याकडे पाहून ओरडायला लागले— “ तू कोण आहेस ते पटकन् सांग आम्हाला— नाहीतर आम्ही तुला पुन्हा एकदा मारून टाकू.”

त्याही परिस्थितीत नकळत मला जरासं हसूच आलं— काय विचित्र माणसं होती ती. आधीच मेलेल्या माणसाला ते पुन्हा मारून टाकू इच्छित होते. मी खूप विचार केला. पण माझ्या आयुष्याची शपथ घेऊन सांगतो, मी हिन्दू होतो का मुस्लीम होतो, हे काही केल्या मला आत्ता आठवत नव्हतं. पण मग ज्या लोकांना स्वत:चा धर्म लक्षातच  नसतो, किंवा माहितीच नसतो, अशा लोकांचा धर्म कुठला असतो? त्यांची नावे काय असतात?— राम— रहीम— सिंग— डेव्हिड…?

आता गर्दीचा स्वत:वरचा ताबा सुटत चालला होता. दोन्ही बाजूचे लोक आता हातातली त्रिशूळ  आणि तलवारी सरसावून उभे होते.  ‘जय श्रीराम’ आणि ‘अल्ला हो अकबर’  या घोषणा पुन्हा आणखी जोमाने हवेत घुमायला लागल्या. 

दंगल थोपवायची म्हणून मी पुन्हा एकदा त्या गर्दीला विनंती केली—‘‘ भावांनो, कृपा करून शांत व्हा. तुम्हाला जर कुठलाच तोडगा काढता येत नसेल, तर एक काम करा— कृपया माझ्या देहाचे दोन भाग करा. अर्धा भाग हिंदूंनी घ्यावा आणि तो जाळून टाकावा. दुसरा अर्धा भाग मुस्लिमांनी घ्यावा, आणि तो पुरून टाकावा.”

मला अतिशय न्यायप्रिय राजा विक्रमादित्य याची एक प्रसिद्ध गोष्ट आठवली. आणि मला खात्री वाटायला लागली की, त्यातला एक गट आता नक्की माघार घेईल, आणि माझ्या पवित्र देहाची विटंबना होणार नाही. 

…पण बहुतेक असं काही घडणार नव्हतं. हातात विळे, कोयते, तलवारी, चाकू असं काय काय घेऊन, माझ्या शरिराचे तुकडे करायला सज्ज झालेली गर्दी पुढे पुढे यायला लागली. मी त्या झाडाच्या सर्वात वरच्या फांदीवर बसलो होतो, तरीही थरथर कापायला लागलो. शेवटी काहीही झालं, तरी ज्या शरिराचे असे तोडून वेगवेगळे भाग केले जाणार होते, आणि त्याची वाटणी केली जाणार होती, ते शरीर माझं होतं. 

कुठल्या प्रकारची माणसं होती ही, जी मृतदेहाचे दोन भाग करण्याचा निश्चय करून उभी होती…? त्या माणसांच्या गर्दीकडे मी अगदी बारकाईने निरखून पाहिलं. दोन्ही बाजूच्या माणसांचे चेहेरे तर अगदी एकाच प्रकारचे होते. हातात केशरी झेंडे घेतलेल्या बाजूला ज्या धर्मांध मुद्रा दिसत होत्या, अगदी तशाच मुद्रा, हिरवे झेंडे हातात उंच घेऊन उभ्या असलेल्या दुस-या बाजूलाही दिसत होत्या. दोन्हीकडे धोक्याची सूचना देणारे डोळे तसेच–चेह-यावरचं   विकृत हास्यही अगदी एकसारखं— आणि हातातल्या शस्त्राची धार तपासणारे हातही तसेच — हे पहातांना मला असं वाटत होतं की, त्यांना उद्देशून आपल्याला ‘स्टॅच्यू’… असं म्हणता यायला हवं होतं… मग त्या सगळ्या दंगलखोरांचे पुतळे बनतील, आणि मग आपल्याला त्यांना समुद्रात बुडवून टाकता येईल.

—-तो जमाव माझे तुकडे करायला अगदी उतावीळ झाला होता. इतक्यात त्या गर्दीतून कुणीतरी मोठ्याने ओरडलं… ‘‘अरे तुम्ही आधी फक्त त्याची पॅन्ट ओढून काढा. मग तो हिन्दू आहे की मुस्लीम आहे, हे लगेच स्पष्ट होईल.”

हा तर अगदी टोकाचा अपमान होता माझा.  लगेच कितीतरी हात माझी पॅन्ट खाली ओढायला लागले. आता मात्र मी आणखी शांत बसू शकत नव्हतो. मी झाडावरून खाली उडी मारली, आणि मदतीसाठी आरडाओरडा करायला सुरूवात केली. 

पण मी इतक्या मोठमोठ्याने मारत असलेल्या हाकांकडे कुणीच लक्ष दिलं नाही. जमावाने माझे सगळे कपडे ओढून काढून टाकले, आणि माझा देह तिथे पडलेला होता—-संपूर्ण नग्नावस्थेत ! मी शरमेने माझे डोळे घट्ट मिटून घेतले. 

‘‘अरे देवा शिवशंकरा—” — “ आम्हाला सैतानापासून वाचव देवा—-”

अचानकच त्या गर्दीतून, अगदी सुसंवादी वाटावे असे आनंदोद्गार स्पष्ट ऐकू यायला लागले. मी डोळे उघडले, आणि क्षणार्धात मला सगळं काही स्पष्टपणे लक्षात आलं– मी कोण होतो हे झटकन् मला आठवलं—- काही दंगलखोर, हिजड्यांबद्दल अगदी खालच्या पातळीवरचे विनोद करत होते. काहींनी अगदी तालात टाळ्या वाजवत… ‘हाय… हाय…’ असा मोठमोठ्याने जणू जपच सुरु केला—- ‘‘अरे हा तर ‘तो’ ही नाही आणि ‘ती’ ही नाही… तृतीयपुरुषी आहे.” असा फाजील विनोद करत ते हसायला लागले. 

— पण आता त्या जमावातला तणाव आणि गोंधळ मात्र कमी झाला होता. आणि मी सुटकेचा नि:श्वास टाकला. 

हळूहळू माणसांची ती गर्दी पांगायला लागली. केशरी झेंडावाले एका दिशेने गेले, आणि हिरवा झेंडावाले दुस-या दिशेने गेले—म्हणजे आता माझी वाटणी होणार नव्हती तर–  आजचा दिवस त्रिशूल, चाकू, तलवारी यांचा नव्हताच . आता मी माझ्या नग्न देहासोबत एकटाच उरलो होतो… आणि मी ‘त्या’ ला प्रार्थना केली,—- ‘‘देवा, सगळ्या सांप्रदायिक दंगलींचं जर या मार्गाने निराकरण होणार असेल, तर प्लीज प्रत्येकाला “ते”  कर—- तृतीयपुरूषी—- नपुंसक—-”       

मूळ इंग्लिश कथा : The Division –  कथाकार – श्री सुशांत सुप्रिय

अनुवाद – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments