सौ. गौरी सुभाष गाडेकर
जीवनरंग
☆ हॅपी रिटायर्ड लाईफ…!! – अज्ञात ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆
– ४ वर्षांपूर्वी एका रविवारी अचानक माझा मित्र अनिल आणि त्याची पत्नी अदिती माझ्या घरी आले. एकदम आनंद ! खूप वर्षांनंतर भेट होत होती.
अनिल रिझर्व्ह बँकेत नोकरी करून काही वर्ष आधी स्वेच्छानिवृत्ती घेतलेला. बँकेत असताना सुद्धा काही शिकवण्या करून आपल्या income ला जोड दिलेली.
अदितीने खूप धडपड करून एक छोटासा व्यवसाय उभा केला होता. तो तसा छान चालला. त्यामुळे निवृत्तीच्या वेळी आर्थिक बाजू भक्कम झाली होती.
एक मुलगा आणि एक मुलगी अशी पुलंच्या भाषेत ‘बेतशुद्ध संतती’ असलेला. दोघांची लग्न झालेली. पुन्हा पुलंच्या भाषेत ‘संसाराच्या शेवटी इष्ट स्थळी जाऊन पोचलेली’ अशी ही जोडी. दोघांचाही स्वभाव दिलखुलास ! त्यामुळे तो घरी येणे म्हणजे एक आनंद सोहळा !
थोड्या हवा पाण्याच्या गप्पा झाल्यावर मी त्याला विचारले, ” मग कसं काय चाललंय रिटायर्ड लाईफ? ”
” एकदम मस्त “…. अनिल
” काय करतोस? “.. मी
” काहीही नाही. म्हणजे तसं ठरवलंच आहे. खूप कष्ट केले रे. आता मात्र आपण कमावलेलं आपण उपभोगायचं असं ठरवलं आहे! “
” वा.. मग वेळ कसा जातो ? “….मी
” अरे इथे वेळ जाण्याचा प्रश्न आहेच कुणाला. आयुष्यभर एक – एक मिनिट धावत होतो. आता धावायचं नाही. परमेश्वराने आमच्या दोघांचे आयुष्य आरामात जाईल एवढं सगळं दिलं आहे. तेव्हा शांतपणे राहायचं. अगदी सकाळचा walk सुद्धा ७:०० वाजता. उगीच लवकर उठा वगैरे काही नाही. “…. अनिल
” आणि मुलगा? ” …. मी
” हे बघ. त्याला मी स्पष्ट सांगितलं. बाबारे, आपलं वडील – मुलाचं नातं वगैरे ठीक आहे. पण आता तुझं लग्न झालंय. तेव्हा तू आता स्वतंत्र राहा. माझं स्पष्ट मत आहे. मुलांनी वेगळं राहिल्याशिवाय त्यांना आयुष्य कळणार नाही.”…. अनिल
” हं “….मी थोडं hesitantly म्हटलं.
” अरे बघ ना. वेगळं राहिलं म्हणजे आपण गॅस बंद न केल्यामुळे दूध उतू जाऊन भांडं जळून काळं कसं होतं, किल्ली घरात विसरल्यावर कसा कल्लोळ होतो, भाजी आणायला गेल्यावर नाईलाजाने आपल्याला न आवडणारा भोपळा किंवा दुधी कशी ‘झक मारत’ घ्यावी लागते, आपली गाडी कितीही मोठी असली तरी त्यातून दळण कसे आणावे लागते वगैरे….” ….अनिल. इथे सर्वांच्या हास्याचा धबधबा !
” मग आता तू कुठे राहतोस? ” ….मी
” मी ठाण्याला आणि मुलगा दादरला. त्याला चॉईस दिला होता. त्याच्या दृष्टीने दादर सोयीचं होतं. म्हणून तो दादरला. मला ठाण्याला राहायला काही प्रश्न नव्हता म्हणून मी ठाण्याला “…. अनिल.
आयुष्य दादरच्या मध्यवस्तीत काढलेल्या माणसाला ठाण्याला राहायला जाणे सोपे नव्हते. म्हणून त्याच्या सहजपणे बदल करण्याच्या मानसिकतेचे कौतुक वाटले.
” सगळा नवीन set-up ना? सगळ्या व्यवस्था लागल्या?” …. मी
” हो. दूध, पेपर, भाजी मार्केट सगळं छान लागलं “….अनिल
” कामवाली बाई मिळाली का? ” … माझी पत्नी. तिने महिला वर्गाच्या अगदी जिव्हाळ्याच्या प्रश्नाला हात घातला.
” आमच्याकडे तो काही प्रॉब्लेम नाही. तो सगळं विषय यांच्याकडे “…. अदिती (अगदी खूष होत सांगत होती)
” म्हणजे? ” …. माझी पत्नी
” अगं म्हणजे कामवाल्या बाईचा interview हे घेतात. विचार त्यांना “…. अदिती
” अनिल तू घेतोस interview?”… मी
” अरे it is a technique how to negotiate with her “… अनिल सांगत होता.. “ म्हणजे असं बघ. मी तिला विचारतो ‘ तू किती पैसे घेणार दर महिन्याचे ? ‘. मग ती म्हणते ‘ ७०० रुपये ‘…. त्यात केर – लादी, सिंकमधील छोटी भांडी घासणे आणि आठवड्यातून एकदा फर्निचर पुसणे.
मग मी तिला म्हणतो “ बरं. आता मी काय सांगतो ते ऐक. कपड्यांच्या घड्या करून ठेवणे, खिडक्यांच्या कडा पुसणे, रोजची भाजी चिरून किंवा निवडून ठेवणे ही कामे पण करावी लागतील. या प्रत्येक कामाचे २५ रुपये याप्रमाणे एकूण ७५ रुपये मी जास्त देणार. मान्य? ‘ .. ती एकदम सहज मान्य करते “….. अनिल. इथे आमचा जोरात हशा!
” कमाल आहे राव तुझी ” ….मी हसत हसतच म्हटले.
” खरी गम्मत पुढची.. ऐक. मी तिला विचारतो ‘ महिन्यात दांड्या किती मारणार? प्रामाणिकपणे सांग.’ यावर ती थोडसं अडखळत म्हणते ‘दोन होतातच साहेब. काय करनार कितीबी केलं तरी व्हतातच’.
मी म्हणतो ठीक आहे. ती पण माणूस आहे. अडचणी येणारच. मग तिला मी सांगतो ‘ हे बघ दोन दांड्या ठीक आहेत. तिसरी दांडी झाली नाही तर त्या महिन्यात २५ रुपये अजून जास्त ! ” आम्ही सर्व अवाक आणि हास्याचा मोठा फवारा !
” मानलं तुला. सुपर आयडिया आहे यार! ” ….मी
” अरे तुला माहिताय… ती दुसरीकडे दांडी मारते. पण माझ्याकडे तिसरी दांडी मारत नाही “…. आम्ही हसून हसून फक्त पडायचे राहिलो होतो !
” म्हणजे ती मागत होती त्याच्यापेक्षा १०० रुपये जास्तच देतोस तिला “….मी
” येस. अरे पैसा वाचवण्याचा प्रयत्न करायचा नाही. आवश्यक तिथे खर्च करायचा. मी माझ्या मुलांना सांगून ठेवलं आहे. माझ्यानंतर बँक बॅलन्स मधलं काही उरेल अशी अपेक्षा ठेऊ नका. Fixed Assets राहतील ते तुमचे ! उगीच सगळं मुलांसाठी म्हणून ठेवण्यात अर्थ नाही. त्यांना सुद्धा कमवायला काय लागतं ते कळू दे “…. अनिल
” वा ….म्हणजे राजा – राणीचा संसारच म्हणायचं की तुझा “….मी
” हो. जेवण रोज चांदीच्या ताटात. च्यायला, ती भांडी नुसती लॉकर मध्ये पडून राहतात. आपण कधी वापरायची? म्हणून मस्त राहायचं. दर आठवड्याला नवीन सिनेमा, नाटक, कार्यक्रम. आम्ही दोघंही जातो.
… पण आठवड्यातला गुरुवार हा स्वातंत्र्यदिन ! मला जे पाहिजे ते मी करणार आणि तिला जे पाहिजे ते ती. मग मित्र, नातेवाईक, फिरणं. आपापला चॉईस. मी तिला विचारत नाही, ती मला विचारत नाही “….अनिल. आम्ही सगळे गारद !
— अनिलच्या या गप्पांनंतर जणू एक नवी पहाट झाल्यासारखं वाटलं. बोलता बोलता आयुष्याचं तत्त्वज्ञानच जणू त्याने सांगितलं.
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : सौ. गौरी सुभाष गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈