डॉ. ज्योती गोडबोले
जीवनरंग
☆ ।। तनामनाची व्यथा ।। — भाग 1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
पावसाची नुसती झड लागली होती. खूप वेळ ऑफिसमध्ये थांबून सुद्धा पाऊस थांबायचे चिन्ह दिसेना, तेव्हा तनुजा आणि सायली नाईलाजाने घरी निघाल्या. आज नेमकी सायली छत्री विसरली होती आणि एका छोट्या छत्रीत दोघीही पुऱ्या भिजल्याच. ” तनु, थँक्स हं. चल की वर. मस्त चहा पिऊया.आलं घालून करते. ओले कपडे बदल, माझा मस्त ड्रेस घाल आणि मग जा घरी. हवं तर राजीवला फोन करून सांग, मी सायलीकडे आहे, पाऊस थांबला की मग येते.”
क्षणभर तनुजाला मोह झाला,की सायलीचं ऐकावं. जाऊन तरी काय करणार आहोत घरी इतक्यात ! .पण निग्रहानं ती म्हणाली, ” नको ग सायली ! कधी घरी जाईन असं झालंय बघ ! थँक्स,पण पळतेच मी आता.. ” तनुजा घरी आली.
ते बाहुलीघरासारखे चकचकीत घर तिच्या अंगावर आले. जिकडची वस्तू तिथेच ठेवलेली, प्रत्येक वस्तूची जागा ठरलेली. चादरीवर एकही सुरकुती खपणार नाही….. अजून राजीव आलेला दिसत नव्हता. तोही अडकला बहुतेक पावसात. तनुजाने मस्त चहा करून घेतला. केस कोरडे केले आणि बाल्कनीत आरामात बसली.
इतक्यात रिया बाहेरून आलीच. “ आई,मला पण हवाय मस्त आलंवाला चहा. आज सुलतान ए आझम आले नाहीत वाटतं? “
तनुजाला अतिशय हसू आलं. ” कारटे, बापाला असं म्हणतात का? किती प्रेम करतो ग तो तुझ्यावर.”
“ हो आई, मान्य !अग पण काय हा शिस्तीचा वरवंटा. उगीच नाही दादा पसार झाला यू एसला ! आई, मी गेले होते ना सुट्टीत दादाच्या घरी.. यूएस ला ? बाप रे ! काय ग तो पसारा. मला म्हणाला, ‘ बघ बघ ! स्वातंत्र्य म्हणजे काय असतं
ते ! बाबांच्या घरी म्हणजे आपण काट्यावरच उभे असायचो ना! इथे बघ ! ‘ मी म्हटलं त्याला, ‘ दादा, शी ! किती घाण ठेवलीयेस तुझी रूम ! बाबांनी मारलेच असते तुला. शी ! नुसता उकिरडा केलायस या खोलीचा ! ‘– तर आई यावर दादा हसत होता आणि म्हणाला, ‘ सुटलो त्या सुलतानशाहीतून. काय ग ती शिस्त बाबांची ! मला तर वाटतं रिया, बाबांना ओ सी डी असावा बरं का ! सतत काय ग हा नाद ! अतीच करतात बाबा. आपली आजी सांगत होती एकदा, म्हणाली, ‘ बाबारे,या तुझ्या बाबांनी आम्हालाही कमी नाही त्रास दिलाय बरं! सतत धू पूस. जरा पसारा दिसला,की झाली ओरडायला सुरुवात. अरे इतकी माणसं असलेल्या घरात अशी चोवीस तास काटेकोर स्वच्छता,आणि चित्रासारख्या वस्तू राहणार तरी कशा ? कसं व्हायचं या मुलाचं, अशी काळजीच होती रे बाबा आम्हाला. सतत स्वच्छ कपडे हवे. हात सतत दहा दहा वेळा धुणार. पुन्हा डेटॉलनेही धुणार.’ – दादाने आजीला विचारलं ‘ आज्जी,मग पुढे काय झालं? ‘– ‘ मेल्या, पुढं लग्न झालं त्याचं तुझ्या आईबरोबर ! इतका हुशार, मोठ्या नोकरीचा नवरा सोडतेय हो ती? पण मग समजला तिलाही या पराकोटीच्या स्वच्छतेचा इंगा ! आम्ही सुटलो, पण ती बिचारी अडकली ! गरीबच हो तनुजा, म्हणून सहन करते या बाबाला ! ‘
आजीचे भाषण ऐकून सगळे हसायला लागले, त्यात तनुजाही सामील झाली.
तनुजाला तिचे लग्नाचे सुरुवातीचे दिवस आठवले. ती आपली साधीसुधी, चार सामान्य लोकांसारख्या घरात वाढलेली. पहिल्याच दिवशी राजीव म्हणाला होता , ” शी ! कसला रंग हा तुझ्या गाऊनचा ! आणि किती बेक्कार फिटिंग ! आणि हो, लक्षात ठेव, मला ओली बाथरूम अजिबात चालणार नाही. ते पाय आधी कोरडे कर, बाथरूम ब्रशने कोरडी कर, आणि मगच ये इकडे ! आणि डेटॉलने हात दरवेळी धुवायचे.–आणखी एक, ते भयानक वासाचे तेल लावायचे नाही केसांना ! मी सांगतो तेच लावत जा ! कुठून भेटतात मलाच असले गावठी लोक ! “
तनुजा ही सरबत्ती–तीही अजून कोऱ्या करकरीत असलेल्या नवऱ्याकडून ऐकून एकदम गारठलीच होती . . भयंकर घाबरली होती. ते पाहून तो तिला म्हणाला होता , ‘ घाबरतेस काय? मी काय वाघ आहे का? माझ्यासारखे वागावे लागेल तुला इतकेच म्हणणे आहे माझे .’– तनुजा ‘ होहो ‘ म्हणाली, आणि मगच त्याने तिला जवळ घेतले.
आता मात्र तनुजाला हसू येत होते. स्वच्छता आणि पराकोटीची शिस्त एवढे सोडले, तर राजीव लाखात एक होता.
दुसऱ्या दिवशी सकाळी तिने घाबरत सासूला विचारले, “आई, हे असे काय वागतात हो? मला भयंकर भीतिच वाटतेय बघा ! ” सासू हसली आणि म्हणाली, “ हो ग बाई! आम्हीही सोसलाय बरं हा काच. पण तू अजिबात घाबरू नको. बाकी खूप चांगलाय माझा लेक ! तेवढी ती स्वच्छता आणि शिस्त सांभाळ हो ! “
तनुजाने कपाळावर हात मारला. सासूबाई हसत होत्या. “ अहो आई,काय हसताय? “ असं म्हणून तिने रात्रीचा किस्सा सांगितला आणि दोघी सासू सुना हसायलाच लागल्या. त्या दिवसापासून तनुजाची सासूशी जी गट्टी जमली ती आजपर्यंत.
राजीवचं कपाट तर बघण्यासारखं असायचं. फुल शर्ट्सचा वेगळा कप्पा. चेक्सचे टी शर्ट्स वेगळे. डार्क कपडे वेगळे, फिक्के वेगळे — पँटस ही रंगाप्रमाणे लावलेल्या – हँगरवर,आधी फिके मग डार्क कपडे क्रमाने लावलेले.
परफ्यूम्स शिस्तीत अल्फाबेट्स प्रमाणे ओळीत लावलेली. त्याच्या कपाटाला कुणी हात लावलेला चालायचा नाही त्याला. जराही धूळ, अडगळ, कुबट वास सहनच व्हायचा नाही त्याला. त्यामुळेच तो रेल्वे किंवा एसटीचा प्रवास चुकूनही करत नसे. लोकांच्या जवळच्या सीट्स त्याला नको असत. विमानानेही तो कधीच इकॉनॉमी क्लासने जात नसे – लोक अगदी जवळ असतात म्हणून. कायम बिझनेस क्लासचाच प्रवास असायचा त्याचा. कंपनी त्याला सगळे देत असेच, पण नाही दिले एखादेवेळी, तर हा स्वतःच्या पैशाने जात असे.
” काय हो तुम्हाला इतकी प्रायव्हसी प्रिय? जरा नकोत माणसे जवळ आलेली.” ती दरवेळी त्याला म्हणायची.
एकदा राजीवचा मित्र घरी आला होता. रिया अगदी लहान होती. त्याने सहज रियाला मांडीवर बसवले आणि तिला चॉकलेट दिले. पापाही घेतला प्रेमाने. ते पाहून राजीव अतिशय संतापला होता आणि म्हणाला होता ,” रिया,खाली उतर आधी. असं कोणाच्याही मांडीवर बसलीस तर फोडून काढीन मी.”
तो मित्र रागाने जो निघून गेला, तो पुन्हा कधीही आला नाही.
“ अरे काय हे ? असं का बोललास भावजीना? किती दुखावले ते.”
“ आहे हे असं आहे बघ..मला अजिबात सहन होत नाही मोठ्यांनी मुलांशी लगट केलेली ! काहीही म्हण तू मग. “ तनुजा अगदी हताश झाली होती तेव्हा.
पण काहीकाही गोष्टी फार उत्कृष्ट होत्या त्याच्या. चॉईस फार सुरेख होता राजीवचा. तनुजाला त्याने इतके सुंदर स्वयंपाकघर लावून दिले आणि म्हणाला होता, “ हे कायम असेच राहिले पाहिजे बरं का. मला अस्ताव्यस्त घरं अजिबात आवडत नाहीत. मिक्सर, मायक्रो, फ्रीज लखलखीतच हवा. घाणेरडे हात लावायचे नाहीत त्याला. “
तनुजा नोकरी करायची. ती सांभाळून हे असे शोरूमसारखे घर ठेवायचे म्हणजे कठीणच काम होते तिला.
बरं, राजीव स्वतः तिला कधीही पैशाबद्दल अडवायचा नाही, की तिच्या पगाराचा हिशोबही कधी मागायचा नाही.
तनुजाला सासूबाई म्हणाल्या होत्या , ” अग, एवढा पगार मिळवतेस ना? मग ठेव की एखादी मुलगी साफसफाईला. कोण बघतंय, ही सगळी कामं तू करतेस की नोकर करतात ते – घर त्याच्या म्हणण्याप्रमाणे चकाचक राहिलं की झालं.”
सासूचा गुरुमंत्र अमलात आणून तनुजाने वरकाम आणि साफसफाईला एक मुलगी ठेवली. तिला आपल्या तालमीत तयार केली. कलाबाई म्हणजे तनुजाचा उजवा हातच बनली.,राजीवच्या धाकाने तनुजाही हळूहळू त्याच्या चांगल्या सवयी उचलू लागलीच होती. तिलाही आता पसारा,अस्वच्छता सहन होईनाशी झाली होती. .
एकदा माहेरी रहायला गेली होती, तेव्हा भावजयीने ठेवलेलं घर बघून हबकलीच होती तनुजा. आईला म्हणालीही होती, ” अग काय हे आई.किती घाण झालंय आपलं घर… तुझं लक्ष नसतं का हल्ली? घरभर नुसता पसारा ! आणि बाथरूम्स तर बघवत नाहीत. किती अवकळा आलीय घरावर. तरी बरं, वहिनी घरातचअसते, नोकरी नाही करत.”
भावजय हे ऐकून लगेच म्हणाली होती ,” तनुजा,असू दे हो आमचं घर असंच. तू मात्र फारच बदलली आहेस तिकडे जाऊन. अगं मुलं पसारा करणारच ना.”
“अग वहिनी, मुलं मला पण आहेत की. पण किती खेळणी पसरली आहेत. खेळून झालं की त्यांनाच उचलायला लावत जा की.”
भावजयीला राग आला आणि ती तिथून निघून गेली.
आई म्हणाली, ” हे बघ, तुझे आणि त्या राजीवचे पराकोटीचे स्वच्छता वेड आम्हाला नको सांगू. आहे हे असं आहे. पटलं तरच येत जा रहायला. “
ते ऐकून तनुजाला खूप वाईट वाटलं होतं . ती तडक घरी परत आली होती .
— क्रमशः भाग पहिला.
© डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈