श्री सुहास रघुनाथ पंडित
जीवनरंग
☆ अ.ल.क. – सुहास रघुनाथ पंडित ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
अ ल क… समानार्थी
तो एक लेखक होता.शब्दांच्या अर्थांचा शोध घेणारा.
तो शोधत होता समानार्थी शब्द,
‘पशू’ या शब्दासाठी.
वारंवार बातम्या वाचल्या अमानुषतेच्या आणि सापडला समानार्थी शब्द,’पशू’ या शब्दासाठी…….. तो शब्द म्हणजे’माणूस’ !
अ.ल.क… ठेचा
आजोबा दवाखान्यात अॅडमीट.सूनबाईंनी आवश्यक ते खाद्यपदार्थ आणले आणि दवाखान्यातील टेबलावर व्यवस्थित लाऊन ठेवले.त्यात एक बाटली होती मिरचीच्या ठेच्याची.सासूबाईंनी ती पाहिली आणि त्या चांगल्याच भडकल्या.दवाखान्यात ठेचा
आणला म्हणून त्यांनी सूनबाईंवर चांगलेच तोंडसुख घेतले.
सूनबाई शांतपणे म्हणाली,”अहो आई,ती नुसती बाटली आहे ठेचाची.त्यातून मेतकूट आणलंय मी दादांसाठी.”आणि तिची बोटे मोबाईलवर गुंतली.
ठेच्याच्या बाटलीमुळे सासुबाईंचे नाक मात्र चांगलेच झोंबले.
अ ल क ….साभार
पहिलाच लेख अंकात छापून येणार म्हणून तो खुश होता.एकच लेख त्याने दोन अंकाना पाठवला होता.
जवळ जवळ पंधरा दिवसांनी त्याचे दोन्ही लेख साभार परत आले.तो हिरमुसला.पण क्षणभरच .त्याने वही,पेन काढले आणि नव्या दमाने सुरूवात केली.
अ ल क ….सार्वजनिक
सार्वजनिक उकिरड्यावरचा कचरा वा-याने उडून सगळीकडे पसरत होता.माॅर्निंग वाॅकला जाणारे आजोबा आपल्या हातातील काठीने तो कचराकुंडीकडे ढकलत होते.पण एक खोके मात्र त्यांच्या काठीने हलेना.क्लासवरून परतणारे दोन काॅलेजकुमार हे सर्व पहात होते.जवळ आल्यावर ते म्हणाले,”
जाऊ द्या आजोबा,कचराकचराकुंडी
कुंडी सार्वजनिक,रस्ताही सार्वजनिक.कशाला उगा ताप करून घेताय ?”
आजोबांनी आभाळकडे हात जोडले,खिन्नसे हसले आणि पुढे चालू लागले.
© श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈