☆ जीवनरंग ☆ अगतिक-भाग 4 ☆ सौ. सुनिता गद्रे☆ 

‘दिवस’ झाले. नातेवाईक”सांभाळून रहा… काही मदत लागली तर आम्हाला ताबडतोब बोलवा. अर्ध्या रात्रीतनं पण आम्ही यायला तयार आहोत… वगैरे म्हणत आपल्या आपल्या परीने त्यांना धीर देत आपापल्या घरी परतले.

सगळं घरच जणू निष्प्राण झालं होतं. घरावर आलेली अवकळा अन् दुःखाची छटा काही कमी होत नव्हती. पुढच्या आठ दहा दिवसात इब्राहिम चाचा विजयला बरोबर घेऊन या-त्या ऑफिसच्या चकरा मारत होते. आवश्यक सर्टीफिकीटं, कागदपत्रं, दाखले हे सगळं  त्यांनी मिळवलं. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं काम सुरू झालं. पोलीस मुख्यालय, मानवाधिकार आयोग… महीला आयोग… विधवा सहायता कोष.. या सगळ्यांची ऑफिसं आणि ज्यांनी ज्यांनी मदतीचं आश्वासन दिलं होतं ती मोठी माणसं… सगळ्यांकडे हेलपाटे सुरू झाले. पण प्रत्यक्षात ताबडतोब योग्य ती मदत कुठूनच मिळत नव्हती.पोलिस खात्यातून आश्वासन दिलेले दोन लाख रुपये पण मिळत नव्हते. सगळीकडून गुळमुळीत उत्तरं, चार-पाच महिन्यानंतरचे वादे, संस्थेचे नियम… मिटिंग सध्या घेता येत नाही अशी अगतिकता. दोन महिन्याच्या काळात हेच सगळं पदरी पडलं होतं . सदानंदनं मंडईतल्या गाळ्या साठी भरलेला ऍडव्हान्सही परत मिळणार नव्हता. हेलपाटे घालून घालून दोघांचे पाय तुटायची वेळ आली.

सगळ्या गोष्टींचा त्यांना वीट आला. चाचा तर कामाची खोटी करून त्याला मदत करत होता. शेवटी एके दिवशी सकाळी सकाळीच तो त्यांच्या घरी आला.

“विजऽय” त्यांनं हाक मारली. सुशीला ची चाहूल लागताच तो म्हणाला,”भाभीजी, बुरा मत मानना… पण आता आपल्याला इतरांवर अवलंबून राहून चालणार नाही. एक महत्वाची बाबा तुम्हाला सांगतो… मनापासून… बघा पटतंय का! तशी मी आणखी कोशिश चालूच ठेवणार आहे. पण काय आहे, सोळा वर्षाच्या विजयला आता नोकरी नाही मिळणार .! बरं, मुलांच्या शाळा सकाळी असतात का दुपारी?

“दुपारी” विजय म्हणाला.

“ठीक आहे. सध्या तर सुट्टी चालू आहे. विजयला मोठ्या मंडईत घेऊन जातो. गाडीवर फळ घालून विकायचं काम तो करेल.”

“गाडी…. फळं…….”मायलेक हादरलेच.

“तुम्हाला धक्का बसेल…. मी समजू शकतो. पर क्या करे… आपल्याला जरा धाडस दाखवावंच  लागेल.”

                           क्रमशः … भाग- 5

© सौ. सुनिता गद्रे,

माधव नगर. मो – 960 47 25 805

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments