सौ. वंदना अशोक हुळबत्ते

? जीवनरंग ❤️

☆ कारावास… ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆ 

‘होणार सून मी या घरची’ सीरियल संपली.साडेआठचा भोंगा झाला.दारावरची बेल वाजली.टी.व्ही.चे बटण बंद करून काठीचा आधार घेत विमलबाई उठल्या.सावकाश पावले टाकत दारापर्यंत गेल्या.दार  उघडले.जेवणाचा डबा डबेवाल्याकडून घेतला आणि पुन्हा सावकाश जेवणाच्या टेबलापर्यंत गेल्या.डबा ठेवला.काॅटवर झोपलेल्या श्रीधरपंतांना त्यांनी उठवून बसवले.थोडे पाणी प्यायला दिले.

” बरं वाटतं का आता? चार घास भरवू का?” हातानेच बरं वाटतंय.जेवण नको.अशी खूण केली.त्यांचे डोळे खोल गेले होते.औषधाने सारखी ग्लानी येत होती.शरीरापेक्षा मनाने ते जास्त खचले होते.

‘अहो! गोळ्या घ्यायच्या आहेत.चार घास खा ‘ असे म्हणत वरणभाताचे चार घास लहान बाळासारखे बळजबरीने भरवले.तोंड पुसले.पाणी प्यायला  दिले.

स्वत:ला जेवण्यासाठी ताट वाढून घेतले.डोळे भरून आले.समोरचे दिसेनासे झाले.मन भूतकाळात गेले.

सातवी पास झालेल्या विमलाबाई वयाच्या चौदाव्या वर्षी श्रीधरपंताशी लग्न करून सासरी आल्या.घरची श्रीमंती.येण्याऱ्या जाणाऱ्यांचे घर.सासू- सासरे थकलेले.नव्या सुनेच्या हातात घरच्या किल्ल्या देऊन सासूबाई मोकळ्या झाल्या.विमलाबाईचे जबाबदारी पेलण्याचे वय नव्हते.दिल्या घरी असेल तसे रहावे.पडेल ते काम करावे ही माहेरची शिकवण.दुसऱ्या पर्यायच नव्हता.पडेल ते काम आनंदाने करायचे.सासऱ्यांना कुकरमध्ये तयार केलेले जेवण आवडत नसे.चुलीवर किंवा शेगडीवर त्यांच्यासाठी जेवण करावे लागे.रोज घरात वीस-पंचवीस माणसांचे जेवण तयार करावे लागे.तेही सकाळी-संध्याकाळी ताजे. सणवार ,उत्सव,समारंभ, असेल तर शंभर माणसांचा स्वयंपाक विमलबाईनाच करावा लागे.साक्षात अन्नपूर्णा त्या.त्यांनी अनेक जीवांना तृप्त केले.

आपली चार मुले सांभाळत दोन नंदांची लग्ने केली.त्यांची बाळंतपणे झाली.मुले मोठी झाली.जावई आले.सून आली.नातवंडे झाली.

यात किती काळ लोटला हे कळलेच नाही.स्वंयपाकघर मात्र सुटले नाही.

घरचे काम आवरून झाले की त्या घरच्या दुकानदारीत लक्ष घालीत.झोपेचे सहा-सात सोडले तर बाकी सर्व वेळ या बाईचा कामात जाई.आपली मुले शहाणी व्हावीत, सुसंस्कृत व्हावीत, म्हणून त्याबाबत कुठेही तडजोड केली नाही.सगळे आनंदाने सहन केले.घर एकत्र राहावे.घरात सदैव सुख नांदावे म्हणून बऱ्याच गोष्टी निमुटपणे सहन केल्या.त्यांच्या लग्नाला ५६ वर्षं झाली.सून येऊन पंधरा- सोळा वर्ष लोटली. घरात सूप वाजू नये म्हणून बऱ्याच ठिकाणी समजूतदार दाखवला.सुनेला लेकीप्रमाणे वागवले. तिला काय हवे नको ते पाहिले.तिच्या आवडी- निवडी सांभाळल्या. तरी भांड्याला भांडे लागेच.टी.व्ही.बघण्यावरून, मुलांना वळण लावण्यावरून,विकतचे खाद्यपदार्थ मुलांना देण्यावरून,काम करण्यावरून कुरबुर सुरू झाली.विमलाबाईच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला.त्यात श्रीधरपंतांना  अर्धांगवायूचा झटका आला.सत्तरी पार केलेल्या गुडघ्याच्या दुखण्याने बेजार असलेल्या विमलबाईना नवऱ्याची उसाबर करणे शक्य नव्हते.रजा काढून चार दिवस मुलाने सेवा केली.पण आता कायमची सेवा आपल्या करावी लागणार हे जाणून सुनेने भांडण काढले.

दुनियेची रीत आहे.म्हतारपण तरुणपणाला नको असते.म्हतारपणाचा अनुभव हवा असतो,पैसा हवा असतो,मदत हवी असते,सोबत हवी असते.पण नको असते ते म्हाताऱ्यांचे आजारपण,त्यांची सेवा,त्यांचे बोलणे,त्यांचे शहाणपण,शिकवणे.

युज  अॅड थ्रो’ च्या जमाण्यात म्हातारपण म्हणजे केवळ कर्तव्य पूर्ती. सेवा विकत घेणे, आई-वडिलांसाठी केअरटेकर ठेवणे ,औषध-पाण्याचा खर्च करणे त्यांच्या राहण्याची,जेवणाची सोय करणे म्हणजे कर्तव्य संपले असे वाटते.आम्ही त्यांना काही कमी पडू देत नाही.ही त्यांची भावना.

खरं तर म्हातारपणी अन्नाच्या भुकेपेक्षा भुक असते चार प्रेमळ शब्दांची,हवा असतो माणसांचा सहवास, आपुलकीच्या चार शब्दांची हाक आणि आपण कुणाला तरी हवे आहोत ही जाणीव.याचा आज वणवा आहे.

जिथे केवळ कर्तव्य पूर्ती असते तिथे म्हातारपण फुलत नाही.तर जिवंतपणी मरते.

विमलबाई विचार करत होत्या,आपण कुठे चुकलो? इतक्या वर्षात आपण आपल्या आवडीची एक गोष्ट केली नाही,कधी हौसमौज केली नाही,कधी मला हे पाहिजे असा हट्ट केला नाही.सर्व घराचा विचार केला. प्रत्येक वेळी मन मारले.नवऱ्याला साथ दिली.संसार हेच आपले विश्व झाले. तरी मी कुठे कमी पडले?आज चार मुले असूनही मी अनाथ का झाले? मुलांनी वृध्दाश्रमात घातले असते तरी चालले असते.तिथल्या समदुःखी माणसांच्यात मन रमले असते.

सर्व सोयीनियुक्त असलेल्या या एका स्वतंत्र खोलीत आमचा जीव घुसमटतोय.एकटेपणा खायला उठतोय.इथे मरणप्राय यातना भोगतोय, हा कारावास असह्य होतय.कोणत्या न केलेल्या चूकीची शिक्षा भोगतोय? यात दोष कुणाचा?

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

संपर्क – इंदिरा अपार्टमेंट बी-१३, हिराबाग काॅनर्र, रिसाला रोड, खणभाग, जि.सांगली, पिन-४१६  ४१६

मो.९६५७४९०८९२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments