प्रा.डॉ.सतीश शिरसाठ
जीवनरंग
☆ सख्खे भाऊ… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆
सखाराम वायाळ मुंबईत कापडाच्या मीलमध्ये कामाला होता.ती बंद पडल्यावर आपलं बिऱ्हाड घेऊन तो गावी आला . गावातल्या एका किराणामालाच्या दुकानात काम करून तो आपलं घर चालवत होता.त्याची बायको हौसाबाई कुणाच्याही शेतात कामाला जाई.एका पावसाळ्यात कामावरून येताना ती नदीच्या पाण्यात वाहून गेली होती.त्यानंतर सखारामनं सुरेश आणि शशिकांत या आपल्या दोन मुलांना आईची पोकळी जाणवून दिली नाही. शिकून शशिकांत त्या गावच्या शाळेत शिक्षक म्हणून काम करत होता.सिनिरीऑरिटी,
कामाचा अनुभव,मेहनत आणि अंगभूत गुणांमुळे तो तिथेच मुख्याध्यापक झाला.सुरेशनं गावातील शेतकऱ्यांच्या भाज्या,फळे विकत घेऊन त्यांचे पॅकिंग करून मुंबईत विकण्याचा धंदा सुरू केला.दोघांचीही आपापल्या क्षेत्रात होणारी प्रगती पाहून सखाराम आनंदी होता.वयोमानानुसार तो आता थकला होता.त्याचा ७५ वा वाढदिवस दोन्ही मुलांनी गावात थाटामाटाने साजरा केला.गावातील, तालुक्यातील आणि जिल्ह्य़ातील विविध क्षेत्रातील अनेक मोठी माणसं या सोहळ्याला उपस्थित होती.कार्यक्रमानंतर रात्री जेवताना शशिकांत आपल्या वडीलांना म्हणाला,” दादा,आम्हा दोघा भावंडांची इच्छा आहे की,उद्यापासून तुम्ही कामावर जाणं थांबवावं”.
” पण बाबांनो, घरी बसून मी काय करू ? घर खायला उठंल रे मला” सखाराम उत्तरला.
” मग सुरेशच्या धंद्यात त्याला मदत करा” शशिकांत म्हणाला.
दुसऱ्या दिवसापासून सखाराम सुरेशच्या कामात मदत करू लागला.
सुरेशचं काम हलकं झालं. गावाकडील सगळी कामं सखाराम पाहू लागल्यानं सुरेश मुंबईला वारंवार जाऊ लागला.तिथल्या रंगीबेरंगी जीवनाकडे तो आकर्षित झाला.तिथल्या मित्रांसोबत तो दारू पिऊ लागला,बारमध्ये जाऊ लागला.धंद्यावरचं त्याचं लक्ष कमी होऊ लागलं. त्याला पैशाची चणचण भासू लागली.आपले नाद पुरवण्यासाठी तो कुणाकडूनही हातउसने पैसे घेऊ लागला. गावाकडं शशिकांतला
उत्कृष्ट काम केल्याबद्दल मोठे पारितोषिक जाहीर झाले.राज्याच्या शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते हे त्याला मिळणार होते.सुरेशने हे आपल्या मित्रांना सांगितलं.त्यांनी सुरेशचे कान भरले.” अरे तू इथं हाडाची काडं करतो आणि तुझा भाऊ तिकडं काहीच काम न करता मोठमोठी बक्षीसं मिळवतो “.सुरेशला हे पटलं.तो गावी दारू पिऊन आला.शशिकांत घरी नव्हता. सखारामपुढं तो शशिकांतला शिव्या देत राहीला.सखारामनं त्याला आडवलं.” अरे, दारू पिऊन तू काय बडबडतोस ? काय अवदसा तुला आठवली आज ? ” ” तू थोबाड बंद कर थेरड्या ” असं म्हणून त्यानं आपल्या बापाला कोपर्यात ढकललं. या घटनेनंतर सखारामनं हाय खाल्ली. त्यानं अंथरूण धरलं.सुरेशचे पायही खोलात चालले.त्याचा धंदाही बसला.आपले चेकने घेतलेले पन्नास हजार रुपये परत केले नाही म्हणून कुणीतरी त्याच्यावर पोलीसात तक्रार केली.त्याला शोधत पोलीस त्याच्या घरी आले आणि त्याला अटक करून घेऊन गेले.हे झालं तेव्हा शशिकांत घरी नव्हता.संध्याकाळी तो घरी आला तेव्हा त्यानं पाहिलं की,सखाराम अंथरूणावर रडत होता.
शशिकांतला त्यानं घडलेलं सगळं सांगीतलं.वडीलांना शशिकांतनं धीर दिला आणि तो तडक पोलीसचौकीत गेला.शशिकांतला पहाताच ड्युटीवरचा हवालदार म्हणाला,” सर ,तुमच्या भावानं एकाचे पन्नास हजार रुपये घेऊन ते परत दिले नाही अशी कंप्लेंट आली म्हणून त्यांना
आणलंय “.शशिकांतच्या विनंतीवरून ते गृहस्थ चौकीत आले.शशिकांतनं त्यांना पन्नास हजारांचा चेक दिल्यावर त्यांनी केस मागं घेतली.सुरेशला घेऊन शशिकांत घरी आला.
शशिकांतच्या मागोमाग सुरेश घरात आला.मात्र आपल्या वडीलांच्या नजरेला नजर देण्याचं टाळत होता.अपराधी भावनेनं तो एका कोपर्यात उभा राहिला.त्याला असं अवघडलेलं पाहून सखाराम अंथरूणावर कसाबसा उभा राहिला.शशिकांत आणि सुरेशला त्याने आपल्या कुशीत घेतलं.तिघेही रडू लागले.
सखारामच्या पायावर कोसळत सुरेश म्हणाला, ” आबा,चुकलो मी.तुम्हा दोघांना मी दारूच्या नशेत टाकून बोललो.”
” बाळा,आता आसं नको बोलू.तूच म्हंला ना दारू प्युन बोल्ला”
” हा आबा” असं म्हणून त्यानं घरात कुठंतरी ठेवलेली दारूची बाटली दूर फेकून दिली.
” आबा,शशिकांतनं माझे डोळे उघडले.आता तसला मूर्खपना मी कर्नार नाही.माजा धंदा मी पुन्ना चालू करीन. तुमी काई पन करू नका.फक्त तुमचा आशिरवाद द्या “.
” बाळा,तू परत काम चालू कर्नार. आनी मी काय पडून राहू काय?”
असं म्हणून सखारामनं अंथरूण बाजूला सारलं.
© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ
ईमेल- [email protected]
मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈