सौ. उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ तो परत आला होता? – भाग 1 – श्री सुशांत सुप्रिय ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆
१९६५ मधे मी २३ वर्षाचा होतो. भाषा आणि साहित्य या विषयाचा शिक्षक होण्यासाठी मी शिकत होतो. त्या वर्षी, वसंताचा गंध सप्टेंबरमध्येच हवेत दरवळू लागला होता. एका सकाळी, खरं तर पहाटेच म्हंटलं पाहिजे, मी माझ्या खोलीत अभ्यास करत होतो. आमची बहुमजली इमारत होती आणि मी सहाव्या मजल्यावर रहात होतो. मी थोडासा आळसावलो होतो आणि थोड्या थोड्या वेळाने खिडकीतून बाहेर बघत होतो. तिथून मला आमची गल्ली दिसत होती. आणि रस्त्यावरच्या फूटपाथच्या बगलेत मला म्हातार्या डॉन सिज़ेरियोचा बगीचा दिसत होता. त्यात भरपूर खत घातलेलं होतं. त्याचं घर गल्लीच्या कोपर्यावर तिरकं असं होतं. त्यामुळे त्याचं घर कसल्या तरी अनियमित आकाराचं पंचकोनी असं काही तरी दिसत होतं.
डॉन सिज़ेरियोच्या घराच्या बगलेत बर्नेस्कोनी परिवाराचं सुंदर घर होतं. ते सगळे अतिशय चांगले, उदार, हवेहवेसे वाटणारे लोक होते. त्याला तीन मुली होत्या आणि मी, त्यांची सगळ्यात मोठी मुलगी एड्रियाना हिच्यावर प्रेम करत होतो. अधून मधून मी त्याच्या घराकडे जाणार्या रस्त्याकडे बघत होतो. अर्थात इतक्या सकाळी सकाळी एड्रियाना दिसण्याची शक्यता नव्हतीच.
गल्लीत आता कोणीच नव्हतं त्यामुळे माझं लक्ष आपोआप त्या माणसाकडे गेलं. घरांच्या पुढच्या रस्त्यावर तो दिसत होता. तो आमच्या सोसायटीकडेच येत होता. हा रस्ता डॉन सिज़ेरियो आणि बर्नेस्कोनीच्या घराच्या समोरून जात होता. माझं त्याच्याकडे आपसूकच लक्ष गेलं. तो कुणीतरी भिकारी किंवा भटक्या असावा. इंद्रधनुष्याच्या रंगांच्या चिंध्यात तो लपेटलेला होता.
तो दाढीवाला माणूस अतिशय अशक्त आणि दुबळा दिसत होता. त्याने एक मोडकी तोडकी कडब्याची टोपी घातली होती. उकडत असतांनाही त्याने धूसर रंगाचा एक फाटका ओव्हरकोट घातला होता. त्याचबरोबर त्याच्याकडे एक घाणेरडी झोळी होती. माझा अंदाज होता, की त्या झोळीत भीक म्हणून मिळालेल्या गोष्टी किंवा इकडे तिकडे मिळालेल्या खाण्याच्या वस्तू तो ठेवत असणार.
मी त्याच्याकडे बघत होतो. तो भिकारी डॉन सिज़ेरियोच्या घराच्या समोर थांबला आणि लोखंडी कुंपणातून त्याने घरमालकाला काही तरी भीक देण्याचा आग्रह केला. म्हातारा डॉन सिज़ेरियो एक कंजूष माणूस होता. त्याचे एकूणच व्यक्तिमत्व अप्रीय, तिरस्कार निर्माण करणारं होतं. भिकार्याकडे न बघता , त्यांनी हातानेच त्याला निघून जाण्याची खूण केली. भिकारी मंद आवाजात त्याला सतत काही तरी देण्याविषयी आर्जव करत होता. इतक्यात मी त्या म्हातार्या माणसाच्या ओरडण्याचा आवाज स्पष्ट ऐकला,
‘मला त्रास देऊ नको. चालता हो इथून…’
तरीही तो भिकारी सारखा आग्रह करत राहिला. तो दगडाच्या तीन पायर्या चढला आणि ते लोखंडी फाटक उघडण्याचा प्रयत्न करू लागला. डॉन सिज़ेरियोच्या सहनशक्तीचा आता अंत झाला. ते पुढे झाले आणि त्यांनी त्या भिकार्याला जोरात धक्का दिला. भिकारी ओल्या पायरीवरून घसरला. त्याने फटकाची लोखंडी सळी पकडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. नंतर धडाम असा जोरदार आवाज आला. तो फरशीवर उताणा पडला. त्याचे पाय आकाशाकडे उठलेले मला दिसले. त्या क्षणार्धात दगडाच्या पहिल्या पायरीला धडकून, त्याचं डोकं फुटलल्याचा आवाज मी ऐकला. डॉन सिज़ेरियो पळत पळत बाहेर आला. जमिनीवर पडलेल्या भिकार्यावर तो झुकला. त्याच्या हृदयाची धडधड ऐकण्याचा त्याने प्रयत्न केला. ती त्याला ऐकू आली नाही. मग डॉन सिज़ेरियो घाबरला. त्याने हाताच्या पंजाने त्या भिकार्याला पकडून दुसर्या टोकाला दगडांजवळ ओढत नेले. मग घरात जाऊन घराचे दार लावून टाकले. त्याच्या अनैतिक अपराधाचा कोणी साक्षी नाही, यबद्दल तो आश्वस्त होता. पण साक्षीदार मी होतो. लवकरच त्या बाजूने जाणारा एक माणूस त्या शवाजवळ थांबला. मग हळू हळू अनेक लोक तिथे जमा झाले. आणि तोपर्यंत पोलीसही तिथे पोचले. त्या मृत भिकार्याला अॅम्ब्युलंसमध्ये घालून घेऊन गेले. ही गोष्ट इथेच संपली आणि यावर नंतर कुणीही काहीही बोलले नाही.
माझ्याबद्दल बोलायचं झालं, तर या घटनेबद्दल मी अतिशय सावध होतो आणि मी माझं तोंड कधीही उघडलं नाही. कदाचीत माझं वागणं चुकीचं असू शकेल पण त्या म्हातार्यावर दोषारोप ठेवून मला काय मिळणार होतं? त्याने माझं कधीच काही बिघडवलेलं नव्हतं. दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा इरादा त्या भिकार्याला जीवे मारण्याचा मुळीच नव्हता. त्यामुळे आयुष्याच्या संध्याकाळी त्याला कोर्टात चकरा मारायला लागण्याचे कष्ट पडावेत, हे मला उचित वाटलं नाही. मला वाटलं, त्याला त्याच्या अंतरात्म्याचा आवाज ऐकत एकटंच सोडावं.
हळू हळू ती घटना मी विसरून गेलो. पण जेव्हा जेव्हा मी डॉन सिज़ेरियोला बघतो, तेव्हा तेव्हा मला अजब अशी अनुभूती येते. त्याला ही गोष्ट माहीत नाही, की या सार्या दुनियेत मी असा एकमेव माणूस आहे, की जो त्याचं भयानक रहस्य जाणून आहे. तेव्हापासून का कुणास ठाऊक, मी त्याच्यापासून दूर राहायला लागलो आणि त्याच्याशी बोलण्याची मी कधीच हिंमत केली नाही.
*** *** *** *** *** ***
हळू हळू मी ही घटना विसरत चाललो, पण जेव्हा जेव्हा डॉन सिज़ेरियो मला दिसतो, तेव्हा तेव्हा, मला एक अजब अशी अनुभूती होते की सार्या दुनियेत, मी असा एकमात्र माणूस आहे, जो त्याचं भयानक असं रहस्य जाणून आहे
*** *** *** *** *** ***
१९६९मधे मी २६ वर्षाचा झालो. मी एव्हाना स्पॅनिश भाषा आणि साहित्य यात डिग्री मिळवली होती. एड्रियाना बर्नेस्कोनीने माझ्याशी नाही, अन्य कुणाशी विवाह केला होता. ती व्यक्ती तिच्या योग्य होती की नाही, मी प्रेम करत होतो, तेवढंच प्रेम तीही व्यक्ती तिच्यावर करत होती की नाही, कुणास ठाऊक? त्या वेळी एड्रियाना गर्भवती होती आणि तिने केव्हाही बाळाला जन्म दिला असता. ती आताही पहिल्यासारखी त्याच सुंदर घरात रहात होती आणि दररोज, पाहिल्यापेक्षा जास्तच सुंदर दिसत होती. सकाळी लवकर मी काही मुलांना व्याकरण शिकवून येणार्या परीक्षेसाठी त्यांची तयारी करून घेत होतो. सवयीनुसार मी रस्त्याच्या पलिकडे एक उदास दृष्टिक्षेप टाकत असायचो.
त्या दिवशी अचानक माझं काळीज जोरजोराने धडधडू लागलं. मला वाटलं, मला दृष्टिभ्रम झालाय. तीन-चार वर्षापूर्वीचा तो भिकारी, ज्याला डॉन सिज़ेरियो ने धक्का देऊन मारून टाकलं होतं, तो त्याच रस्त्यावरून चालत येत होता. त्याच चिंध्यात लपेटलेला. एक फटका ओव्हरकोट त्याच्या अंगावर होता. कडब्याने बनवलेली एक मोडकी –तुटकी टोपी त्याच्या डोक्यावर होती आणि त्याच्या हातात एक घाणेरडी झोळी होती.
आपल्या विद्यार्थ्यांना विसरून मी खिडकीशी पोचलो. त्याची गती मंद झाली. तो आपल्या अपेक्षित इमारतीशी पोचणारच होता.
‘अरे, तो मृत भिकारी पुन्हा जिवंत झाला—‘ मी विचार करू लागलो. ‘डॉन सिज़ेरियोचा बदला घेण्यासाठी आला की काय?’ पण तो डॉन सिज़ेरियोच्या फटकापासून पुढे गेला. मग तो, एड्रियाना बर्नेस्कोनीच्या घरासमोरच्या फटकाशी थांबला. मग तो फाटक उघडून आत गेला.
‘मी आलोच इतक्यात…’ असं माझ्या विद्यार्थ्यांना सांगून मी लिफ्टने खाली आलो. गल्ली पार करून सरळ एड्रियानाच्या घरापर्यंत गेलो.
क्रमश: भाग १
मूळ लॅटिन कथा – मूळ लेखक फ़र्नांडो सोर्रेंटीनो
हिन्दी अनुवाद – वापसी – हिन्दी अनुवादक – श्री सुशांत सुप्रिय
मराठी अनुवाद – सौ उज्ज्वला केळकर मो. ९४०३३१०१७०
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170ईमेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈