सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

? जीवनरंग ?

☆ पायथागोरसचा ओहम्स लॉ… श्री हर्षद वा. आचार्य ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

परवा सुट्टी म्हणून हॉटेलात जेवायला जायचा प्लॅन ठरला. सहकुटुंब ठाण्याच्या एका नवीनच चालू झालेल्या मस्त हॉटेलात गेलो. आम्ही बसतो न बसतो तेवढ्यात आमच्या  शेजारच्याच टेबलवर चौघे जण येऊन बसले. दोन पुरुष आणि दोन बायका. जोडपी वाटत नव्हती. मित्रमैत्रीणीच असावेत. चाळीशीच्या आसपासचे असतील.

आम्ही काय ऑर्डर करायची ते ठरवत होतो. त्या चौघांचाही विचारविनिमय चालू होता. त्यातला एक जण दिसायला जरा वेगळाच होता. अतिशय कृश शरीर. टक्कल. आणि सतत धाप लागल्यासारखं पण मोठ्या आवाजात बोलणं. बाकीचे तिघे मात्र सामान्य माणसासारखे वागत-बोलत होते. आमची ऑर्डर देउन झाली. त्यांनीही चौघांमध्ये ८-९ डीशेस मागवल्या. मी, बायको आणि मुलीने एकमेकांकडे पाहिलं. ‘किती अधाशीपणा’ असा भाव तिघांच्याही नजरेत होता.

दोघांच्याही टेबलवर ऑर्डर प्रमाणे डिशेस येऊ लागल्या. खाताना अर्थातच गप्पा चालू होत्या. त्या चौघांच्या  गप्पाटप्पा चालू होत्या. विषयांतर होत होत ‘शाळेत शिकलेलं किती उपयोगी पडतं’ ह्या विषयावर बोलणं आलं. दोघीपैकी एक जण म्हणाली,” ए जो कोणी पायथागोरस थिअरमचं स्टेटमेंट म्हणून दाखवेल त्याला  माझ्याकडून चॉकलेट ब्राऊनी”. लगेच तो वेगळा दिसणारा पुरुष मोठ्याने बोलू लागला,” So long as the physical state of the conductor remains the same, the current flowing through a conductor is directly proportional to the potential difference applied across its ends.”

वा! वा!वा! तिघांनीही त्याचं तोंडभरून कौतुक करून टाळ्या वाजवल्या आणि लगेच वेटरला चॉकलेट ब्राऊनी ची ऑर्डर दिली. आता तर टेबलवर जागाच उरली नव्हती. आधी मागवलेल्या आठ डिश सुद्धा जवळपास तशाच होत्या. बहुतेक डिशेस चाखल्यादेखील नव्हत्या. एकदोन फक्त नुसती चव घेऊन ठेवल्यासारख्या.

आम्हाला तिघांनाही तो प्रकार विचित्र वाटला. एकतर अन्नाची नासाडी. मोठमोठ्याने बोलणं. कहर म्हणजे पायथागोरस थियरम म्हणून ओहम्स लॉ म्हणून दाखवणं. वर इतरांनी त्याचंच कौतुक करणं. आम्ही नजरेनेच एकमेकांशी बोलत होतो. ‘असे काय हे मूर्ख, माजोरडे’ ह्यावर आमचं एकमत झालं. आम्ही  आपसात दुसरं बोलणं चालू केलं तरी बाजूच्या टेबलवरचा प्रकार खटकत होताच.

दोघांचंही जेवण जवळपास एकत्रच आटोपलं. बिलं आलं. मी आणि तो कार्ड स्वाईप करण्यासाठी काउन्टरपाशी गेलो. त्याने मला जरासं ढकलूनच स्वतःच कार्ड पुढे केलं. मी जराशा त्रासिक नजरेने त्याच्याकडे पाहिलं. तो बिल देऊन ते दोघे मित्र पान खाऊया म्हणून टपरीकडे वळले.

मागून येणाऱ्या दोघींशी माझी नजरानजर झाली. आमच्या चेहऱ्यांवरची नापसंती त्यांना स्पष्ट दिसली असावी. त्यांच्यातली एक जण (ब्राऊनीचं बक्षीस देणारी) पुढे येऊन म्हणाली,” सॉरी..तुम्हाला हे सगळं विचित्र वाटत असेल ना…आम्ही मस्तवाल, माजलेले आहोत असं वाटत असेल.” मी उत्तरादाखल केवळ खांदे उडवले. ती पुढे म्हणाली, “तुम्ही ऐकणार असाल तर मी काही सांगू का?”. मी, बायको आणि मुलगी गोंधळून उभे राहिलो. दरवाजाची वाट मोकळी करून थोडे बाजूला उभे राहिलो.

ती बोलू लागली,” ‘त्याचं’ वागणं-बोलणं ह्याकडे दुर्लक्ष करा. He is terminally ill. कदाचित दिवाळीपर्यंत तो आपल्यात नसेल. त्याच्याच आग्रहाखातर ही आम्हा बालमित्रमैत्रिणींची छोटीशी फेयरवेल पार्टी होती…त्याच्यासाठीच… त्याच्याच खर्चाने….” तिला हुंदका आवरला नाही.

आम्ही तिघेही सुन्न होऊन आळीपाळीने त्याच्याकडे, त्या दोघींकडे आणि एकमेकांकडे पाहत उभे राहिलो. त्याचं कृश शरीर, टक्कल, धाप लागल्यासारखं बोलणं हे सगळं आता पटत होतं. आता दोघींपैकी दुसरी स्त्री म्हणाली,” आणि हो..त्याने पायथागोरस थियरम म्हणून ओहम्स लॉ म्हणून दाखवला. हे आम्हालाही कळलं. पण आम्हाला हसवण्याचा त्याचा हा प्रयत्न होता हेही आम्हाला कळत होतं. बाय द वे, He is M.Tech., Ph.D from IIT”. त्यामुळे… now you understand?”

इतक्यात पानं घेऊन ते दोघे आले. “Let’s go buddies…Hurry…Time is running…” असं बोलत ‘त्या’ने त्या दोघींच्या हातातल्या पार्सलच्या पिशव्या घेतल्या. पिशव्या घेता घेता त्याने आमच्याकडे पाहिलं. आमचे चेहरे पाहून त्याला सारं समजलं. तो मोठ्याने म्हणाला,” ओह गॉड, पचकल्या का ह्या दोघी? सगळं सांगितलं असेलच.” थोडं स्वतःशीच तर थोडं आमच्याकडे पाहून हसत तो म्हणाला,” ह्यांना वाटतंय मी दिवाळी पर्यंत तरी असेन..पर आपुन का प्लॅन अलगीच है। दसऱ्यालाच सीमोल्लंघन”. असं म्हणून त्याने त्या पार्सल केलेल्या डिशेस वाटण्यासाठी सिग्नल जवळ उभ्या असलेल्या भिकारीणीला आणि एक तृतीयपंथीयाला जवळ बोलवलं. जाता जाता मला उद्देशून “Sorry for the push at the counter…But you know…I don’t have much time left…Need to hurry..” असं म्हणून तो चालू लागला.

त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून आम्हाला पायथागोरसचा नवीनच सिद्धांत समजत होता…

(सकारात्मकता) वर्ग + (समाधान) वर्ग = (जीवन जगणं) वर्ग.

लेखक : श्री हर्षद वा. आचार्य

संग्राहिका  : स्नेहलता गाडगीळ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments