? जीवनरंग ❤️

☆ सांजवेळ ☆ सुश्री स्वप्ना अभिजीत मुळे (मायी) ☆ 

हि बाई सतत फोनवर काय बोलते,..?आपल्या पेक्षा बरीच मोठी आहे,… इतका जर नातेवाईकांशी सम्पर्क दांडगा असेल तर इथे कशाला आली ह्या वृद्धाश्रमात,..?असे अनेक प्रश्न आशाबाईच्या उदासमनात दहा दिवसांपूर्वी आलेल्या नवीन रूम पार्टनर विषयी सुरू होते,..आज संध्याकाळी विचारूच तिला असं त्यांनी ठरवलं,..

तिन्ही सांजेला त्या छोट्याश्या रुममधल्या देवळीत दिवा लागला,..मंद धुपाने खोली दरवळली,.. खिडकीतुन नजरे आड होणारा सूर्य आणि पसरत जाणारा काळोख,..दोघींच्या खुर्च्या खिडकीजवळ होत्या,..आशाबाई म्हणल्याच आजींना,”आजी एक विचारू का खरंतर माझ्या आणि तुमच्या वयात असेल 30 एक वर्षाच अंतर मी 60 तुम्ही,..ती अंदाज लावते हे बघत आजीच हसुन म्हणल्या,मला 85 सुरू आहे ग,..आजीच्या उत्तराचा धागा पकडत आशा म्हणाली,”इतकं वय आहे मग असे राहिलेच किती दिवस म्हणुन इथे येऊन पडल्या आणि फोनवर इतक्या बोलत असता म्हणजे सगळ्यांशी तर सम्पर्क चांगला दिसतो,…कुणीही सांभाळलं असत ना,..?”

आजी हसत म्हणाल्या,”का माझी पार्टनरशीप आवडत नाही ए का तुला,..?”

तशी आशा चपापुन म्हणाली,”तसं नाही उलट मी स्वतःला तपासून बघायला लागले तुमच्याकडे बघुन,.. मला इथं आणुन सोडलं म्हणून मी रुसले, रागावले नातेवाईकांवर कोणाशी बोलत नाही फोन घेतच नाही,..पण तुम्ही तर सारख्या खुशाली विचारता,.. आशीर्वादाची फुले देता,.. म्हणून म्हंटल आज विचारावंच इथे येणं काय हौशीने का,..?”

आजी म्हणाल्या,”कसं असतं ना आशा जो पर्यंत सहज स्वीकार करायला आपण शिकत नाही तो पर्यंत आपण कशातूनच आनंद घेऊ शकत नाही,..प्रत्येकाच आयुष्य असतं ग आपण आपलं जगुन घेतो आणि पुढच्या पिढीचं जगणं आपल्या काळाशी जोडत बसतो,..खरंतर त्यांनाही समजुन स्वीकारलं तर छान पळू शकते हि नात्यांची गाडी पण जुन्या नव्याची तुलना ह्यातच निर्माण होतात दुरावे,.. अहंकारांच्या वेली फोफावत राहतात कारण आपण सोडून दयायला शिकत नाही,..मोह ग खरंतर आपला संसार सुन आली कि सम्पला हे आधी स्वीकारता आलं पाहिजे ना,..तिची सुरवात आणि आपला शेवट ह्याची सांगड घालता आली नाही कि हे वादविवाद मग त्या पिढीने कधी जगायचं,..अग जबाबदाऱ्या समजतात त्यांनाही,..आणि चुकून शिकण्यासाठी तुम्हाला आधी सोडावं लागत ना पण तुम्हीच घट्ट धरून बसता मग नाईलाजास्तव इथे येणारे वाढतात,..तू हि अश्याच वादातून आली हे कळलं आहे मला,..”

आशा आजीच्या बोलण्याने आत्मचिंतनात हरवली,..ह्या सहा महिन्यांपूर्वीच सगळं डोळ्यासमोर आलं,..दोन वर्षापूर्वी आलेली सुन आणि मग चहा पासुन ते स्वयंपाकापर्यंत आपण सतत आपलंच चालवलेलं अहं भाषण,..खरंतर नोकरी करून सगळं करत होती शिकत होती पण आपल्याला सत्ता सुटत नव्हती मग विकोपाला गेलेले वाद,..चढलेले स्वर,..सगळं मुलाच्या आवाक्या बाहेर आणि मग झालेला हा निर्णय,.. खरंच आजी म्हणते तसं स्वीकारता आलं असतं ना,..आपण आधार बनायला हवं होतं पण आपल्या सहजतेने न स्वीकारणाऱ्या स्वभावाने आपण इथे येऊन पडलो,..पण आजी ती तर स्वीकारते मग ती का इथे..?”

“आजी तू का इथे,..?” आशाचा प्रश्न ऐकून आजी म्हणाली,”मी नातसुनापर्यंत बदल स्वीकारले,..त्यामुळे आनंद घेत होते जगण्याचा पण आता शरीर साथ देत नाही,..आपल्या कडून त्यांना काही अपेक्षा नाहीत तरी आपल्याला आता तिथे त्रास होतो,..त्यांच्याकडून नाही आपलाच त्यांना,..आपलं रात्री बेरात्री होणारं जागरण,लघवीचे त्रास,..तरी सकाळी उठून आपण आरामात घरी आणि ते बिचारे जाणार नोकरीवर मग मीच हट्ट केला,..इथे चोवीस तास सेवा आहे मैत्रिणी आहे,..करमणूक,जेवण सगळं मिळतं थोडी त्यांनाही मोकळीक मिळते आपल्यापासून,..आपण जन्म दिला म्हणजे स्वतःच्या आनंदाच्या सीमा हरवून सतत आपल्याच उश्या पायथ्याशी लेकरांनी बसावं अशी मानसिकताच होऊ दिली नाही मी त्यामुळे हे इथे येणं स्वतःहून स्वीकारल कुठलेही राग,लोभ मनात न आणता,.. आपल्या मुळे कोणाचे जगणे कंटाळवाणे व्हावे असं मला मुळीच वाटत नाही उलट आपली आठवण ह्या धुपाच्या सुगंधा सारखी दरवळत राहणारी असावी ,..राख होऊन पडली आहे ग पण दरवळ मनाला आनंद देणारी,..हो ना..”

आशाने बंद करून ठेवलेला फोन सुरू केला,..”सुनबाई आलीस का ऑफिसातून,..?मी इकडे आनंदात आहे,..रोज फोन करत जाईल ठेवते फोन,…”

आजीने आशाचा हात हळुवार दाबला,..दोघी डोळ्यातून हसल्या आणि एकच श्लोक उच्चरला

“ठेविले अनंते  तैसेची राहावे

चित्ती असू द्यावे समाधान…”

धुपाची दरवळ आणि खिडकीतुन  रेंगाळत दिसणारा संधीप्रकाश बरंच काही सांगुन गेला.

© स्वप्ना अभिजीत मुळे (मायी)

औरंगाबाद 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments