डॉ. ज्योती गोडबोले
जीवनरंग
☆ रक्तापलीकडचं नातं! — भाग 2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
(“आई, मी खूप शिकेन, मोठा होईन, मग बघ. तुला काही कमी नाही पडू देणार! “– नयनाच्या डोळ्यात पाणी आले.) — इथून पुढे —
त्या वर्षी नयना रोहितला आपल्या बरोबर घेऊन आली.
वसुधाने हळूच विचारले, “ नयना,रोहितला सांगितलंस का कारखानीस साहेबांबद्दल?”
“अजून नाही ग. पण मी साहेबांनाही,’ एक वर्ष द्या मला,’असं म्हटलंय. मी हळूहळू सांगेन रोहितलाही .”
त्या दिवशी संध्याकाळी पेढे आणि फुले घेऊन कारखानीस नयनाच्या वाढदिवसाला आले. अचानक ते घरी आल्यामुळे नयना गोंधळून गेली. रोहित घरी होता. नयनाने रोहितशी त्यांची ओळख करून दिली.
“ हॅलो रोहित ! मी सुधीर कारखानीस ! तुझ्या बाबांच्या आणि आता आईच्याही बँकेत आहे. कसा आहेस तू यंग मॅन? “– त्याच्याशी शेक हॅन्ड करत मोकळेपणाने साहेबांनी विचारले.–“ काय करतोस? पुढे काय करायची इच्छा आहे ? असेही त्यांनी त्याला विचारले.
रोहितने खुलून जाऊन मनमोकळेपणाने उत्तरे दिली— “ मला आर्मीत जायचंय.” तो ठामपणे म्हणाला.
नयना हे बघत होतीच., तिला साहेबांचे आश्चर्य वाटले. काहीही कल्पना न देता ते तिच्या घरी आले,आणि किती छान बोलले रोहितशी.– असे जर झाले,तर गोष्टी सहज आणि सुरळीत होतील,असे वाटले तिला.
त्या दिवशी शाळेतून येताना, अचानक कारखानीससाहेब भेटले रोहितला. “ चल रे रोहित,सोडू का तुला मी घरी?”
” काका,पण हा माझा मित्र पण आहे बरोबर!” संकोचून रोहित म्हणाला,
“ अरे,मग त्यालाही सोडूया की घरी. येरे… बस.”
एवढ्या मोठ्या आलिशान कारमधून जाताना रोहितला मजाच वाटली.
“ काका, थँक्स हं ! रोहित म्हणाला. “ काका,वर येता का, मला चहा मस्त येतो करता ! येता? “
कारखानीस अगदी सहजपणे,” हो, येतो की “ म्हणाले, आणि रोहित त्यांना घेऊन वर आला. त्याने मस्त चहा केला, आणि आईसाठी थर्मासमध्ये ओतून ठेवला. कौतुक वाटले कारखानीसांना !
ते गेल्यावर बऱ्याच वेळाने नयना घरी आली. तिला चहा ओतून देत रोहित म्हणाला, “आई’ आज गंमतच झाली अगं.
आम्हाला काकांनी लिफ्ट दिली, आणि मग मी त्यांना चहा पण करून दिला.
नयनाला कौतुकच वाटले,कारखानीसांचे ! एका लहान मुलाच्या मनात शिरायचं कसब किती सुंदर जमत होतं त्यांना !
दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये वसुधाला हे सांगताना नयनाला अगदी भरून येत होते.
वसुधा म्हणाली, “अग, साहेब आहेतच खूप चांगले ! त्यांची बायको माझी मैत्रीणच होती. मूल नाही म्हणून त्यांना खूप वाईट वाटायचे ग ! म्हणून ते बिल्डिंगमधल्या सगळ्या पोरांवर मायेचा अक्षरशः वर्षाव करायचे ! ते रोहितशी वागतात ते मुद्दाम नाही ग. अतिशय सहृदय आहेत ते. “
रोहित हळूहळू काकांकडे आकर्षित होऊ लागला .“आई,आज मला काकांनी त्यांच्या घरी बोलावलेय, त्यांच्याकडे मोठी टेलिस्कोप आहे ना, ती बघायला ! आम्ही चार मित्र जाणार आहोत,जाऊ? “
“ अरे जा की !चांगलेच दोस्त झालेत की काका तुझे ! “
“ हो ग आई! कित्ती चांगले वागतात ते आमच्याशी. आपले बाबा असेच होते ना ग? “ रोहितचे डोळे गढूळले !
नयनाने रोहितला जवळ घेतले.
नयना आता,कारखानीससाहेबांना,सुधीर म्हणण्याइतपत जवळ आली होती.
“ सुधीर, किती छान वागता हो तुम्ही मुलांशी. रोहित हल्ली फार कौतुक करतो तुमचं. “
“ नाही ग नयना ! फार गुणी आहे तुझा मुलगा. तो ना,आपल्या वडिलांना फार मिस करतोय,म्हणून माझ्यात फादर फिगर बघतोय ग बिचारा. तू निश्चिन्त रहा. मी रोहितला कधीही अंतर देणार नाही.”
त्या दिवशी रोहित शाळेतून आला, तो तापाने फणफणूनच. नयना घाबरून गेली. तिने जवळच्या डॉक्टरांचे औषध आणले, पण ताप कमी होईना.
डॉक्टर म्हणाले, “आपण रोहितला ऍडमिट करूया. हे पहा, तुम्ही घाबरू नका. पण फक्त सगळ्या तपासण्या एकदा करून घेऊ या. “ —- रोहितला ऍडमिट केले. नयनाने बँकेतून रजाच घेतली. तिने रोहितबद्दल फक्त वसूला सांगितले. कारखानीसना हे काहीच सांगितले नाही. ‘ उगीच किती त्रास द्यावा, ते अतिशय सज्जन आहेत म्हणून? आपले त्यांचे काय नाते आहे अजून तरी? ‘
– रोहितचा ताप टायफॉईडचा ठरला होता. हळूहळू त्याचा ताप खाली येऊ लागला. रोहित एक दिवस ग्लानीतच होता तापाच्या. त्याने डोळे उघडले तेव्हा समोर कारखानीस काका खुर्चीवर बसलेले दिसले.
“ रोहित,उठू नकोस. काय हवेय?” त्यांनी त्याला हळूच उठवून बसवले. गरमगरम कॉफी पाजली.
त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. रोहितच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागले….. “ काका,काका ! “ त्याने त्यांच्या कमरेला घट्ट मिठी मारली !
“ अरे वेड्या, हे काय !आता बरा होशील तू पटकन ! साधा टायफॉईड तर आहे हा ! रडतोस काय? आर्मीत जायचंय ना तुला?” काकांनी रोहितचे डोळे पुसले.
“ काका, एक विचारू?रागावणार नाही ना?”
“ अरे वेड्या, मी कधीतरी रागावलोय का तुझ्यावर? विचार ना …”
“ काका, माझी आई खूप एकटी पडलीय हो. कोणी नाही तिला. कित्ती वेळा एकटी रडताना बघतो मी तिला. माझे बाबा तर मी पाचच वर्षाचा असताना देवाघरी गेले.– काका,तुम्ही माझे बाबा व्हाल? माझ्या आईशी लग्न कराल? मी लहान आहे, पण इतकाही लहान नाही, की तिचा विचार मी करू नये. मी उद्या आर्मीत गेलो, तर ती खूप एकटी पडेल.” एवढं बोलून रोहित खिन्न होऊन पडून राहिला. तेवढ्या श्रमाने त्याला दमायला झाले. काकांनी त्याला थोपटले आणि पांघरूण घालून ते हळूच निघून गेले.
चार दिवसांनी रोहितचा ताप पूर्ण उतरला. रोहित घरी आला. घरी वसुधा मावशी आली होती.
“ काय रोहित?बरा आहेस ना राजा? “
मावशीने रोहितला जवळ घेतले. नयना,कारखानीस त्याच्या जवळच उभे होते.
“ रोहित, मी यांच्याशी लग्न केले तर तुला आवडेल? तुझी इच्छा असेल तरच हे होईल, नाहीतर नको.”
“ रोहित ! तुझ्या बाबांची जागा मी घेऊ नाही शकणार ! पण तुझा आवडता काका तर आहेच ना मी ?
तू तुझे आडनावही बदलू नकोस. मग तर झालं ना?” कारखानीस म्हणाले.
“ मला तू एकटा बास आहेस रे जगायला. “ नयना कशीतरी स्वतःला सावरत म्हणाली.
“ नाही ग आई. मला काका कायम आपल्या घरी राहायला हवेत ! फार आवडतात ते मला. पण काका, मी आवडतो का तुम्हाला? “
काकांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. “ अरे वेड्या,हे काय विचारतोस? माझ्या मित्राचा मुलगा तू ! आणि आता तर माझाच मुलगा आहेस.”
रोहितने काकांना मिठीच मारली. “ काका, रत्नागिरीला होतो ना मी,आजीआजोबांकडे, तेव्हा मला खूप वाईट वाटायचे की आपल्याला बाबा नाहीत .सगळे कीव करून बघायचे माझ्याकडे. पण आता असे नाही होणार. मला बाबा म्हणून तुम्ही हवे आहात. “
— नयना, वसुधा आणि कारखानीस…. तिघांच्याही डोळ्यातून अविरत वाहणारे अश्रू त्या सगळ्यांच्या एकमेकांशी घट्ट झालेल्या नात्याचीच साक्ष देत होते.
— समाप्त —
© डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈