सौ. उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ तो परत आला होता? – भाग 2 – श्री सुशांत सुप्रिय ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆
(मागील भागात आपण पाहिले – ‘मी आलोच इतक्यात…’ असं माझ्या विद्यार्थ्यांना सांगून मी लिफ्टने खाली आलो. गल्ली पार करून सरळ एड्रियानाच्या घरापर्यंत गेलो. आता इथून पुढे )
तिची आई, दरवाजाशी उभी होती. ती म्हणाली, ‘अरे तू…?’
ती माझ्याकडे नेहमीच अनुकूल दृष्टीने बघत आलीय. तिने मला मिठीत घेऊन माझ्या गालावर ओठ टेकले. मला काहीच कळलं नाही. अखेर काय झालय काय? मग मला कळलं, आत्ता आत्ताच एड्रियाना आई बनलीय. त्यामुळे सगळे अतिशय खूश आणि उत्तेजित झाले होते. माझ्या विजयी प्रतीद्वंद्वीचा हात हातात हात घेऊन त्याचे अभिनंदन करण्याशिवाय मी काय करू शकत होतो?
मला काळत नव्हतं की मी ही गोष्ट त्यांना विचारू की गप्प बसू? मग मला या प्रश्नाचं उत्तर सापडलं. मी खोट्या औदासिन्याने म्हंटलं, ’मी घंटा न वाजवताच आत आलो कारण मी एक घाणेरडी मोठीशी झोळी घेतलेल्या भिकार्याला आपल्या घरात गुपचुप येताना पहिलं आणि मला वाटलं, चोरी करण्याच्या उद्देशाने तो आत आलाय.’
ते सगळे माझ्याकडे हैराण होऊन बघू लागले. ‘भिकारी? झोळी? चोरी करण्यासाठी? त्यांना कळतंच नव्हतं. किती तरी वेळापासून ते इथे बैठकीच्या खोलीतच आहेत आणि त्यांना तसा कुणी भिकारी दिसला नव्हता.
‘मग माझ्याकडून नक्कीच काही तरी चूक झालेली असणार.’ मी म्हंटलं. मग ते मला एड्रियाना आणि नवजात शिशु असलेल्या खोलीत घेऊन गेले. आशा स्थितीत मला काय बोलावं हे कळेना. मी तिला शुभेच्छा दिल्या आणि बाळाकडे नीट पाहिलं. मी विचारलं, ‘बाळाचं नाव काय ठेवणार?’ त्यांनी सांगितलं, त्याच्या वडलांच्या नावावरून गुस्तावो ठेवण्याचं नक्की केलय. त्याचं नाव फर्नांडो ठेवलं असतं, तर मला जास्त बरं वाटलं असतं. पण मी गप्प बसलो.
घरी आल्यावर मला निश्चितपणे वाटू लागलं की हा तोच भिकारी आहे, ज्याला म्हातार्या डॉन सिज़ेरियोने धक्का देऊन मारलं होतं. तो बदला घेण्यासाठी नाही, तर एड्रियानाच्या मुलाच्या रूपात जन्म घेण्यासाठी परतला होता. पण दोन –तीन दिवसानंतर मला माझी कल्पना हास्यास्पद वाटू लागली आणि हळूहळू मी ती गोष्ट जवळ जवळ विसरूनच गेलो. ती घटना मी पूर्णपणे विसरून गेलो असतो. पण….
१९७९ मध्ये एक अशी घटना घडली, की त्यामुळे. १९६९ मध्ये घडलेल्या घटनेची आठवण झाली.
दहा वर्षं होऊन गेली. काळ पुढे पुढे जात होता. मी खोलीतल्या खिडकीजवळ बसून एक पुस्तक चाळत होतो. थोड्या वेळाने मी सवयीनुसार खिडकीतून बाहेर इकडे-तिकडे पाहिले. एड्रियानाचा मुलगा गुस्तावो आपल्या घराच्या गच्चीवर खेळत होता. तो जे खेळत होता, ते त्याच्या वयाच्या दृष्टीने अगदी पोरकट असे होते. मला वाटलं, आपल्या वडलांकडून त्याने वारशात मंदबुद्धी प्राप्त केलीय. तो जर माझा मुलगा असता, तर यापेक्षा निश्चितपणे चांगला खेळ निवडून खेळला असता आणि आपले मनोरंजन केले असते.
गुस्तावोने दोन्ही घरांच्या मध्ये जी कॉमन भिंत होती, त्यावर काही रिकामे डबे ठेवले होते. आपल्या गच्चीवर उभा राहून दगड मारून तो ते पडण्याचा प्रयत्न करत होता. हे सगळे डबे आणि दगड, त्यांचे शेजारी डॉन सिज़ेरियो यांच्या बागेत पडत होते. मला वाटलं, म्हातारा डॉन सिज़ेरियो याने आपली फुले आणि फुलझाडे या दगडांमुळे नष्ट झालेली पाहिली, तर त्या नक्कीच हार्ट अॅटॅक येईल.
अगदी याच वेळी डॉन सिज़ेरियो आपल्या घरातून बाहेर पडला. तो चांगलाच म्हातारा झाला होता. अतिशय लडखडत चालत होता. अगदी सावधपणे एक पाय मग दूसरा पाय खाली ठेवत तो चालत होता. घाबरत घाबरत तो लोखंडी दरवाजापर्यंत पोचला. दरवाजा उघडून तो हळूहळू त्याच्या पुढच्या दगडी पायर्या उतरू लागला
म्हातारा बागेत आला. अगदी त्याच वेळी गुस्तावोने शेवटचा डबा दगड मारून खाली पाडला. म्हातारा पायर्या उतरत होता. गुस्तावोने त्याला पाहिले नव्हते. डबा जोराचा आवाज करत म्हातार्या डॉन सिज़ेरियोच्या बागेत पडला. डब्याच्या जोरदार आवाजाने तो एकदम चमकला. मागे वळून बघण्याचा प्रयत्न कारताना तो घसरला आणि पहिल्या दगडी पायरीवर त्याचं डोकं आदळलं आणि फुटलं.
मी हे सारं बघितलं पण म्हातार्याने मुलाला बघितलं नव्हतं की मुलाने म्हातार्याला. एव्हाना काही कारणाने मुलाचं मन खेळावरून उडालं आणि तो तिथून निघून गेला. काही क्षणात खूपसे लोक म्हातार्या डॉन सिज़ेरियोच्या प्रेताभोवती जमा झाले. चुकून पाय घसरल्याने म्हातार्या डॉन सिज़ेरियोचा मृत्यू झाला, असं जाहीर झालं.
दुसर्या दिवशी मी पहाटेच उठलो आणि खिडकीजवळच्या खुर्चीवर स्थानापन्न झालो. डॉन सिज़ेरियो च्या पंचकोनी घरामध्ये रात्रभर आणि सकाळी लोक बसून घरच्या लोकांचं सांत्वन करत होते. अजूनही बरेचसे लोक त्या घराच्या बाहेर उभं राहून सिगरेट पीत होते व आपापसात बोलत होते.
एड्रियाना बर्नेस्कोनीच्या घरातून, तोच चिंध्या लपेटलेला म्हातारा भिकारी बाहेर पडला. त्याच्या अंगावर एक फाटलेला ओव्हरकोट होता. त्याने कडब्याने बनवलेली एक मोडकी-तुटकी टोपी घातली होती आणि हातात एक मोठीशी घाणेरडी झोळी होती. लोक घृणा आणि भीती यामुळे बाजूला सरकले. तो बायका पुरुषांची गर्दी चिरत पुढे निघाला. ज्या बाजूने तो आधी दोन वेळा आला होता, त्याच दिशेला हळू हळू चालत तो दूर जाऊन अदृश्य झाला.
दुपारी मला कळलं गुस्तावो सकाळपासून आपल्या बिछान्यात नाहीये. हे ऐकून मला वाईट वाटलं, पण फारसं आश्चर्य वाटलं नाही. बर्नेस्कोनी परिवाराने गुस्तावोला शोधण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांचा शोध आशेच्या जिद्दीवर अजूनही चालू आहे. मला मात्र त्यांनी शोध थांबवावा, असा सांगण्याची हिंमत कधीच झाली नाही.
— समाप्त —
मूळ लॅटिन कथा – मूळ लेखक फ़र्नांडो सोर्रेंटीनो
हिन्दी अनुवाद – वापसी – हिन्दी अनुवादक – श्री सुशांत सुप्रिय
मराठी अनुवाद – सौ उज्ज्वला केळकर मो. ९४०३३१०१७०
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170ईमेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈