सौ. गौरी सुभाष गाडेकर
जीवनरंग
☆ मात… भाग – 3 (भावानुवाद) – सुश्री भावना ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆
(पूर्वसूत्र : अक्षयला एक कळून चुकलं होतं, की बाईक उडवणं, दिलखेचक हसणं वगैरे गोष्टींनी शालिनीवर प्रभाव पडणार नाही… आता पुढे…)
कित्येक आठवड्यांनंतर, एका रात्री तिच्या आईच्या पोटात खूप दुखायला लागलं. तेव्हा शेजारधर्म म्हणून पापा त्यांच्याकडे गेले. माझ्यासाठी हा चांगला योग ठरला. कारण नंतर ती कधी आईला घेऊन, तर कधी नुसतंच सांगून औषध न्यायला आमच्या घरी यायला लागली.
नेहमीचा आळस सोडून लवकर लवकर आंघोळबिंघोळ करून पापांच्या क्लिनिकच्या वेळात मी जवळपास घोटाळत राहायचो. सकाळी भेटली नाही, तर हा कार्यक्रम संध्याकाळी ठेवायचो.
पापांनी तिला हाक मारली, तेव्हा तिचं नाव समजलं. मग अगदी काळजीयुक्त स्वरात मी तिच्या आईची चौकशी करू लागलो, “आंटी कशा आहेत आता, शालिनीजी.?”
ती यायची बंद झाली, तेव्हा मीच तिच्या घरी जाऊन धडकलो.
“कशा आहेत आई? मला वाटलं, तुमचीही तब्येत बिघडली की काय? नोकरी, त्यात त्यांचं आजारपण…. खूप स्ट्रेन पडला असेल ना?”
तिने काही बोलायच्या आतच मी, रिहर्सल करून घटवलेली वाक्यं अगदी उदासपणे म्हटली, ” खरं सांगायचं तर, मला आई नाही….इंटरपर्यंत भोपाळला होतो. आता इथे आलोय. म्हणून तर…. कोणाच्या आईच्या आजारपणाविषयी कळलं की मी अस्वस्थ होतो. “
मी विनम्र आणि संवेदनशीलही होऊ शकतो, या गोष्टीने ती जास्तच प्रभावित झाली असावी. मी विचारपूर्वक आखलेल्या व्यूहाची ती एका चाल होती, हे तिला कळणं शक्य नव्हतं.
नव्याने मिळालेल्या या विजयाची मला नशा चढली. तीही त्या मॅग्निफाईंग ग्लासमध्ये बघून माझ्या राईएवढ्या महानतेचा पर्वत करू लागली आणि खूश होऊ लागली. यालाच म्हणतात प्रेम. एकंदरीत पाहता आम्ही दोघंही खूश होतो. हे सगळं जाणून -समजून घ्यायची माझ्या वडिलांना गरजही नव्हती आणि फुरसतही. तिच्या सर्वसामान्य परिवाराला मात्र माझ्यासारख्या प्रतिष्ठित स्थळाविषयी कळल्यावर आनंदच झाला.
तर आमच्या भेटीगाठी सुरू झाल्या – हॉटेल, सिनेमा, अमुक आर्ट गॅलरी, तमुक फॅशन शो…. शालिनीला भारावलेलं बघितलं, की मला वेगळाच आनंद व्हायचा.
अशी एक -दोन वर्षं गेल्यानंतर मात्र माझा शालिनीतला इंटरेस्ट कमीकमी होत गेला. आणि साहजिकच माझ्या मनात प्रश्न उठला – ‘शालिनीशी लग्न करून मी सुखी होईन का?’ मग मी तिच्याकडे चिकित्सक दृष्टीने बघू लागलो.’छे! अशी सर्वसामान्य, मठ्ठ मुलगी, माझी बायको कशी होऊ शकेल?’ मी मित्रांबरोबर मन रिझवायचा प्रयत्न केला. रोमान्सच्या एक -दोन जुन्या ठिणग्यांना फुंकर मारून फुलवायचा प्रयत्न केला. मनात चीड उफाळून यायची. मी स्वतःलाच सांगायचो, ‘हीच संधी आहे. तिला विसरायचा प्रयत्न कर. शेवटी स्वातंत्र्य हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे.’
शेवटी पिताश्री मला डॉक्टर करू शकले नाहीतच. त्या बाबतीत हार मानून त्यांनी मला औषधांची एजन्सी उघडून दिली.त्यातही यशस्वी झालो, असं म्हणता यायचं नाही. विक्रीतून मिळालेले पैसे माझ्या हातून कुठे खर्च व्हायचे, त्याचा मलाही पत्ता लागायचा नाही. काही वर्षं, नवा स्टॉक भरण्यासाठी पैसे देऊन पापांनी मला मदत केली. पण शेवटी त्यांनीही हात टेकले.
तेव्हा सेठ हरकिसन पांड्याजी देवासारखे धावून आले. इंडस्ट्रियल एरियात मिळत असलेला एक प्लॉट विकत घेऊन तिथे काम सुरू करायची आयडिया तर त्यांनी दिलीच, शिवाय लोनही दिलं. नंतरही ते ऍडव्हान्स आणि लोन देतच होते.
त्यांची नजर शालिनीवर आहे, हे माझ्या लक्षात आलं होतं. म्हणून मी मुद्दामहून शालिनीला बरोबर नेत असे. मी तिला आमिष म्हणून वापरत होतो. पांड्याची बुभुक्षित नजर माझ्यापासून लपली नव्हती. मला वाटायचं, काहीही करून शालिनीने पांड्याला खूश ठेवावं आणि माझा खिसा भरत राहावा.
क्रमश:…
मूळ हिंदी कथा – सुश्री भावना
भावानुवाद – सौ. गौरी सुभाष गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈