सौ. गौरी सुभाष गाडेकर

? जीवनरंग ❤️

☆ मात… भाग – 2 (भावानुवाद) – सुश्री भावना ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

(पूर्वसूत्र : लफंग्यासारखा दिसणारा अक्षय एका बड्या बाईच्या शेजारी जाऊन बसला आणि तिच्याशी उर्मटपणे बोलू लागला…… आता पुढे )

इतक्यात एक बेअरर धावत आला. माझ्यापुढे मान झुकवून नम्रपणे बोलला, “अक्षैसाहेब, प्लीज, तुम्ही इकडे या. इथे जागा होतेय. आरामात बसा. काय घेणार तुम्ही?”

यावेळी मी बसल्याबरोबर सिगरेट पेटवलीय. मला चांगलंच ठाऊक आहे – ही सारी गडबड माझ्यासाठी नाही, ‘वेंगर्स’च्या नावासाठी आणि बिझनेससाठी चाललीय.बेअररला कुठे माहीत असणार की, डॉ. आहुजांचं नाव ऐकल्यावर लोक असं काही कीव केल्यासारखं, पण तुच्छतेने  माझ्याकडे बघायला लागतात, की चिडायचं नाही ठरवलं, तरी माझं पित्त खवळतं!

खरंच. हल्ली हे खूपच वाढलंय. जो येतो, तो समोरच्याला तोलत असतो. याच्याकडे कार आहे की नाही? असली, तर कुठल्या मॉडेलची आहे? कपडे डिझाईनर आहेत की  साधे आहेत? घर स्वतःचं आहे की भाड्याचं? जसं काही माणूस म्हणजे फक्त एक  बुके आहे, श्रीमंतीच्या फुलांनी सजवलेला, नाहीतर गरिबीचे सुकलेले काटे भरलेला. धत् तेरेकी!

शालिनी विनम्र, समर्पित प्रेयसी होती. माझ्या इशाऱ्यावर नाचणारी. मला देवासारखं पुजणारी. शालिनी!

मनात तिच्या किती प्रतिमा उफाळून आल्या!हसणारी, खिदळणारी, चिडणारी, चिडवणारी आणि अचानक माझ्यासाठी चिंताक्रांत होणारी शालिनी. तिला स्वतःची अजिबात काळजी वाटायची नाही. मी तिच्याशी लग्न करीन आणि मग आम्ही माझ्या वडिलांच्या प्रशस्त वाड्यात सुखाने आयुष्य कंठू, याची तिला पूर्ण खात्री होती. खरं सांगायचं तर, माझ्या आकर्षकतेची आणि ताकदीची जाणीव मला जेवढी शालिनीने करून दिली, तेवढी इतर कोणीही करून देऊ शकलं नाही.

म्हणून तर तिच्यापासून दूर   व्हायचा विचारही कधी माझ्या मनात आला नाही.इथेही मी त्याच जुन्या जाणिवेच्या शोधात येतो. तशी ती जाणीव अजून तेवढी जुनी झाली नाहीय. मी तिला कन्व्हिन्स करीनच.

आश्चर्य आहे ना! ‘वेंगर्स’मध्ये आल्यावर अचानक एखाद्या क्षणी मला वाटतं, की शालिनीने टेबलाखाली माझा हात धरलाय. तो मुलायम हात आताही माझ्या हातात गुंतल्यासारखं वाटतंय. बेचैन करणारी ती गोड ऊब माझ्यात झिरपू लागलीय. ओह! शालिनी!शीलू! आय लव्ह यू, यार!

कॉफी पितापिता मला पाच वर्षांपूर्वीचे, आमच्या प्रेमप्रकरणाचे सुरुवातीचे दिवस आठवतात.

सुंदर, नव्हे, अतिसुंदर चेहरा, कमनीय शरीर, पुढे थोडे कापलेबिपलेले लांबसडक केस आणि मेघाच्छादित कपाळावर चमकणारी छोट्या कुंकवाची चांदणी. कुंकवाचा रंग रोज वेगळा असायचा.

मला आश्चर्य वाटलं, की याआधी हिच्याकडे माझं लक्ष कसं नाही गेलं?असंही असेल, की एक ना एक हंगामी प्रेमज्वर मला जडलेलाच असायचा. आधी मिनी माथुर, मग रागिणी सिंह… शेवटी अप्पी -अर्पिता घोषनंतर हृदयाचं म्यान रिकामंच होतं त्या दिवसांत.

पण एक कळून चुकलं, की बाईक उडवणं, दिलखेचक हसणं वगैरे गोष्टींनीही मी तिच्यावर मुळीच प्रभाव पाडू शकलो नाही.

क्रमश:…

मूळ हिंदी  कथा – सुश्री भावना  

भावानुवाद –  सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments